नेरुळ येथील डीपीएस चाणक्य तलावात येणारा पाण्याचा स्रोत बंद केल्याने अलीकडेच काही दिवसांपूर्वी याठिकाणी फ्लेमिंगोंच्या (रोहित) मृत्यूची घटना घडली. त्यानंतर मुंबईत विमानाच्या धडकेत फ्लेमिंगोंचा मृत्यू झाला. या पक्ष्यांचा अधिवास आणि भ्रमणमार्ग दोन्हीही असुरक्षित झाले असून धोक्यात आले आहेत. त्याविषयी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लेमिंगो किती उंच, वेगाने उडू शकतात?

फ्लेमिंगोंचे उडणे हे वाऱ्याची दिशा आणि त्यांच्या पंखाची ताकद यावर अवलंबून असते. तसेच त्यांना कुठे पोहोचायचे आहे, यावरदेखील ते किती उंचीवरून उडतात हे अवलंबून असते. अंतर कमी असेल तर ते सुमारे ३५ मैल प्रति तास वेगानेदेखील उडतात. तर लांब अंतरावर ते ४० मैल प्रतितास उडतात. दक्षिण अमेरिकेत ते २० हजार फुटांवर उडताना दिसून आले आहेत. समुद्रावरून साधारण ते फार वरून उडत नाहीत. जमिनीवर किंवा उथळ पाण्यात ते धावत उडतात. जेव्हा त्यांना जोरदार वाऱ्याचा सामना करावा लागतो, तेव्हा ते एक पंख फडफडवून उडू शकतात.

हेही वाचा – अभिनेत्री लैला खान खून प्रकरणी सावत्र पित्याला फाशी… काय होते प्रकरण?

फ्लेमिंगो समूहाने का स्थलांतर करतात?

फ्लेमिंगो समूहानेच राहतात आणि समूहानेच स्थलांतर करतात. त्यांच्या या समूहाला ‘फ्लॅम्बॉयन्स’ म्हणतात. समशीतोष्ण प्रदेशात प्रजनन करणारे फ्लेमिंगो प्रजनन हंगामानंतर उष्ण हवामानात स्थलांतर करतात. अन्न शोधण्यासाठी ते ओल्या जमिनीच्या शोधात मोठ्या प्रमाणावर फिरतात. समूहाने उडतानादेखील ते ‘व्ही’ आकारात उडतात. यामागचे कारण म्हणजे त्यांची उर्जा वाचवण्यास मदत होते. प्रत्येक पंख फडफडवून ते हवा मागे पाठवतात. यामुळे त्यांच्यामागे येणाऱ्या पक्ष्यांना मदत होते.

फ्लेमिंगो संकटात आहेत का?

किनाऱ्यावरील विकास आणि खाणकामामुळे फ्लेमिंगोंना त्यांचा अधिवास नष्ट होण्याचा आणि ऱ्हासाचा सामना करावा लागतो. याशिवाय तेल गळती आणि इतर प्रदूषण यासोबतच चारा किंवा घरटे बनवण्याच्या जागेवर असणाऱ्या वीजवाहिन्यांशी त्यांची टक्कर होते. नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण खाडी किनारा पसरला असल्याने याठिकाणी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो येतात. तसेच नेरुळ येथील चाणक्य तलाव आणि डीपीएस स्कूलच्या शेजारील तलावात ते मोठ्या प्रमाणावर उतरतात. मात्र त्यांचा हा नैसर्गिक अधिवास खासगी विकासक बळकावण्याच्या प्रयत्नात आहेत. फ्लेमिंगोंसाठी आरक्षित असलेली पाणथळ जागा निवासी संकुल बांधण्यासाठी मिळावी याकरिता प्रयत्न सुरू आहेत. सुमारे ३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून येथे निवासी क्षेत्र उभे राहणार आहे.

फ्लेमिंगो अभयारण्य का तयार करण्यात आले?

मुंबईत स्थलांतर करून येणाऱ्या फ्लेमिंगोंसाठी ठाणे आणि वाशीच्या खाडीपट्ट्यात १,६९० हेक्टरचे फ्लेमिंगो अभयारण्य तयार करण्यात आले आहे. त्यामुळे या पक्ष्यांना हक्काचे घर मिळाले आहे. हे फ्लेमिंगो बघण्यासाठी ऐरोलीच्या खाडीतून बोटीने जाता येते. ओहोटीच्या वेळी बोटीने खाडीत गेले की उथळ पाण्यातल्या दलदलीत खाद्य टिपणारे फ्लेमिंगो पहायला मिळतात. मुंबई शहरात साधारणपणे १९९७ पासून हे फ्लेमिंगो मोठ्या प्रमाणात येत आहेत. आधी ते शिवडीच्या जेट्टीजवळ हजारोंच्या संख्येने दिसायचे. मात्र, शिवडी-न्हावाशेवा या सागरी सेतूच्या बांधकामामुळे त्यांचा हा अधिवास धोक्यात आला. त्यामुळे मग त्यांच्यासाठी अभयारण्य तयार करण्यात आले.

हेही वाचा – इस्रायलच्या राजधानीवरच हमासच्या कासम ब्रिगेड्सकडून रॉकेटहल्ला… काय आहे कासम ब्रिगेड्स? त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रे कशी?

फ्लेमिंगोंचा मूळ अधिवास कुठे?

मुंबईत येणाऱ्या फ्लेमिंगोंचा मूळ अधिवास कच्छच्या रणांमध्ये आहे. मानवी सहवासापासून दूर असलेल्या तिथल्या खाऱ्या दलदलीत हजारो फ्लेमिंगो राहतात. त्यांचे प्रजननदेखील त्याच ठिकाणी होते. त्यामुळे या भागाला ‘फ्लेमिंगो सिटी’ असेही म्हटले जाते. हिवाळ्यात, नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला खाद्याच्या शोधात ते मुंबईच्या दिशेने येतात. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची तपकिरी रंगाची पिल्लेदेखील पाहायला मिळतात. मुंबईच्या किनाऱ्यावर ती मोठी होतात आणि परतीच्या प्रवासात त्यांच्या पंखांना लालसर छटा येते. पावसाळा सुरू होण्याआधी ते पुन्हा त्यांच्या मुळ अधिवासात म्हणजेच कच्छच्या रणाकडे परततात.

फ्लेमिंगोंच्या संरक्षणासाठी कोणते पाऊल?

गेल्या दोन दशकांपासून फ्लेमिंगो पक्षी कच्छचे रण ते मुंबई आणि पुन्हा कच्छचे रण असा प्रवास करत आहेत. मुंबईतील ते ज्याठिकाणी स्थलांतर करतात, तो त्यांचा स्थलांतराचा अधिवास संरक्षित राहावा म्हणून दहा वर्षाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. फ्लेमिंगो हे एक निमित्त असून यानिमित्ताने इथली खारफुटी आणि पाणथळ जागांमध्ये येणारे सुमारे १५० प्रजातीच्या पक्ष्यांचेही संरक्षण होणार आहे. त्याचवेळी या पक्ष्यांच्या अधिवासावर होणाऱ्या विकासकांच्या अतिक्रमणाला परवानगी देऊ नये, अशी मागणी पर्यावरणवादी करत आहेत.

rakhichavhan@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the habitat and flight path of flamingo bird in danger how safe is mumbai thane navi mumbai for flamingos print exp ssb