मुंबईतील इमारतींच्या छताच्या कोनाड्यात एक विशिष्ट आवाज करीत विसावणारी कबुतरे आता नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक बनू लागली आहेत. कबुतरांना खाद्य उपलब्ध करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, परंतु याच कबुतरांमुळे आता नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढू लागल्या आहेत. यामुळे दादरमधील कबुतरखाना बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. कबुतरांमुळे आरोग्यावर होणारे परिणाम काय, ते किती गंभीर असून शकतात, कबुतरखाने बंद का व्हावेत याचा आढावा.
कबुतरांची संख्या दिवसेंदिवस का वाढते?
इतर पक्ष्यांच्या तुलनेत कबुतरांची संख्या वाढण्याचा वेग अधिक आहे. कबुतरांनी मानवी वस्त्यांमधील इमारतींच्या कानाकोपऱ्यात घरटी बनवून राहणे पसंत केले आहे. याचबरोबर नागरिकांकडून पुरेसे खाद्य उपलब्ध होत असल्यानेही शहरी भागात कबुतरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
कबुतरांच्या विष्ठेतून पसरणारी बुरशी धोकादायक?
कबुतरांच्या विष्ठेत बुरशी आणि जीवाणू असतात. ज्यामुळे लोकांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. कबुतरांच्या विष्ठेत अस्परजिलस आणि क्रायटोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा पडलेल्या मातीत ही बुरशी सापडते. कबुतरांची विष्ठा आणि पंख प्रामुख्याने श्वसनाच्या आजारांना कारणीभूत आहेत. यामुळे अलर्जी होऊ शकते. दमादेखील होण्याची शक्यता असते.
कबुतरांच्या विष्ठेमुळे होणारे आजार कोणते?

कबुतरांच्या विष्ठेमुळे राइनायटिस, त्वचाविकार, डोळे लाल होणे, सायनसायटिया यांसारखे आजार होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, कबुतरांच्या विष्ठेमुळे श्वसनाचे विकार वाढल्याचे दिसून आले आहे. या विकारांचे वेळीच निदान आणि उपचार केले नाहीत तर ते गंभीर शक्यता असते. याचबरोबर विष्ठेमुळे हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनिया,श्वसननिलिकेला सूज येणे, फुफ्फुसांना सूज येणे, क्रॉनिक ऑबस्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (श्वसनमार्गाचे गंभीर आजार) यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. कफ, सर्दी, श्वास घेण्यास अडथळा ही श्वसनाच्या विकारांचा त्रास ही कबुतरांच्या विष्ठेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणं आहेत.

मुंबईतील कबुतरखाने बंद होणार?

मुंबईत कबुतरांच्या विष्ठेची समस्या काही वर्षांपूर्वी राजकीय मुद्दा बनला होता. मनसेच्या पर्यावरण सेनेने लोकांच्या आरोग्याला त्रास होत असल्याने दादर कबुतरखाना बंद करण्याची मागणी काही वर्षांपूर्वी  केली होती.कबुतरांच्या वाढत्या त्रासामुळे खार परिसरातील रहिवाशांनीही कबुतरखाना बंद करण्याची मागणी केली होती. त्यानंतर पालिकेने खारचा कबुतरखाना बंद केला होता. आता पुन्हा दादरचा कबुतरांना बंद करावा ही मागणी जोर धरू लागली आहे.‌ कबुतरांच्या विष्ठमुळे मुंबईत दोन महिलांची फुफ्फुसे निकामी झाल्याची घटना २०२० मध्ये घडली होती.

मुंबईतील कबुतरखाने धोकादायक का?

मुंबईतील हवेत आद्रता जास्त असल्याने आणि कबुतरांची संख्या खूप असल्याने कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे होणाऱ्या आजारांचे रुग्ण आढळून येतात. यामुळे तज्ज्ञांच्या मते, मुंबईत कबुतरखाने हे धोकादायकच आहेत. ते स्थलांतर करण्याऐवजी समूळ नष्ट करावेत. नाहीतर यामुळे भविष्यात मुंबईकरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘पेटा’ संस्थेने काय उपाय सुचवला?

प्राणी व पक्षी संरक्षणासाठी काम करणाऱ्या ‘पेटा’ संस्थेने कबुतरांची संख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाय सुचविले आहेत. कबुतरांचे खाद्य कमी करावे. खाद्य कमी झाल्यास कबुतरांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल. एक कबुतर वर्षात ४ ते ६ वेळा अंडी घालते. एका वेळेला किमान दोन पिले जन्माला येतात. खाद्याचा पुरवठा कमी झाल्यास कबुतर वर्षाला एकदा अथवा दोनदाच अंडी घालू शकतील. त्याचबरोबर खाद्याची टंचाई असेल, तर कबुतरे पिलांना जन्म देणे टाळतील. यातून त्यांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल, असे ‘पेटा’ने म्हटले आहे.