-गौरव मुठे
सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकांची ताजी दौड पाहता भांडवली बाजारात तेजी परतत असल्याचे दिसत आहे. सकारात्मक जागतिक कल आणि आघाडीच्या समभागांमध्ये निम्न भावात झालेल्या खरेदीमुळे भांडवली बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंशांकडे वाटचाल सुरू केली. तेजीवाल्यांनी दाखविलेल्या या सक्रियतेने प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने जून महिन्यातील नीचांकी पातळीपासून सुमारे १५ टक्क्यांहून अधिक उसळी मारली. परिणामी या कालावधीत गुंतवणूकदारांच्या मालमत्तेत ३९ लाख कोटी रुपयांची भर पडली. मात्र ही शेअर बाजारात तेजी कुठवर टिकणार, हा प्रश्न गुंतवणूकदारांपुढे कायम आहे. या तेजीमागील नेमकी कारणे काय आहेत? एकीकडे जागतिक पातळीवर आर्थिक मंदीचे वारे वाहत असताना देशांतर्गत भांडवली बाजाराने घेतलेल्या फेरउसळीमध्ये गुंतवणूकदारांनी सावध राहणे आवश्यक आहे.
बाजारातील सध्याची तेजीची कारणे काय?
अमेरिकेतील महागाई दरातील नरमाईने देशांतर्गत भांडवली बाजारात परदेशी आणि देशांतर्गत गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाल्याने गुंतवणूकदारांनी कमी किमतीला उपलब्ध असलेल्या बँकिंग, वित्त आणि माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदीचा सपाटा लावल्याने निर्देशांकांना बळ मिळाले आहे. सरलेल्या जुलै महिन्यात अमेरिकेत महागाई दर अपेक्षेपेक्षा अधिक नरमल्याने त्याचे सकारात्मक पडसाद अमेरिकेसह जगभरातील भांडवली बाजारावर उमटले. अनियंत्रित महागाईला लगाम लावण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँकांकडून आक्रमकपणे व्याज दरवाढीचे धोरण अवलंबिले जात आहे. मात्र अमेरिकेत महागाई दर कमी झाल्याने अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्र्हकडून आगामी काळात व्याजदरासंबंधाने कमी आक्रमकता दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आशियासह युरोपातील बाजारांमध्येदेखील उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याचबरोबर अमेरिकेसह बहुतांश देशांवर आर्थिक मंदीचे सावट असून, आशिया खंडातील अर्थव्यवस्थांनाही मंदीचा धोका वाढत आहे. मात्र भारत मंदीच्या गर्तेत सापडण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के असल्याचा ‘ब्लूमबर्ग’ने अर्थतज्ज्ञांमध्ये केलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे.
तेजी कुठवर टिकणार?
गुंतवणूकदारांसाठी तेजी कुठवर टिकणार, हे जाणून घेणे महत्त्वाचे असते. सध्या जागतिक पातळीसह देशांतर्गत पातळीवर वस्तू आणि सेवांच्या किमती नरमल्याने सर्वसामान्यांसह उद्योगांना दिलासा मिळाला आहे. भांडवली बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांची सरलेल्या जून तिमाहीतील आर्थिक कामगिरी समाधानकारक राहिली आहे. अर्थतज्ज्ञ आणि रिझर्व्ह बँकेच्या मते चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत महागाई दर सहा टक्क्यांच्या पातळीवर येण्याची शक्यता आहे. परिणामी कंपन्यांना अधिक दिलासा मिळून त्याचे सुपरिणाम येत्या तिमाहीमध्ये त्यांच्या आर्थिक कामगिरीतून प्रतिबिंबित होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी उत्सवी हंगामाचा काळ बघता वाहन निर्मिती क्षेत्र, ग्राहकपयोगी क्षेत्र आशादायी आहेत. सरलेल्या तिमाहीत बँकिंग क्षेत्रानेदेखील दमदार कामगिरी केली असून १२ सरकारांनी बँकांनी १५,००० कोटींचा एकत्रित निव्वळ नफ्याची नोंद केली आहे. हे सर्व आशादायी चित्र बघता भांडवली बाजारातील विश्लेषकांनी बाजारातील तेजी कायम राहण्याची आशावाद व्यक्त केला आहे.
परदेशी गुंतवणूकदार पुन्हा सक्रिय झाले आहेत का?
नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ पासून चालू वर्षात जून २०२२ पर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारातून २.५ लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेतला होता. इतक्या कमी कालावधीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर समभाग विक्री झाली. तर सरलेल्या मे महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी ४४,००० कोटी मूल्याचे समभाग विकले आहेत. मात्र सलग नऊ महिन्याच्या मोठ्या कालावधीनंतर जुलै महिन्यापासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार देशांतर्गत भांडवली बाजारात पुन्हा सक्रिय झाले आहेत.
परदेशी गुंतवणूकदारांनी सरलेल्या जुलै महिन्यात ६७१९.५५ कोटी रुपये मूल्याची समभाग खरेदी केली. तर चालू महिन्यात १० ऑगस्टपर्यंत त्यांनी सुमारे १८,७३३.३ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात त्यांच्या एकूण समभाग विक्रीच्या मूल्यापेक्षा खरेदी केलेल्या समभागांचे मूल्य अधिक राहिले आहे, यावरून परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा देशांतर्गत बाजाराकडे मोर्चा वळविला असल्याचे दिसत आहे.
बाजार वाढीसाठी उत्साहदायक बाबी कोणत्या?
रशिया-युक्रेन युद्धामुळे चालू वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दराने १४० डॉलर प्रतिपिंपाची पातळी ओलंडली होती. मात्र आता पुन्हा खनिज तेलाचे दर १०० डॉलर प्रतिपिंपापर्यंत खाली आल्याने आयातदारांना दिलासा मिळाला आहे. याचबरोबर देशांतर्गत पातळीवर इंधनाचे दर कमी झाल्यामुळे कंपन्यांच्या उत्पादन खर्चात देखील कपात झाली आहे. केंद्र सरकार आणि रिझव्र्ह बँकेकडून महागाईला लगाम घालण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांना यश येत असल्याचे निदर्शनास येत आहे. जुलै महिन्यात अन्नधान्याच्या किमती कमी झाल्याने ग्राहक किंमत निर्देशांकावरील आधारित किरकोळ महागाई दराचा पाराही उतरला. आधीच्या मे आणि जूनमध्ये सात टक्क्यांपुढे कडाडलेला हा दर, सरलेल्या महिन्यांत ६.७१ टक्क्यांवर उतरल्याने या आघाडीवर येत्या काळात सर्वसामान्यांसह, धोरणकर्त्यांनाही दिलासा अनुभवता येण्याचे संकेत मिळत आहेत. दुसरीकडे, देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादनवाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या जून महिन्यामध्ये १२.३ टक्क्यांपुढे मजल मारली आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या निर्देशांकांनी आश्वासक वाढ दर्शविल्याने गुंतवणूकदारांचा उत्साह वाढला आहे.
रुपयातील घसरण थांबली?
अमेरिकी चलनासमोर गेल्या काही दिवसांपासून नांगी टाकणाऱ्या भारतीय रुपया चालू महिन्यात किंचित सावरला आहे. रिझव्र्ह बँकेने गेल्या काही दिवसांत उचललेल्या पावलांमुळे रुपया सावरला असून गेल्या महिन्यातील ८०.११ या नीचांकी पातळीपासून रुपयाने महिन्यातील सर्वोत्तम झेप घेतली. पुरेशा तरलतेसाठी मध्यवर्ती बँकेने बाजारात अमेरिकी डॉलरचा पुरवठा वाढविला आहे. रुपयाला सावरण्यासाठी ४० अब्ज डॉलरहून अधिक परकीय गंगाजळी खर्ची पडली आहे. भांडवली बाजारातील तेजी आणि परदेशी गुंतवणूकदारांनी पुन्हा देशांतर्गत बाजारात वळविलेला मोर्चा यामुळे रुपयाला बळ मिळाले आहे.
गुंतवणूकदारांचा दृष्टिकोन कसा असायला हवा?
सध्याच्या वातावरणात, गुंतवणूकदारांनी अस्थिरतेला कारक ठरणाऱ्या घटकांचा आढावा घेत राहणे आवश्यक आहे. रशिया-युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती आणि अन्नधान्यासह, प्रमुख जिनसांचा पुरवठा काय आणि कसा राहील, याचा पाठपुरावा घेत राहावाच लागेल. या अस्थिरतेचे साद-पडसाद बाजारातही उमटतच राहतील. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत दिसून आली तशी बाजाराची एकाच दिशेने वाटचाल सुरू राहिल्याचे अभावानेच दिसेल. पण अशा परिस्थितीचा वापर गुंतवणूक भांडाराची नव्याने फेरमांडणी करण्यासाठी केला गेला पाहिजे. सोन्यासारख्या शाश्वत मूल्य असणाऱ्या साधनांना गुंतवणुकीत स्थान हवेच. जगभरात महागाई आणि व्याजदर दोन्ही वाढत असल्याने रोख्यांवरील परतावा वाढेल. गेल्या दशकात, रोखे गुंतवणुकीवरील उत्पन्न आणि ‘व्हॅल्यू इंव्हेस्टिंग’मध्ये सकारात्मक सहसंबंध दिसून आला आहे. वाढत्या महागाईने ज्या कंपन्यांच्या मिळकतीला कात्री लावली आहे, अशा कंपन्यांच्या समभागांबाबत खास जागरूकता महत्त्वाची ठरेल. गुंतवणुकीत तर राहावेच लागेल आणि महागाईने आपल्या बचतीचा घास घेतला जाऊ नये म्हणून काहीशी जोखीमही घ्यावीच लागेल. अर्थात जाणकारांच्या मते, सध्याच्या आव्हानात्मक काळात कोणतीही जोखीम न घेण्याची भूमिका हीच मूळात सर्वात मोठी जोखमीची बाब ठरेल.