ज्ञानेश भुरे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्पेनमधील ‘ला लिगा’ फुटबॉल लीगमध्ये रविवारी २१ मे रोजी झालेल्या एका सामन्यात रेयाल माद्रिदचा प्रमुख आघाडीपटू व्हिनिशियस ज्युनियरवर काही प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली. याची अनेक आघाड्यांवर चर्चा झाली. क्लबवर कारवाई झाली. मात्र, मूळ प्रश्न सुटत नाही. ही एकमेव घटना नाही, स्पेनमधील फुटबॉल स्पर्धेमध्ये यापूर्वी अनेकदा असे प्रसंग घडले आहेत. ‘ला लिगा आता वर्णद्वेषींची लीग म्हणून ओळखली जात आहे,’ असे व्हिनिशियसला म्हणावे लागले. वर्णद्वेष हा स्पेनच्या फुटबॉलमध्ये सध्या कळीचा मुद्दा का ठरतो आहे, याचा आढावा.

व्हॅलेन्सिया आणि रेयाल माद्रिद यांच्यातील सामन्यात नेमके काय घडले?

युरोपीय फुटबॉलमध्ये स्पॅनिश लीगचे महत्त्व वेगळे आहे. अनेक दिग्गज फुटबॉलपटू येथे खेळतात, उदयास येतात. मात्र, रविवारी झालेल्या सामन्यातील प्रसंगाने पुन्हा एकदा स्पॅनिश लीगमधील वर्णद्वेषी वाद नव्याने समोर आला आहे. रेयाल माद्रिदला या सामन्यात ०-१ असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यादरम्यान व्हॅलेन्सियाच्या मेस्टाया स्टेडियमवरील प्रेक्षकांनी रेयाल माद्रिदचा ब्राझिलियन गौरेतर आघाडीपटू व्हिनिशियसला ‘माकड’ म्हणून हिणवले.

या वर्णद्वेषी टिप्पणीनंतर काय प्रतिक्रिया उमटल्या?

सगळ्यात पहिली प्रतिक्रिया अर्थातच व्हिनिशियसकडून उमटली. त्याने थेट स्पॅनिश फुटबॉललाच धारेवर धरले. ‘पूर्वी ही लीग रोनाल्डिन्यो, लिओनेल मेसी आणि ख्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या खेळासाठी ओळखली जात होती. मात्र, आता ही वर्णद्वेषी लोकांची लीग म्हणून ओळखली जाते,’ असे वक्तव्य व्हिनिशियसने केले. ब्राझीलचे अध्यक्ष लुइस इनासियो लुला दा सिल्वा यांनीही या वर्णद्वेषी टिप्पणीची दखल घेतली. जपानमध्ये हिरोशिमा येथे सुरू असलेल्या ‘जी७’ राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या समारोपाच्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे योग्य नाही आणि आमच्या खेळाडूचा अपमान झाला आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

या प्रतिक्रियांचा काय परिणाम झाला?

व्हिनिशियसने केलेल्या टिकेला ब्राझीलसह अन्य देशांचे आजी आणि माजी खेळाडू, तसेच अन्य क्षेत्रांतील नामांकित व्यक्तींनी पाठिंबा दिला. ब्राझीलच्या पंतप्रधानांनीही या प्रसंगाची दखल घेतली. यामुळे स्पॅनिश फुटबॉल संघटना आणि पोलिसांना कठोर पावले उचलावी लागली. ला लीगा फुटबॉल समितीने थेट व्हॅलेन्सिया क्लबवरच कारवाई केली. यासाठी त्यांनी ४५ हजार युरोचा दंड करण्यात आला. त्याच वेळी स्पॅनिश फुटबॉल स्पर्धेच्या समितीने मेस्टाया स्टेडियमवरील प्रेक्षक गॅलरीचा काही भाग पुढील पाच सामन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

व्हिनिशियसवर वर्णद्वेषी टिप्पणी होण्याची ही पहिलीच वेळ आहे का?

रोनाल्डिन्यो, रोनाल्डो, ख्रिस्तियानो रोनाल्डो, मेसी अशा एकापेक्षा एक सरस फुटबॉलपटूंमुळे स्पॅनिश लीगला वेगळीच झळाळी आली. मात्र, अलीकडे एक नाही, दोन नाही, तर अनेकदा वर्णद्वेषी टिप्पणीचे प्रसंग घडले आहेत. व्हिनिशियसला अनेकदा वर्णद्वेषाचा सामना करावा लागला आहे. स्पॅनिश लीगमध्ये वर्णद्वेष जणू सामान्य ठरू लागला आहे असे वाटते. यापूर्वी ॲटलेटिको माद्रिदच्या चाहत्यांनी संतापाने व्हिनिशियसचा पुतळा स्पॅनिश राजधानीतील एका पुलावर टांगला होता. मार्च २०२३ मध्ये बेटिसविरुद्धच्या सामन्यातही व्हिनिशियसला अशाच प्रकारे वर्णद्वेषी टिकेला सामारे जावे लागल्याचा अहवाल ली लिगानेच दिला आहे. डिसेंबरमध्ये रेयाल व्हॅलाडोलिडविरुद्धच्या सामन्यातही व्हिनिशियसला उद्देशून वर्णद्वेषी टिप्पणी करण्यात आली.

ला लिगामधील वर्णद्वेषाचा इतिहास काय सांगतो?

स्पॅनिश लीगमध्ये जवळपास एक दशकाहून अधिक काळ हा वाद सुरू आहे. माद्रिदमधील सॅन्टिआगो बर्नेबेऊ स्टेडियमवर २००४ मध्ये इंग्लंड आणि स्पेनदरम्यान झालेल्या सामन्यात उपस्थित हजारो स्पॅनिश पाठिराख्यांनी कृष्णवर्णीय खेळाडूंचा जातीय अपमान केला. या संदर्भात ब्रिटनमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. ब्रिटिश पंतप्रधानांनी तर स्पेनबरोबरचे राजकीय संबंध बिघडण्याची धमकी दिली. तरी असे प्रसंग होतच राहिले.

वर्णद्वेष ही स्पेनमधील व्यापक समस्या आहे का?

स्पॅनिश नागरिक वंशवादासारख्या मुद्द्यांना फारसे महत्त्व देत नाहीत. त्यापासून जेवढे अलिप्त राहता येईल तेवढे ते राहतात. स्पेनच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने २०१९ मध्ये वर्णद्वेषाच्या गुन्ह्यांत वाढ झाल्यामुळे सरकारला इशाराही दिला होता. संभाव्य भाडेकरू आणि घरखरेदी प्रकरणात अशा वर्णद्वेषाच्या असंख्य घटना घडल्याची नोंद आहे. येथे स्थलांतरित व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत नियमित करण्यात येत नाही. त्यामुळे हा ‘स्थलांतरित कायदा’ या वादाचे मूळ असल्याचे मानले जाते. येथे वर्णद्वेषी गुन्ह्यांसाठी कायदा नाही ही सर्वांत मोठी खंत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is racism a key issue in spanish football what was the reaction to the vinicius case print exp scj