‘‘रोहित शर्माचे नाव खूप ऐकले होते. मात्र, माझ्यासह अन्यही काही चांगले युवा क्रिकेटपटू होते. परंतु एकाच खेळाडूची इतकी चर्चा का, असा मला प्रश्न पडायचा. रोहितचा खेळ पाहण्याची खूप उत्सुकता होती. अखेर २००७ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात त्याची फलंदाजी पाहिली आणि मी थक्कच झालो. त्याच्याविषयी काही प्रश्न उपस्थित केलेच जाऊ शकत नाहीत हे कळले,’’ असे वक्तव्य भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीने एका मुलाखतीत केलेे होते. रोहित शर्मामधील असामान्य प्रतिभेचे यापेक्षा चांगले वर्णन करणे शक्य नाही. मात्र, कारकीर्दीच्या सुरुवातीला रोहितला या प्रतिभेला, गुणवत्तेला न्याय देता येत नव्हता. परंतु २०१३ मध्ये अशा काही गोष्टी घडल्या की ज्यांनी रोहितच्या कारकीर्दीला कलाटणी दिली. त्या गोष्टी कोणत्या आणि कर्णधार म्हणून भारताला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून देणाऱ्या रोहितची क्रिकेटच्या या प्रारूपातील कामगिरी खास का ठरते, याचा आढावा.
ट्वेन्टी-२० कारकीर्दीची सुरुवात कधी?
रोहितने २००७ च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात, वयाच्या २०व्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातून या प्रारूपातील आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. हा तोच सामना होता, ज्यात युवराज सिंगने स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार मारण्याची विक्रमी कामगिरी केली होती. त्यात रोहितला फलंदाजीची संधी मिळाली नाही. मात्र, पुढच्याच सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ४० चेंडूंत नाबाद ५० धावांची खेळी करताना त्याने आपल्यातील प्रतिभेचे दर्शन घडवले. तसेच अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध त्याने १६ चेंडूंत नाबाद ३० धावा फटकावल्या. अखेर भारताने हा सामना पाच धावांनी जिंकला. त्यामुळे भारताच्या पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वविजयात रोहितची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली.
त्यानंतर कामगिरीचा आलेख कसा राहिला?
सुरुवातीच्या काही सामन्यांतील चमकदार कामगिरीनंतर युवा खेळाडूंची कारकीर्द एकाच जागी थांबण्याची भीती असते. हेच रोहितच्या बाबतीत घडले. प्रतिभेचे, गुणवत्तेचे कामगिरीत सातत्याने रूपांतर करणे त्याला जमत नव्हते. नेत्रदीपक फलंदाजी करून कधी मोठी खेळी करणे, तर कधी बेजबाबदार फटका मारून बाद होणे हे रोहितच्या बाबतीत वारंवार घडत होते. २००७ ते २०१३ या कालावधीत त्याला आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये केवळ एका वर्षीच ४० हून अधिकच्या सरासरीने धावा करता आल्या. मधल्या फळीत खेळत असल्याने त्याची युवराज सिंग, कोहली, सुरेश रैना, युसूफ पठाण यांसारख्या फलंदाजांशी स्पर्धा असायची. यात तो मागे पडत चालला होता. त्याच वेळी २०११ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड न झाल्याने रोहित हताश होता. मात्र, त्याने जिद्द सोडली नाही आणि तो आपल्या कारकीर्दीकडे अधिक गांभीर्याने पाहू लागला.
हेही वाचा >>>विश्लेषण : ट्रॉफींचा दुष्काळ ते ट्वेन्टी-२० जगज्जेतेपद… विराट कोहलीचे योगदान या प्रवासात किती महत्त्वाचे?
रोहितसाठी २०१३ हे वर्ष का निर्णायक ठरले?
रोहितच्या कारकीर्दीचे दोन टप्पे आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. एक टप्पा २०१३ च्या आधीचा आणि एक नंतरचा. रोहितमधील प्रतिभा स्पष्टपणे दिसत होती. मात्र, वारंवार संधी देऊन त्याच्या कामगिरीत काही केल्या सातत्य येत नव्हते. २०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात अजिंक्य रहाणेच्या जागी रोहितला सलामीला पाठवण्याचा निर्णय भारताचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनीने घेतला. त्या सामन्यात रोहितने ८३ धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्यानंतरही त्याला सलामीवीर म्हणून कायम ठेवण्याबाबत काही प्रश्न होते. अखेर २०१३ च्या चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी धोनीने रोहितला पुन्हा सलामीला खेळण्याबाबत विचारणा केली. रोहितने त्यासाठी होकार दिला. त्यावेळी संघाबाहेर बसण्यापेक्षा सलामीला खेळण्याचे आव्हान मी स्वीकारले, असे एका मुलाखतीत रोहित म्हणाला. त्या सामन्यात रोहितने ६५ धावांची खेळी केली आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. सलामीला खेळताना त्याच्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील कामगिरीतही मोठी सुधारणा झाली. त्याच वर्षी ‘आयपीएल’मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वाची धुरा रोहितकडे सोपवण्यात आली. त्याने पहिल्याच हंगामात मुंबईला आपले पहिले जेतेपद मिळवून दिले. तिथून त्याचा कर्णधार म्हणून प्रवास सुरू झाला. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने विक्रमी पाच वेळा ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले.
भारताच्या कर्णधारपदाची जबाबदारी कधी?
सलामीवीर झाल्यापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित सातत्याने चमकदार कामगिरी करू लागला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने तीन द्विशतके झळकावली. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्येही त्याच्या कामगिरीचा आलेख चढता राहिला. त्यामुळे विराट कोहली कर्णधार असताना रोहितला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. एकीकडे रोहित दर दुसऱ्या वर्षी ‘आयपीएल’चा करंडक उंचावत होता, तर कोहलीची प्रतीक्षा कायम होती. त्यामुळे हळूहळू कर्णधारपदासाठी रोहितची चर्चा होऊ लागली. २०१८ मध्ये प्रदीर्घ इंग्लंड दौऱ्यानंतर कोहलीला विश्रांती देण्यात आली आणि आशिया चषकासाठी रोहितकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. एकदिवसीय प्रारूपात झालेल्या या स्पर्धेत रोहितच्या भारतीय संघाने जेतेपद मिळवले. त्यामुळे रोहितचे नेतृत्वगुण आंतरराष्ट्रीय स्तरावरही सिद्ध झाले. त्यानंतर २०२१ मध्ये कोहली ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यावर रोहितला ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय अशा दोन्ही संघांचे नेतृत्व देण्यात आले.
हेही वाचा >>>ब्रिटिशकालीन कायदे हद्दपार! भारतीय न्याय संहिता आजपासून लागू; काय आहेत नवे बदल?
२०२२ ट्वेन्टी-२० विश्वचषकातील पराभवानंतर…
रोहितच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात झालेल्या २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. मात्र, त्या सामन्यात भारताला इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. जोस बटलर आणि ॲलेक्स हेल्सच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडने तो सामना १० गडी राखूनच जिंकला. त्यानंतर रोहितवर, भारतीय संघावर आणि भारताच्या सावध फलंदाजीवर बरीच टीका झाली. ‘‘त्या सामन्यानंतर रोहितने भारतीय संघाच्या फलंदाजीच्या शैलीत अमूलाग्र बदल घडवून आला. सावधपणे खेळून आपण यश मिळवू शकत नाही हे त्याला कळले. त्यामुळे त्याने सर्वच फलंदाजांना आक्रमक शैलीत खेळण्याची सूचना केली. याची सुरुवात त्याने स्वत:पासून केली,’’ असे २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या दिनेश कार्तिकने एका मुलाखतीत सांगितले. रोहितने गेल्या वर्षी मायदेशात झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात अगदी पहिल्या चेंडूपासून गोलंदाजांचा समाचार घेण्यास सुरुवात केली. हीच शैली त्याने आणि संपूर्ण संघाने नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही कायम राखली. त्यामुळे भारताने अन्य संघांवर वर्चस्व गाजवताना दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वविजयावर मोहोर उमटवली.
आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० कामगिरी…
विश्वविजयानंतर कोहलीपाठोपाठ रोहितने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली. मात्र, निवृत्त होण्यापूर्वी सर्वाधिक सामने (१५९), सर्वाधिक धावा (४२३१), सर्वाधिक शतके (५), कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय (५०) असे आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील अनेक विक्रम त्याने आपल्या नावे केले. तसेच सर्वांत जलद शतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहे. त्याने २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूंत शतक साकारले होते. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याची सर्वकालीन सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना केली जाणार हे निश्चितच आहे.