Lamp Posts With Hindu Religious Symbols In Karnataka’s Koppal कर्नाटकातील कोप्पलमध्ये भगवान रामाचे धनुष्य, भगवान हनुमानाची गदा आणि भगवान व्यंकटेश्वराचे प्रतीक असलेल्या हिंदू धार्मिक चिन्हांनी सुशोभित केलेल्या लॅम्प पोस्ट्सवरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. गंगावती तालुक्यात कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळाने (KRIDL) बसवलेल्या या लॅम्प पोस्ट्सवर सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (SDPI) आक्षेप घेतल्यानंतर हा वाद समोर आला आहे. कोप्पल जिल्हा प्रशासनाने बुधवारी (२८ ऑगस्ट) भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनाद्री टेकडीजवळील गंगावती तालुक्यातील रस्त्यांवर लावलेले सजावटीचे विद्युत दिवे काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक पथ दिव्यांवर “हिंदू धार्मिक चिन्हे” प्रदर्शित केल्याबद्दल कर्नाटक ग्रामीण पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या(KRIDL) विरुद्ध पोलिस खटल्याची मागणी करण्यात आली आहे. या लॅम्पवर भगवान रामचे धनुष्य, हनुमानाची गदा आणि व्यंकटेश्वराचे पुंड्र (व्यंकटेश्वराच्या माथ्यावर असलेले तिलक) इत्यादी चिन्ह असल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अधिक वाचा:  २०० वर्ष जुना स्टॅम्प पेपर, ईस्ट इंडिया, जातीव्यवस्था आणि महिला; तत्कालीन समाजाची नेमकी कोणती माहिती मिळते?

डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने नेमका काय आक्षेप घेतला आहे?

एसडीपीआयने जिल्हा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, धार्मिक चिन्हे जातीय तणाव निर्माण करू शकतात. परिणामी, कोप्पल जिल्हा प्रशासनाने संभाव्य धार्मिक समस्या टाळण्यासाठी लॅम्प पोस्ट हटवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाने हे लॅम्पपोस्ट उभारल्याबद्दल KRIDL विरुद्ध कारवाई केली आहे. तसेच तक्रारींवर सविस्तर रिपोर्ट मागवला आहे. एसडीपीआय कोप्पलचे अध्यक्ष सलीम मनर्यार म्हणाले, “आम्ही महापालिका आयुक्तांकडे दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की वापरलेली चिन्हे घटनाबाह्य आहेत. येथे शांतता राखण्यासाठी ही चिन्हे हटवावीत, हीच आमची मागणी आहे.” ते पुढे म्हणाले, “हे टाळले पाहिजे आणि त्यासाठी समान दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. आम्हाला पथदिव्यांबाबत काही आक्षेप नाही; अशा विकासकामांसाठी आम्ही आमदारांना पाठिंबा देऊ. परंतु या प्रकरणात केवळ एका समुदायाचा विचार होऊ नये.” मनर्यार यांनी सूचित केले की महापालिका आयुक्तांनी त्यांची याचिका स्वीकारली नाही, तर ते हे प्रकरण सीईओ आणि आवश्यक असल्यास उपायुक्तांकडे ते पाठवतील. “कायद्यानुसार काय करता येईल, ते आम्ही पाहू,” असेही ते म्हणाले.

कोप्पलचे ऐतिहासिक महत्त्व

कोप्पल जिल्हा, अधिकृतपणे कोपला जिल्हा म्हणून ओळखला जातो, हा भारतातील कर्नाटक राज्यातील एक प्रशासकीय जिल्हा आहे. पूर्वी कोप्पलला ‘कोपना नगरा’ असे संबोधले जात असे. जागतिक वारसा केंद्र असलेल्या हम्पीमध्ये कोप्पल जिल्ह्यातील काही भागांचा समावेश आहे. हे अंदाजे ३८ किमी अंतरावर आहे. अनेगुंडी हे देखील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. कोप्पल हे प्राचीन जैन तीर्थ आहे, येथे माले मल्लेश्वर नावाचे प्राचीन शिवमंदिर आहे. पालकीगुंडू आणि गावीमाथा येथे अशोकाचे दोन शिलालेख सापडले आहेत. कोप्पल ही कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिक असलेल्या शिलाहारांच्या शाखेची राजधानी होती. शिवाजी महाराजांच्या काळात हा भाग दक्षिण मराठा देशातील महसूल विभागांपैकी एक होता. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान, मुंडर्गी भीमा राव आणि हमीगे केंचनगौडा यांना १८५८ च्या जून महिन्यात ब्रिटिशांशी लढताना वीरमरण आले. कोप्पलपासून १३ किमी अंतरावर असलेले किन्हल हे पारंपारिक रंगीबेरंगी लाखाच्या भांड्यांसाठी प्रसिद्ध आहे.

अधिक वाचा: चक्क हुकूमशहा हिटलरने ‘कार’ भेट देऊ केलेला ‘हा’ भारतीय महाराजा कोण होता?

भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न

दरम्यान, गंगावटीचे आमदार जनार्धन रेड्डी यांनी या लॅम्पपोस्टचे समर्थन करत म्हटले, “हनुमान ‘नाम’ असलेले पथदिवे बसवण्यामागे अशा पवित्र स्थळांवर आध्यात्मिक आणि भक्तिभावपूर्ण वातावरण निर्माण करणे हा उद्देश्य आहे. तिरुपती आणि अशा पवित्र स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर, तसेच विमानतळ, रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांसारख्या ठिकाणी भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. काल आम्ही महापालिकेत या संदर्भात ठराव मंजूर केला आहे.” तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांना ही नोटीस प्राप्त झाली आहे. या मुद्द्यावर कोणीही राजकारण करू नये; हे देवाचे काम आहे. कोणते काम करायचे ते देव ठरवेल.”

आदेश मागे घेण्यात आला आहे

लॅम्प पोस्ट्स अयोध्येतील अशाच स्वरूपाच्या रचनेतून प्रेरित होऊन बसवण्यात आले होते आणि हनुमानाचे जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या अंजनाद्री टेकडीजवळ स्थापित करण्यात आले होते. या परिसराच्या धार्मिक वारशाशी असलेल्या जोडणीमुळेच ही स्थापना करण्यात आल्याचे सांगितले जाते. परंतु लोकांनी केलेल्या विरोधानंतर गंगावटी तहसीलदारांनी धार्मिक विद्युत खांब काढण्याचा आदेश मागे घेतला. जनतेचा आणि राजकीय नेत्यांचा विरोध लक्षात घेऊन गंगावटी तहसीलदार यू. नागराज यांनी खांब हटवण्याच्या वादग्रस्त आदेशाची मागणी मागे घेतली आहे. प्रारंभीच्या आदेशात एसडीपीआयच्या तक्रारीनंतर पोलिसांना खांब काढून टाकण्याचे आणि स्थापना करणाऱ्या KRIDL या संस्थेविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, स्थानिक नेत्यांचा, ज्यात आमदार जनार्धन रेड्डी आणि सी.टी. यांचा समावेश आहे, दबाव वाढल्याने आदेश मागे घेण्यात आला आहे आणि तिरुपती, अंजनेय आणि श्रीराम यांची प्रतीक असलेल्या खांबांना जागेवरच ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the order to remove the lamp posts with hindu religious symbols in koppal karnataka becoming controversial svs