अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून बेघरांवर, विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होत आहे. जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून बेघर व्यक्तींची संख्या वाढत आहे. हे हल्ले का होत आहेत आणि बेघर व्यक्तींची संख्या का वाढत आहे ते पाहू या.
अमेरिकेत बेघरांची समस्या पुन्हा ऐरणीवर का आली?
मनोरंजन उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या लॉस एंजेलिस या ग्लॅमरस शहरामध्ये नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये एका ‘सीरियल किलर’ने किमान चौघांचा खून केल्याच्या संशयावरून त्याला अटक करण्यात आली. हा हल्लेखोर रात्रीच्या वेळी शहराच्या गल्लीबोळातून फिरत होता आणि त्याला दिसणाऱ्या बेघर व्यक्तींवर बंदुकीने गोळीबार करत होता असे पोलिसांना तपासात आढळले होते. त्याने खून केलेले सर्वजण बेघर होते आणि रात्री शहराच्या एखाद्या कोपऱ्यात उघड्यावरच झोपलेले होते. त्याच सुमाराला कॅलिफोर्नियामध्ये एका व्यक्तीला, एका बेघर माणसाचा तो झोपेत असतानाच खून केल्याच्या आरोपावरून न्यायालयात हजर करण्यात आले. या बातम्यांमुळे अमेरिकेतील लहान-मोठ्या शहरांमध्ये असलेली बेघरांची समस्या पुन्हा समोर आली.
अमेरिकेत बेघर व्यक्तींची संख्या किती आहे?
अमेरिकेच्या गृहनिर्माण आणि नगर विकास विभागाने (यूएस डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट) डिसेंबर २०२३मध्ये काँग्रेसमध्ये ॲन्युअल होमलेसनेस असेसमेंट रिपोर्ट (एएचएआर) सादर केला. या अहवालानुसार, एका रात्री अमेरिकेत साधारण ६ लाख ५३ हजार १०० जण म्हणजेच दर १० हजारांमागे सुमारे २० जण बेघर होते. २००७ मध्ये बेघरांची गणना सुरू झाल्यापासून हे प्रमाण सर्वाधिक आहे. २०२२मध्ये सुमारे पाच लाख ८२ हजार इतके बेघर होते. म्हणजेच एका वर्षामध्ये अमेरिकेतील बेघरांच्या संख्येत १२ टक्क्यांनी वाढली आहे. ही गणना करताना अचूक माहिती मिळावी यासाठी एका रात्री बेघरांची संख्या किती ते मोजले जाते.
बेघरांमध्ये कोणाचे प्रमाण अधिक आहे?
बेघर व्यक्तींमध्ये सर्व वंशांच्या अमेरिकी नागरिक व रहिवाशांचा समावेश आहे. कृष्णवर्णीय, स्थानिक अमेरिकी, स्पॅनिश आणि श्वेतवर्णीय या सर्वांचाच त्यामध्ये समावेश आहे. त्यातही अमेरिकेच्या लोकसंख्येत १३ टक्के नागरिक कृष्णवर्णीय आहेत, त्यापैकी २१ टक्के गरिबीत जगतात. स्वाभाविकच बेघरांमध्ये कृष्णवर्णीयांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ३७ टक्के आहे. तर संपूर्ण कुटुंब बेघर असलेल्यांपैकी पुन्हा कृष्णवर्णीयच सर्वाधिक म्हणजे ५० टक्के आहेत. वयोगटाचा विचार केला तर २०२३मध्ये एका रात्री ३४ हजार ७०० पेक्षा जास्त बेघर तरुण म्हणजे २५ पेक्षा कमी वर्षे वयाचे आढळले आणि ते एकटे होते. तर बेघरांमध्ये वृद्धांची संख्या अधिक आहे.
५५ ते ६४ या वयोगटातील बेघरांची संख्या एक लाखापेक्षा थोडीशीच कमी, ९८ हजार इतकी जास्त आहे. तर ६४ पेक्षा जास्त वर्षे वयाच्या बेघरांची संख्या ३९ हजार ७०० पेक्षा अधिक असल्याचे दिसून आले. दुर्दैवाची बाब म्हणजे ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे ४६ टक्के बेघर हे मनुष्याला राहण्यालायक नसलेल्या जागेत राहत होते.
आशियाई अमेरिकींबद्दल आकडेवारी काय सांगते?
एएचएआरनुसार, २०२२ ते २०२३ या एका वर्षात अमेरिकेतील बेघर व्यक्तींची संख्या जवळपास ७० हजार ६५०ने वाढली. या वाढलेल्या बेघरांच्या लोकसंख्येमध्ये आशियाई अमेरिकी नागरिकांची संख्या ४० टक्के इतकी जास्त आहे.
बेघरांची समस्या शहरी आहे का?
बेघरांपैकी प्रत्येक १० मागे जवळपास सहा जण, म्हणजे ५९ टक्के लोक शहरात राहतात. २३ टक्के बेघर उपनगरीय भागांमध्ये आणि १८ टक्के लोक ग्रामीण भागांमध्ये राहतात. एका अर्थाने ही शहरी समस्या आहे असे म्हणता येईल. डोक्यावर छप्पर नसले तरी शहरांमध्ये तग धरून राहण्याची संधी अधिक मिळते. त्यामुळे ही विभागणी असण्याची शक्यता आहे.
बेघर लोक कशा प्रकारे असुरक्षित असतात?
बेघर लोक सर्वाधिक शारीरिकदृष्ट्या असुरक्षित असतात. विशेषतः रात्री झोपेत असताना त्यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता अधिक असते. माथेफिरूंनी केलेल्या गोळीबारासारख्या घटनांमध्ये त्यांचा जीव जाण्याचा धोका असतो. त्याव्यतिरिक्त त्यांना मारहाणही केली जाते, त्यामध्ये अनेक जण जखमी होतात. स्त्रिया आणि लहान मुलांना लैंगिक शोषणाचाही धोका असतो.
बेघरांच्या समस्येकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टिकोन कसा आहे?
बेघरांच्या समस्येकडे स्वतंत्रपणे पाहता येणार नाही असे अभ्यासक सांगतात. घरांची अपुरी संख्या, गुन्हेगारी टोळ्या आणि अमली पदार्थांशी निगडित हिंसा या सर्व बाबी बेघरपणाशी जोडलेल्या आहेत. सरकारसाठी ही बाब लांच्छनास्पद आहे. त्याच वेळी बेघरांवर होणारे हल्ले हा नियमित प्रकार झाला आहे आणि त्याकडे अनेकदा यंत्रणांचे लक्षही जात नाही अशी तक्रार संबंधित पीडित आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था करतात.
यासंबंधी सरकारची काय धोरणे आहेत?
करोनापूर्व काळात नागरिकांना घरांसाठी दिले जाणारे अनुदान बंद होत आहे. त्याच्या सोबतीला घरांची वाढलेली भाडी आणि मुळातच भाड्याने उपलब्ध असेलली कमी घरे या बाबीदेखील समस्येत भर घालतात. दुसरीकडे बायडेन प्रशासनाने बेघरांची समस्या सोडवण्यासाठी अब्जावधी डॉलर निधीचा प्रस्ताव ठेवला असून लाखो डॉलर खर्चही केले आहेत. मात्र, मुळातच अमेरिकेत बेघरांच्या समस्येसाठी ठोस धोरण नसल्याची टीका कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गेव्हन न्यूसॉम यांनी ऑक्टोबर महिन्यात केली होती. या परिस्थितीत दोन महिन्यांनंतरही फरक पडेलला नाही हे काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या अहवालावरून दिसते.
nima.patil@expressindia.com