Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज हे भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. सध्या प्रयागराजमध्ये दुर्मीळ महाकुंभ मेळ्याची तयारी सुरु आहे. हा मेळा १३ जानेवारीपासून सुरू होऊन २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. हिंदू धर्मात विशेष धार्मिक महत्त्व असलेला हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र, यावेळी तो अधिक विशेष आहे, कारण १४४ वर्षांनंतर होणाऱ्या दुर्मीळ ग्रहस्थितीमुळे या कुंभमेळ्याला आगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
कुंभमेळा हा जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळा मानला जातो. दर १२ वर्षांनी हरिद्वार, नाशिक, उज्जैन आणि प्रयागराज या चार पवित्र स्थळांपैकी एका ठिकाणी त्याचे आयोजन केले जाते.
हिंदू धर्मातील कुंभमेळ्याचे महत्त्व
लाखो भक्त या पवित्र तीर्थस्थळांना भेट देतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करून आपल्या पापक्षालनासाठी या मेळ्यात सहभागी होतात. हिंदू पुराणांनुसार, कुंभमेळ्याचा उगम “समुद्रमंथना”च्या पौराणिक घटनेतून झाला आहे. अमरत्व प्राप्त करण्यासाठी देव-दानवांनी क्षीरसागराचे मंथन केले आणि त्यातून अमृताचा कुंभ (घडा) बाहेर आला. परंतु, अमृतावर हक्क सांगण्यासाठी देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला. दानवांच्या हातून अमृत वाचवण्यासाठी इंद्रपुत्र जयंताने अमृताचा कुंभ चंद्रदेवाकडे सुपूर्द केला. मात्र, चंद्रदेवाच्या हातून अमृताचे काही थेंब प्रयागराज, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे सांडले. त्यामुळेच पापक्षालन आणि मुक्तीसाठी या चार ठिकाणी कुंभमेळ्याचे आयोजन होऊ लागले आणि ही ठिकाणे पवित्र तीर्थक्षेत्रे म्हणून ओळखली जाऊ लागली.
अधिक वाचा: नागा साधू कोण आहेत? त्यांचा कुंभमेळ्याशी काय संबंध? त्यांनी हिंदू धर्माचे रक्षण कसे केले?
अमृत कुंभासह पलायन…
या ठिकाणी १२ वर्षांनी कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. याच संदर्भात टिकरमाफी आश्रमाचे प्रमुख महंत हरिचैतन्य ब्रह्मचारी महाराज यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले की, “जयंत (इंद्राचा पुत्र) अमृताने भरलेला कुंभ घेऊन पळाला. अमृताचे संरक्षण करण्यासाठी म्हणून जयंताला साथ देण्यासाठी चार देवांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. सूर्याला कुंभ धरण्याची जबाबदारी देण्यात आली, चंद्राला अमृत सांडू नये याची काळजी घेण्याचे काम देण्यात आले, बृहस्पतीला (गुरू) जयंताचे असुरांपासून रक्षण करण्यासाठी नेमण्यात आले आणि शेवटी शनिला कोणत्याही संघर्षात मध्यस्थ म्हणून भूमिका बजावण्याचे काम सोपवण्यात आले.”
कुंभमेळ्याला विशेष महत्त्व कशासाठी?
सूर्य, चंद्र, शनी आणि बृहस्पती जेव्हा अमृताच्या कुंभाचे संरक्षण करण्यासाठी धावले, तेव्हा एक दुर्मीळ ग्रहस्थिती आणि नक्षत्र योग तयार झाला. याच वेळी सनक, सनंदन, सनातन आणि सनत्कुमार या चार ऋषींनी प्रयाग येथे ठाण मांडण्याचा निर्णय घेतला. महंत हरिचैतन्य यांच्या म्हणण्यानुसार, “याच घटनेपासून आपण आज ‘कुंभ’ म्हणून ओळखत असलेल्या संकल्पनेचा प्रारंभ झाला.” महंत पुढे सांगतात, “१४४ वर्षांनंतर सूर्य, चंद्र, शनी आणि बृहस्पती या चार ग्रहांची एकाच रेषेत विशेष ग्रहस्थिती यंदा २०२५ साली होत आहे. विशेष म्हणजे, २९ जानेवारीच्या अमावस्येच्या तीन तास आधी ‘ पुष्यनक्षत्र’ देखील या ग्रहस्थितीसोबत संरेखित होईल. त्यामुळे २०२५ मधील महाकुंभ हा गेल्या १४४ वर्षांतील सर्वात शुभ महाकुंभ मानला जात आहे.” हिंदू धर्मीयांचा असा विश्वास आहे की, कुंभमेळ्याच्या काळात या चार पवित्र ठिकाणी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मानवाला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते.
कुंभमेळ्याचा पहिला ऐतिहासिक उल्लेख
इतिहासात कुंभमेळ्याचा पहिला उल्लेख सातव्या शतकातील चिनी प्रवासी हयू एन त्सांगच्या लिखाणात आढळतो. तो भारतात प्रवास करत असताना त्याने प्रयागराजातील त्रिवेणी संगमाचे वर्णन केले आहे. येथे गंगा, यमुना आणि काल्पनिक सरस्वती नद्यांचा संगम होतो. त्याच्या नोंदीनुसार, सुमारे ५ लाख भाविक प्रयागराज येथे भव्य उत्सवात सहभागी होण्यासाठी प्रवास करत आणि पवित्र जलात स्नान करत. हा उल्लेख कुंभमेळ्याशी मिळता जुळता आहे. तरी याबद्दल इतिहासकारांमध्ये एकमत नाही.
महाकुंभ इतर कुंभमेळ्यांपेक्षा वेगळा कसा?
जेव्हा १२ कुंभमेळे पूर्ण होतात तेंव्हा महाकुंभ साजरा केला जातो. त्यामुळे तो १४४ वर्षांतून एकदाच आयोजिण्यात येतो. कुंभमेळा दर चार वर्षांनी हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक येथे आयोजित केला जातो. यंदाचा कुंभमेळा हा १४४ वर्षांनी आलेला महाकुंभ आहे.
त्रिवेणी संगमावर महाकुंभ
महाकुंभाचे आयोजन उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे त्रिवेणी संगमावर केले जाते. नाशिकमध्ये गोदावरीच्या काठावर, उज्जैनमध्ये क्षिप्रा नदीच्या काठावर आणि हरिद्वारमध्ये गंगेच्या काठावर कुंभमेळा पार पडतो. कुंभमेळा आणि महाकुंभ या व्यतिरिक्त अर्धकुंभ आणि पूर्णकुंभमेळ्यांचे आयोजनही या पवित्र ठिकाणी केले जाते.
अर्धकुंभ मेळा
दर सहा वर्षांनी फक्त हरिद्वार आणि प्रयागराज येथे आयोजित केला जातो.
अधिक वाचा: औरंगजेबावरही मात करणाऱ्या ‘या’ हिंदू संन्याशांचा इतिहास दुर्लक्षित का?
पूर्णकुंभ मेळा
दर १२ वर्षांनी प्रयागराजच्या संगमावर आयोजित केला जातो.
या दोन्ही कुंभ मेळ्यांची प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे पवित्र नदीत स्नान करून पापक्षालन करणे. कुंभ मेळ्याचे स्थान आणि तारीख ठरवण्यासाठी वेगवेगळ्या आखाड्यांचे प्रमुख तसेच ज्योतिषी सूर्य व बृहस्पतीच्या स्थितींचा अभ्यास करतात. बृहस्पती १२ वर्षांत एकदा सूर्याभोवती परिभ्रमण करतो, त्यानुसार १२ वर्षांच्या कालावधीत चार वेळा कुंभमेळा आयोजित केला जातो.
कुंभमेळ्याचे ठिकाण कसे ठरवले जाते?
कुंभमेळा कोणत्या पवित्र स्थळी होईल हे ग्रहांच्या ज्योतिषशास्त्रीय स्थितीवर आधारित असते.
प्रयागराज: जेव्हा बृहस्पती सूर्याबरोबर वृषभ राशीत आणि चंद्र मकर राशीत असतो तेव्हा प्रयागराज येथे कुंभमेळा आयोजित केला जातो .
हरिद्वार: बृहस्पती कुंभ राशीत, चंद्र धनु राशीत आणि सूर्य मेष राशीत असतो तेव्हा हरिद्वार येथे कुंभमेळा आयोजित केला जातो.
उज्जैन: बृहस्पती सिंह राशीत प्रवेश करतो आणि सूर्य व चंद्र मेष राशीत असतात तेव्हा उज्जैन येथे कुंभमेळा आयोजित केला जातो.
नाशिक: बृहस्पती सिंह राशीत राहतो, तर सूर्य आणि चंद्र कर्क राशीत प्रवेश करतात त्यावेळेस नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते.
पेशवाई मिरवणूक
कुंभमेळ्यात अनेक विधी आयोजित केले जातात. यामध्ये पारंपरिक पेशवाई मिरवणुकीचा समावेश असतो. या मिरवणुकीत घोडे, रथ, हत्ती, चमचमणाऱ्या तलवारी आणि नागा साधूंचा समावेश असतो. शाही स्नान (राजस्नान) हे या मेळ्याचे प्रमुख आकर्षण असते.
२०२५ मधील महाकुंभ
या वर्षी प्रयागराज येथील महाकुंभमध्ये सुमारे ४० ते ४५ कोटी भक्त सहभागी होतील असा अंदाज आहे. ४४ दिवस चालणाऱ्या या उत्सवात भक्त मोठ्या संख्येने सहभागी होऊन धार्मिक विधी आणि स्नान करतील. एकूणच यामुळे परिसरातील पर्यटनालाही मोठी चालना मिळणे अपेक्षित आहे.