३ जानेवारीच्या दिवशी सुप्रीम कोर्टाने हा एक निर्णय दिला आहे की सिनेमा हॉल किंवा थिएटरचे मालक या ठिकाणी अन्न आणि शीतपेयं नेण्यास प्रेक्षकांना मनाई करू शकतात. न्यायमूर्ती डी. वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे सांगितले आहे की सिनेमागृहांमध्ये खाद्यपदार्थांच्या विक्रीसंदर्भातल्या अटी आणि शर्ती ठरवण्याचा अधिकार त्या मालकांना आहे. प्रेक्षक आपल्या घरून अन्नपदार्थ किंवा शीतपेये नेऊ शकत नाहीत. त्यांनी थिएटर किंवा सिनेमा हॉलमध्ये मिळणारे पदार्थच घेतले पाहिजे. असं असलं तरीही सर्व सिनेमा हॉल्समध्ये पिण्याचं पाणी मोफत असलं पाहिजे असंही सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.
आता हे सगळं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे त्यामुळे याचा अर्थ असाच होतो की थिएटर किंवा सिनेमा हॉल या ठिकाणी मिळणाऱ्या महागड्या पदार्थांच्या किंमतींना आळा घालण्यास नकार देण्यात आला आहे. त्यामुळे सिनेमा हॉलचे मालक या गोष्टी ठरवू शकतात त्या किंमतींवर निर्बंध असणार नाहीत.
सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गेलं की खाद्यपदार्थ हा एक अविभाज्य भाग असतो कारण अनेक लोक इंटरव्हलच्या दरम्यान पॉपकॉर्न, कोल्ड ड्रींक्स, समोसे, नॅचोज, चहा, कॉफी असे पदार्थ विकत घेतात. अर्थात हे पदार्थ सिनेमागृहात प्रचंड महाग मिळतात. या अतिरिक्त किंमतीबाबतच याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र सुप्रीम कोर्टाने आता या खाद्य पदार्थांच्या किंमती ठरवण्याचा अधिकार हा सिनेमा हॉलच्या मालकांना आहे असं म्हटलं आहे.
खाद्यपदार्थ आणि शीतपेयं सिनेमा हॉलमध्ये महाग का असतात?
थिएटरमध्ये खाद्यपदार्थ आणि शीतपेयं यांच्या किंमती जास्त असण्याची अनेक कारणं आहेत.
प्रेक्षकांनी एकदा थिएटरमध्ये प्रवेश केला की तिथे खाद्यपदार्थ विकणारे हे ठरलेले असतात, त्यांना इतर कुणाचीही स्पर्धा नसते.
PVR सिनेमाजचे अजय बिजलानी यांनी इकॉनॉमिक टाइम्सला सांगितलं की भारतीय चित्रपटगृहांचं सिंगल स्क्रिनवरून मल्टिप्लेक्समध्ये रूपांतर अजूनही सुरू आहे. त्यामुळे थिएटर मालकांचा खर्च वाढला आहे. करोना काळात थिएटर मालकांना बराच फटका बसला आहे. मल्टिप्लेक्समध्ये मोठे हॉल आणि प्रोजेक्टर सेट असतात. त्यांच्या उभारणीसाठी खर्च येत असतो. मल्टिप्लेक्सचे मालक आपल्याला येणारे विवध खर्च या सगळ्यातून वळते करत असतात.
सिनेमा हॉल हे त्यांच्या कमाईसाठी अनेक स्रोतांवर अवलंबून असतात. बॉक्स ऑफिसचा कमाईचा एक महत्त्वाचा भाग हा स्टुडिओ आणि वितरकांना मिळतो. त्यामुळे दुसरा काही पर्याय मालकांसमोर राहात नाही.
पॉपकॉर्न, शीतपेयं महाग असण्याचं आणखी एक कारण असतं म्हणजे सिनेमाला येताना प्रेक्षकांसाठी सिनेमाचं तिकिट हा महत्त्वाचा किंवा महत्त्वाचा खर्च आहे. खाद्यपदार्थ किंवा शीतपेयं सगळे विकत घेतातच असं नाही. त्यामुळे हे पदार्थ महाग असतात.
तिकीट खरेदी महत्त्वाचा घटक असल्याने पदार्थ महाग कसे?
सिनेमाचं तिकीट खरेदी करणं हे सिनेमाला जाणाऱ्यांचं प्रमुख उदीष्ट असतं. मात्र हे सगळेच ग्राहक खाद्यपदार्थ किंवा शीतपेयं विकत घेतातच असं नाही.
अनेकदा सिनेमाची तिकिट विक्री कमी होते, तरीही त्या प्रेक्षकांसाठी सगळ्या सोयी सुविधा द्याव्याच लागतात. अशावेळी खाद्यपदार्थांच्या विक्रीतून मालकांना त्यांना येणारा खर्च भागवता येतो.