ऐतिहासिक अशा बाणगंगा तलावाच्या पुनरुज्जीवनाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढताना कंत्राटदाराने पायऱ्यांचे नुकसान केल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनाने या कंत्राटदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. हे प्रकरण पालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनीही कंत्राटदारावर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. पायऱ्यांचे नुकसान करतानाच पुरातत्त्व विभागाच्या नियमांचा भंगही कंत्राटदाराने केला असल्यामुळे या घटनेला गंभीर वळण आले आहे. बाणगंगा तलावाला इतके महत्त्व का आहे त्याबाबतचे हे विश्लेषण…

बाणगंगा तलाव कुठे आहे?

दक्षिण मुंबईतील ग्रॅंटरोड पश्चिम येथील मलबार हिल परिसरात वाळकेश्वर येथे बाणगंगा तलाव आहे. गिरगाव चौपाटी येथून मलबार हिलच्या टेकडीवर चढण चढून गेल्यानंतर टेकडीच्या पश्चिम किनाऱ्याच्या टोकाला हा परिसर येतो. हा परिसर आजूबाजूने समुद्राने वेढलेला असून त्यात मध्यभागी हे गोड्या पाण्याचे कुंड असल्यामुळे या बाणगंगा तलावाविषयी विशेष आकर्षण आहे. तलावाभोवती मंदिरे, समाधी, धर्मशाळा, मठ असून तलाव परिसराला धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्व आहे. 

तलावाचे महत्त्व काय? 

बाणगंगा तलावाच्या उत्पत्तीचा संबंध थेट रामायण काळाशी जोडलेला आहे. अकराव्या शतकाच्या पौराणिक संदर्भांमध्ये या तलावाच्या पाऊलखुणा आढळतात. प्रभू श्रीराम या परिसरात आले असता त्यांनी या परिसरात वाळूपासून शिवलिंग तयार केले व त्याची पूजा केली असे सांगितले जाते. या परिसरात वाळूकेश्वराचे मंदिर आहे. त्यामुळे या परिसराला वाळूकेश्वर असे म्हटले जात होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन वाळकेश्वर असे नाव प्रचलित झाल्याचे येथील लोक सांगतात. चारही बाजून समुद्राने वेढलेल्या या परिसरात रामाने बाण मारून गोड्या पाण्याचा झरा निर्माण केला त्यामुळे या तलावाला बाणगंगा म्हणतात, अशीही दंतकथा आहे. तलावाला लागूनच व्यंकटेश बालाजी मंदिर, सिद्धेश्वर शंकर मंदिर, बजरंग आखाडा व वाळकेश्वर मंदिर इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. या तलावाचे प्राचीनकालीन महत्त्व लक्षात घेऊन विविध भाविक, देशी-विदेशी पर्यटक, अभ्यासक परिसराला भेट देतात. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात उंचावर असलेले अतिशय शांत आणि प्रसन्न असे हे ठिकाण आहे. त्यामुळेही हा तलाव पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो. वाळकेश्वर येथील ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराला महाराष्ट्र सरकारने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून ब वर्ग पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे. तेथे विविध धार्मिक विधी, पितृपक्षाचे विधी, श्राद्ध यासाठी भाविकांची गर्दी होत असते. तलाव परिसरात असंख्य मंदिरे असून त्याची देखभाल गौड सारस्वत ब्राह्मण टेम्पल ट्रस्टतर्फे केली जाते.

हेही वाचा >>>ब्रिटिश नाही तर औरंगजेब ठरला होता हीरामंडीच्या ऱ्हासास कारणीभूत; संजय लीला भन्साली यांच्या कथानकात किती सत्य?

बाणगंगा पुनरुज्जीवन प्रकल्प कसा आहे?

बाणगंगा तलावाचे पुनरुज्जीवन मुंबई महापालिका करत असली तरी या कामासाठी पुरातत्त्व विभाग आणि जीएसबी टेम्पल ट्रस्ट यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. पालकमंत्री आणि स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या प्रकल्पात विशेष पुढाकार घेतला आहे. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात तलाव परिसरातील झोपड्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. या झोपड्यांमुळे तलावाला बकाल रूप आले होते. या कामादरम्यान ढिगाऱ्याखाली गाडलेल्या रामकुंडाचाही शोध लागला. आता रामकुंडाचेही पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. तसेच आता सुशोभीकरणाची कामेही हाती घेण्यात येणार आहेत. 

प्रकल्पांतर्गत कोणती कामे केली जाणार?

या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात तलावाच्या दगडी पायऱ्यांची सुधारणा करणे, दीपस्तंभांचे नूतनीकरण, विद्युत रोषणाई व लेझर शो, तलावाच्या सभोवतालचा मार्ग भक्ती मार्ग म्हणून विकसित करण्यात येणार आहे. तलावाकडे जाणारे रस्ते तयार करणे, दगडी पायऱ्यांवरील अतिक्रमणे हटवणे ही कामे आहेत. दुसऱ्या टप्प्यात तलावातून दिसणाऱ्या इमारतीची एकसमान पद्धतीने रंगरंगोटी करणे, तलावाला लागून असलेल्या इमारतील भित्तीचित्रे व शिल्पे बसवणे, रामकुंड पुनरुज्जीवित करणे, मंंदिराचा सर्वंकष विकास आराखडा तयार करणे ही कामे आहेत. तर तिसऱ्या टप्प्यांत बाणगंगा ते अरबी समुद्र या दरम्यान विस्तृत मार्गिका बांधणे व त्या जागेत असलेल्या झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करणे ही कामे हाती घेतली जाणार आहेत. दीपस्तंभ आणि पुरातन वारसा जतन (हेरिटेज) करण्याची कामे पुरातत्व विभागाच्या सूचनेनुसार प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार शशी प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.

हेही वाचा >>>फ्रान्सच्या राजकारणाला ‘उजवीकडे’ घेऊन जाणाऱ्या मारीन ल पेन कोण? अध्यक्ष माक्राँ यांनाही डोकेदुखी ठरणार?

प्रकल्पाचे काम जोखमीचे का?

या प्रकल्पाचे काम करताना तलाव परिसराचे नैसर्गिक, पुरातन अस्तित्व अबाधित राहील याची काळजी घेतली जात आहे. दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन करताना त्यांच्या रचनेला कोणतीही हानी पोहोचू नये आणि त्याचे तत्कालीन रूप आहे तसेच दिसावे, यासाठी मूळ वास्तूच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या नैसर्गिक पदार्थांचा वापर करण्यात आला आहे. उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा बांधकामात वापर करण्यात आला आहे. तलावातील गाळ काढताना तलावाच्या तळाशी तसेच आसपास असलेल्या पुरातन दगडांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुरातत्त्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली कुशल मनुष्यबळाच्या साहाय्याने गाळ काढण्यात आला आहे.

पायऱ्यांचे नुकसान कसे झाले? 

अनेक वर्षांपासून विविध कारणांमुळे तलावाच्या पायऱ्या, पायऱ्यांचे दगड, दीपस्तंभांची दुरवस्था झाली होती. तसेच तलाव परिसरात पायऱ्यांवर बांधकामे झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशानुसार मुंबई महानगरपालिकेमार्फत बाणगंगा तलाव व परिसर पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत तलावातील गाळ काढण्यासाठी हस्तचलित यंत्रणा वापरण्याची अट कंत्राटात घालण्यात आली होती. मात्र कंत्राटदाराने जून महिन्यात गाळ काढण्याचे काम वेगाने करण्यासाठी उत्खनन यंत्र बाणगंगा तलावाच्या उत्तर दिशेच्या प्रवेशद्वाराने उतरवले. त्यामुळे पायऱ्यांचे नुकसान झाले. बाणगंगा प्रकल्पाचे कंत्राटदार मे. सवानी हेरिटेज कन्झर्वेशन प्रायव्हेट लिमिटेड यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. तसेच कंत्राटदाराविरोधात पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. कंत्राटदाराला महानगरपालिकेच्या वतीने कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.