संदीप नलावडे
रशिया आणि युक्रेन यांच्यात गेले वर्षभर चाललेल्या युद्धात हजारो नागरिक मारले गेले, अनेक रहिवाशांनी स्थलांतर केले. मात्र तरीही हे युद्ध थांबत नसल्याचे दिसून येत आहे. आता रशिया आणि युक्रेन यांच्यात बाख़्मुत या लहान शहरावरील ताबा मिळविण्यासाठी भीषण संघर्ष सुरू झालेला आहे. बाख़्मुत या शहरात असे काय आहे, याविषयी..
बाख्म्मुतचे भौगोलिक / आर्थिक स्थान काय ?
बाख़्मुत हे शहर युक्रेनच्या पूर्व सीमावर्ती डॉनेत्स्क प्रांताचा भाग आहे. युक्रेनच्या पूर्वेकडला रशियालगतचा, रशियन भाषकांची संख्या अधिक असणारा जो औद्योगिकदृष्टय़ा प्रगत टापू डोन्बास म्हणून ओळखला जातो, तेथून बाख़्मुत ओलांडल्यावर युक्रेनच्या अन्य भागांत जाण्यासाठी बरेच मार्ग आहेत कारण हा भाग खनिज संपत्तीने समृद्ध आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी या शहराची लोकसंख्या ७० ते ८० हजार होती. मात्र युक्रेनच्या उपपंतप्रधान इरिना वेरेश्चुक यांनी गेल्या महिन्यात सांगितले की, ३८ लहान मुलांसह चार हजारपेक्षा कमी नागरिक सध्या या शहरात शिल्लक आहेत. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस संस्थेच्या म्हणण्यानुसार, या युद्धात वाचलेले या शहरातील अनेक नागरिक भूमिगत आश्रयस्थानांत असून आपले अस्तित्व शोधत आहेत. या शहराने याआधीही युद्धाच्या जखमा पाहिल्या आहेत. दुसऱ्या महायुद्धात नाझी सैनिकांनी ३,००० ज्यूंना जवळच्या खाणींमध्ये गुदमरून मारले होते. हे शहर तूर्त रशियाच्या ताब्यात असले तरी युक्रेनने ते परत मिळविण्यासाठी जोरदार लढाई सुरू केली असून रशियाही येथून सहजासहजी हटण्यास तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून केवळ या शहरासाठी दोन्ही देशांमध्ये घनघोर संघर्ष सुरू आहे.
हे शहर आत्ता कोणाच्या ताब्यात?
बाख़्मुत शहराच्या केंद्रीय भागासह दोनतृतीयांश भागावर ताबा मिळविल्याचा रशियाचा दावा आहे. मात्र या शहराच्या रक्षणाचे वचन युक्रेनने स्थानिक नागरिकांना दिले असून दोनही बाजूने जीवितहानी होत असतानाही या भीषण लढाईत ते गुंतले आहेत. बाख़्मुत शहराच्या मधोमध वाहणारी लहान नदी आता युद्धाचे नवे केंद्र बनली आहे. युक्रेनने या शहराचा बराचसा ताबा मिळवला असून व्यापक स्वरूपात नुकसान होत असतानाही दोन्ही देश मागे हटायला तयार नाहीत. काही परदेशी लष्करी विश्लेषकांच्या मते युक्रेनियन सैन्याने युद्धात आघाडी घेतली असून ते मागे हटण्यास तयार नाहीत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी ‘किल्ले बाख़्मुत’ हे ‘प्रतिकाराचे प्रतीक’ म्हणून घोषित केले असून त्याद्वारे रशियन सैनिकांवर मारा केला जात आहे.
युद्धात आतापर्यंत किती सैनिकांचा मृत्यू?
या युद्धात किती सैनिकांचा आणि स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला याची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी दोन्ही बाजूंच्या मृतदेहांनी विखुरलेल्या रणांगणाच्या प्रतिमा समाजमाध्यमांवर समोर आल्या आहेत. रशियाप्रणीत ‘वॅग्नर ग्रूप’ या खासगी निमलष्करी दलाचे संस्थापक येव्हगेनी प्रिगोझिन यांनी त्यांच्या मृत सैनिकांचे चित्र प्रकाशित केले आहे. अमेरिकी अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की मारले गेलेले हजारो रशियन वॅग्नरने नियुक्त केलेले आहेत. मात्र रशियन अधिकारी सांगतात की, रशियाने १५ ते २० हजार युक्रेनियन सैनिकांना ठार केले आहे. कोनराड मुझिका या पोलिश लष्करी विश्लेषकाने सांगितले की त्यांनी काही दिवसांपूर्वीच, मार्चमध्ये सहकाऱ्यांसह बाख़्मुत क्षेत्राला भेट दिली होती. ‘‘बाख़्मुतचा बचाव करण्याचा निर्णय लष्करी नव्हे तर राजकीय आहे,’’ असे मुझिका म्हणाले.
याच शहरासाठी रशियाचा आटापिटा का?
बाख़्मुत शहर एक प्रादेशिक वाहतूक आणि उद्योगाचे केंद्र आहे. त्यामुळे त्याच्यावर ताबा असणे रशियासाठी महत्त्वाचे आहे. जरी सध्या युद्धामुळे या शहरातील पायाभूत सुविधा नष्ट झाल्या असल्या तरी या शहरावरील ताबा सुटू न देण्याचा रशियाचा आटोकाट प्रयत्न आहे. क्रॅमतोस्र्क आणि स्लोव्हियन्सक ही नजीकची दोन शहरे रशियाच्या ताब्यात असून या शहरांचा आधार घेत रशिया युद्धाच्या माध्यमातून बाख़्मुत शहराचा ताबा मिळविण्याचा प्रयत्न करेल.
बाख़्मुत शहरालगत जिप्सम आणि मिठाच्या खाणी आहेत. या खाणी ताब्यात ठेवणे रशियासाठी अधिक फायदेशीर आहे. वॅग्नर दलाचे प्रमुख्य प्रिगोझिन यांच्या मते या खाणींवर ताबा मिळविला तर त्यातून मिळणाऱ्या खनिज संपत्तीद्वारे युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई करता येईल. मात्र या खाणी महत्त्वाच्या असल्याने युक्रेनही सहजासहजी त्यांचा ताबा रशियाकडे देणे शक्य नाही.