राखी चव्हाण

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मार्च महिना आला की राज्यात सर्वानाच उन्हाळय़ाची चाहूल लागणे, ही सामान्य घटना! परंतु गतवर्षी १४ मार्चला मुंबई आणि कोकणात आलेल्या उष्णतेच्या लाटेने सर्वाचे लक्ष वेधले. यावर्षीदेखील ऐन मार्च महिन्यातच उष्णतेच्या लाटेचा इशारा मिळाला. तर मार्चचा पहिला आठवडा संपत नाही तोच आता हवामान खात्याने पावसाचाही इशारा दिला आहे. त्यानंतर तापमानात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

तापमानवाढीची कारणे कोणती?

लोकसंख्यावाढ, त्यामुळे उपलब्ध पाण्याची विभागणी होणे, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड, पर्यायी झाडे न लावणे, सिमेंटची बांधकामे, रस्ते, पदपथ आदी बांधकामांमुळे पावसाचे पाणी जमिनीत न मुरणे, भूगर्भातून पाण्याचा प्रचंड उपसा केला जाणे, औद्योगिकीकरण इत्यादी कारणांमुळे तापमानात प्रचंड वाढ होत आहे. हरितगृह वायू उष्णता पृथ्वीच्या वातावरणातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करतात, परिणामी तापमानात वाढ होते. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यावर जगभरात भर देऊनही तापमान वाढतच आहे.

अलीकडे मुंबईदेखील का तापत आहे?

हवामानाची स्थिती आणि जागतिक तापमानवाढ या मुळात दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या दिवशी मुंबईत ऊन जास्त आहे की कमी याचा थेट संबंध त्या भागातील हवामानाच्या परिस्थितीशी असतो. मागील वर्षी मार्चच्या मध्यावर मुंबईत उष्णतेची लाट आली होती. मुंबई आणि कोकणातील कमाल तापमान हे अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे ( हे वारे जमिनीवरून समुद्राच्या दिशेने वाहणाऱ्या वाऱ्यांच्या तुलनेत थंड असतात) नियंत्रित राहाते. जमीन ही समुद्रापेक्षा लवकर तापते, त्यामुळे जमिनीवर दिवसा कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. तुलनेत समुद्रावर हवेचा दबाव अधिक असतो ज्यामुळे वारे हे समुद्राकडून जमिनीकडे म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. परंतु वर्षभरात अनेकदा (प्रामुख्याने पावसाळा वगळता) हवामानाच्या परिस्थितीमुळे वारे पूर्वेकडून वाहतात, ज्यामुळे मुंबई अथवा कोकणातील तापमानात लक्षणीय वाढ होते.

भारतातील तापमान आणि हवामान बदल..

२०२० मध्ये केंद्र सरकारच्या भूविज्ञान मंत्रालयाने ‘अ‍ॅसेसमेंट ऑफ क्लायमॅट चेंज ओव्हर द इंडियन रीजन’ नावाचे पुस्तक प्रकाशित केले. ज्यात भारतातील तापमान आणि एकंदरीत हवामानात कसा बदल झाला आहे आणि भविष्यात काय बदल अपेक्षित आहे, हे सांगितले आहे. १९०१ ते २०१० दरम्यान भारतातील एकूण वार्षिक सरासरी तापमानात वाढ झाली आहे. ही वाढ १९८६ ते २०१५ या काळात ०.१५ अंश प्रति दशक इतकी आहे. याच काळात सर्वच ऋतूंतील तापमानात वाढ झाली, परंतु उन्हाळय़ात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. भारतातील विविध विभागांचा विचार करता, उत्तर भारत आणि ईशान्य भारतात सर्वाधिक तापमान वाढ नोंदवण्यात आली. उन्हाळय़ात ती ०.५ अंश सेल्सिअस प्रति १० वर्षे इतकी लक्षणीय आहे. त्या तुलनेत दक्षिण भारतातील तापमानात सर्वात कमी वाढीची नोंद झाली. उष्णतेच्या लाटांचा विचार केला तर भारतातील इतर भागांपेक्षा मध्य आणि उत्तर भारतातील तापमानाच्या तीव्रतेत अधिक वाढ झाल्याचे दिसते.

महाराष्ट्रात तापमानवाढ किती झाली?

महाराष्ट्र राज्याचा विचार करता १९८६ ते २०१५ या काळात वार्षिक कमाल तापमानात ०.३ अंश प्रति दशक इतकी वाढ झाली. हिवाळ्यात दक्षिण मराठवाडा, दक्षिण विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ०.५ अंश प्रति दशक इतकी वाढ झाली. मुंबई शहरात १९७३ ते २०२० दरम्यान तापमान ०.२५ अंश प्रति दशक इतके वाढले. हे आकडे फार मोठे वाटत नसले तरी, त्यांच्यामुळे हवामानावर आणि आरोग्यावर परिणाम होईल इतके तीव्र ते नक्कीच आहेत.

मार्च महिन्यात कमाल व किमान तापमानात तफावत का?

मार्च महिन्यात कमाल व किमान तापमानात बरेच अंतर असते. हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याचा हा काळ असतो. या महिन्यात तापमानात दररोज वाढ होऊन ते महिन्याच्या मध्यापासून शेवटपर्यंत ३६ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचते. सरासरी आद्र्रता २४ ते ४१ पर्यंत असते. किमान तापमान १९ अंश सेल्सिअस असते, तर कधी कधी ते १० अंश सेल्सिअसपेक्षाही कमी होते. याच महिन्यात बरेचदा ढगाळ वातावरण असते. कधी ढगांचा गडगडाट होतो तर कधी मुसळधार पाऊसदेखील पडतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the month of march so inflammatory print exp 0323 amy