– विनायक परब
सध्या रमझानचा पवित्र महिना सुरू आहे. गेल्या वर्षी याच कालखंडात जेरुसलेम येथील अल-अक्सा मशिदीच्या आवारात इस्रायली पोलिसांनी केलेल्या प्रवेशानंतर मोठ्या संघर्षाला सुरुवात झाली होती. ११ दिवसांनंतर हा संघर्ष थांबला. यंदा पुन्हा एकदा मार्च महिन्याअखेरीस इस्रायली नागरिकांवर हल्ले झाले. त्यात काहींनी प्राणही गमावले. त्यानंतर एप्रिल महिन्यात सलग दोनदा इस्रायली सैन्याने आक्रमक भूमिका घेत या परिसरात प्रवेश केला. अल-अक्सा मशिदीच्या परिसराला असे नेमके काय महत्त्व आहे की, त्यामुळे तिथेच संघर्षाच्या ठिणग्या वारंवार पडतात?
अल-अक्सा मशीद परिसराचे नेमके महत्त्व काय?
अल-अक्साचा उल्लेख टेम्पल माऊंट असाही केला जातो. पूर्व जेरुसलेममध्ये असलेले हे ठिकाण एकेश्वरवादी असलेल्या ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मियांचे श्रद्धास्थान आहे. इस्लामी धर्मग्रंथानुसार मक्केहून निघालेले प्रेषित मोहम्मद यांनी त्यांचा रात्रीचा प्रवास इथेच पूर्ण केला. आणि इथेच असलेल्या डोम ऑफ द रॉक येथून त्यांनी स्वर्गाच्या दिशेने प्रयाण केले. त्यामुळेच मक्का-मदिना नंतर अल-अक्सा मशिदीचा परिसर हा मुस्लिम धर्मियांसाठी तिसऱ्या क्रमांकाचे प्रसिद्ध व लोकप्रिय श्रद्धास्थान ठरले आहे.
ज्यू आणि ख्रिश्चन धर्मियांचा संबंध कसा येतो?
हा तोच परिसर आहे जिथे इसवी सन पूर्व कालखंडामध्ये ज्यू धर्मियांसाठी परमश्रद्धेय असलेल्या अब्राहमने त्याचा मुलगा आयझॅक याला देवाला अर्पण करण्याची तयारी केली. अखेरीस देवानेच त्याला तसे करण्यापासून रोखले. ते हेच ठिकाण अशी ज्यू धर्मियांची श्रद्धा आहे. तर येशू ख्रिस्ताला ज्या ठिकाणी सुळावर चढविण्यात आले ते ठिकाण हेच असल्याची ख्रिश्चन धर्मियांची श्रद्धा आहे. त्यामुळे हे ठिकाण तिन्ही धर्मियांसाठी परमश्रद्धेय असेच आहे.
इथे इस्रायल- पॅलेस्टाइन यांचा संघर्ष होण्याचे कारण काय?
त्यासाठी आपल्याला इस्रायल- पॅलेस्टाइन यांच्या संघर्षाची पार्श्वभूमी समजून घ्यावी लागते. हे ठिकाण पूर्व जेरुसलेम येथे आहे. पहिल्या महायुद्धामध्ये ओटोमन साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर पॅलेस्टाइन वसाहत ब्रिटिशांच्या ताब्यात आली. २९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांनी इस्रायल व पॅलेस्टाइन फाळणीचा प्रस्ताव मान्य करत जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहराची मान्यता दिली. १४ मे १९४८ रोजी ज्यू धर्मियांनी इस्रायल हा स्वतंत्र देश जाहीर केला. त्यानंतर १९४८ सालीच पहिले इस्रायल- अरब युद्ध झाले. पश्चिम जेरुसलेमसह अतिरिक्त २३ टक्के भाग इस्रायलने काबीज केला.
१९६७ साली इस्रायलने पूर्व जेरुसलेम आणि वेस्ट बँक किंवा पश्चिम किनारपट्टीचा भाग जॉर्डनकडून तर गाझा आणि सिनाई पट्टा इजिप्त तर गोलन टेकड्यांचा परिसर सीरियाकडून ताब्यात घेतला. याच पूर्व जेरुसलेममध्ये अल- अक्सा मशिदीचा परिसर येतो.
१९८० नंतरच्या संघर्षाचे मूळ कारण काय?
१९७८ साली इजिप्तसोबत झालेल्या शांतता करारामध्ये इस्रायलने पॅलेस्टाइनच्या भागात त्या प्रांतासंदर्भातील निर्णय घेण्याचे अधिकार असलेले स्वतंत्र प्राधिकार सरकार स्थापण्यास मान्यता दिली. आणि नंतर लगेचच दोन वर्षांत म्हणजेच १९८० साली इस्रायलने जेरुसलेम हे राजधानीचे ठिकाण म्हणून जाहीर केले तर हेच आपले भविष्यातील पॅलेस्टाइन राष्ट्राचे राजधानीचे ठिकाण असेल असे पॅलेस्टाइन नागरिकांचे ठाम मत आहे. इथे संघर्षाला धार चढली.
पॅलेस्टाइनच्या संघर्षाचा इतिहास काय सांगतो?
इस्रायलच्या विरोधातील पहिला पॅलेस्टाइन उठाव १९८७ मध्ये झाला. त्याच सुमारास गाझा पट्ट्यात हमासची स्थापना झाली. आक्रमक दहशतवादी हिंसक कृत्यांसाठी हमास ओळखली जाते. सध्याचा संघर्षही प्रामुख्याने हमास विरुद्ध इस्रायली सैन्य असाच आहे. १९९३ आणि १९९५ मध्ये ऑस्लो एक व दोन असे दोन करार पार पडले. यामध्येही पॅलेस्टाईनसाठी स्वतंत्र प्राधिकार सरकार अस्तित्वात येण्यास मान्यता मिळाली. २००० सालापर्यंत हे सारे प्रत्यक्षात येण्यास अनेक अडचणी आल्या. आणि २००५ मध्ये इस्रायलविरोधात हमासच्या हिंसक कारवायांमध्ये वाढ झाली. २००६ साली पॅलेस्टाइन प्राधिकार सरकारमध्ये निवडून आले खरे मात्र राष्ट्राध्यक्षांनी हमासचे सरकार निष्कासित केले. त्यानंतर आक्रमक होत हमासने २०१७ साली गाझा पट्टीचा ताबा घेतला तर फताह संघटनेने वेस्ट बँक परिसर ताब्यात घेतला. १९४८ मध्ये ज्यांना हाकलण्यात आले त्या पॅलेस्टिनींचे पूर्व जेरुसलेममध्ये परतणे आणि इस्रायल- पॅलेस्टाइनमधील सीमातंटा हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत.
पण मग आताच मशीद परिसरामध्ये संघर्ष होण्याचे तात्कालीन कारण काय?
अल-अक्सा मशिदीमध्ये रोज दैनंदिन प्रार्थना त्याचप्रमाणे दर शुक्रवारी महत्त्वाची प्रार्थना होते. त्यास जेरुसलेममधून पॅलेस्टाइन- अरब तर जगभरातून मुस्लिम बांधव येतात. रमझानच्या पवित्र महिन्यात तर संख्या हजारोंनी वाढते. २०२१ साली या प्रार्थनेसाठी येणाऱ्यांच्या संख्येवर इस्रायलने निर्बंध घातले तिथून आताच्या संघर्षाला सुरुवात झाली. २०२१ साली हमास व इस्रायल यांच्यात ११ दिवस युद्ध सुरू होते. त्यानंतर शांतता करार झाला व युद्ध थांबले.
यंदा नेमके काय झाले?
यंदा २२, २७ व २९ मार्च रोजी इस्रायली नागरिकांवर हमासकडून हल्ले करण्यात आले त्यात काही इस्रायली नागरिकांचे प्राण गेले. त्यानंतर इस्रायली सैन्याने आक्रमक भूमिका घेतली. १५ एप्रिल रोजी शुक्रवारच्या प्रार्थनेच्या वेळेस रमझानमुळे गर्दी झाली. त्यावेळेस संघर्ष उसळला. इस्रायलच्या म्हणण्यानुसार प्रार्थनेस आलेल्यांनी सैन्यावर दगडफेक करत हल्ला चढवला असाच संघर्ष १७ एप्रिललाही झाला. सध्या परिस्थिती तणावपूर्ण आहे. मात्र ही कारणे केवळ तात्कालीक असून या संघर्षाचे मूळ पॅलेस्टाइन- इस्रायल या संघर्षाध्ये दडलेले आहे.