सहसा विश्वास बसणार नाही अशीच सुखद बातमी म्हणजे, भारतात गेल्या काही दशकांमध्ये प्रचंड वाढलेली स्त्री वैमानिकांची संख्या. जगातील सर्वाधिक स्त्री वैमानिक भारतातच आहेत. ‘इंटरनॅशनल सोसायटी ऑफ विमेन एअरलाइन पायलट्स’च्या २०२१ मधील आकडेवारीनुसार जगभरातील एकूण वैमानिकांपैकी ५.८ टक्के स्त्रिया, तर ९४.२ टक्के पुरुष आहेत. म्हणजेच या क्षेत्रात केवळ ६ टक्के लिंगसमानता आहे. भारतात मात्र स्त्री वैमानिकांची संख्या एकूण वैमानिकांच्या १२.४ टक्के असून जगात भारत या यादीत आघाडीवर आहे. याच्या अगदी विपरीत ‘वर्ल्ड इकोनॉमिक फोरम’च्या यादीत मात्र १४६ देशांमध्ये लिंगसमानतेत (जेंडर पॅरिटी) भारताचे स्थान फारच खालचे – १३५ वे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- विश्लेषण : कमी वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करु शकणारा इस्रोचा नवा प्रक्षेपक – SSLV चे महत्त्व काय?

स्त्री वैमानिकांच्या संख्येत इतर देश व भारत…

भारताखालोखाल आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत स्त्री वैमानिक प्रत्येकी ९.९ टक्के आहेत. त्यानंतर ऑस्ट्रेलिया (७.५ टक्के), कॅनडा (७ टक्के), जर्मनी (६.९ टक्के) यादीत तुलनेने वरच्या क्रमांकांवर आहेत. अत्यंत प्रगत, बलाढ्य देश मानल्या जाणाऱ्या अमेरिकेत हे प्रमाण केवळ ५.५ टक्के आणि ब्रिटनमध्ये ४.७ टक्के आहे.

भारतात स्त्री वैमानिकांची संख्या कशी वाढली?

भारतात फार पूर्वीच ‘स्टेम’ (एसटीईएम- अर्थात सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनीअरिंग व मॅथेमॅटिक्स) क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये स्त्रियांना घेण्यात सुरुवात झाली होती. विमान चालवणेही याच प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये येते. मात्र गेल्या साधारण तीस दशकांत स्त्रियांच्या दृष्टीने स्थिती सुधारली असे म्हणता येईल. भारतीय हवाईदलातही १९९० च्या दशकात स्त्री वैमानिकांना हेलिकॉप्टर आणि ने-आण करणारी विमाने चालवण्यासाठी सामावून घेतले गेले होते. १९४८मध्ये ‘नॅशनल कॅडेट कोअर’च्या (एनसीसी) ‘एअर विंग’ची स्थापना झाली होती. या संस्थेमुळेही अनेक स्त्रियांच्या मनात या करिअरविषयी आकर्षण निर्माण झाले.

हेही वाचा- राज्यातील मनोरुग्णालयांचा विकास का रखडला?

खासगी कंपन्यांकडे ओढा का?

बहुसंख्य खासगी विमान कंपन्यांनी स्त्री कर्मचारी आणि वैमानिकांसाठी काही खास सवलती देऊ केल्या. स्त्री वैमानिकांना उशिरा घरी सोडताना किंवा घरून आणताना पाठवलेल्या गाडीत सुरक्षा कर्मचारी नेमण्यास सुरुवात झाली. स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना सोईच्या ड्युटी देणे, बाळंतपणासाठीची पुरेशी रजा, गर्भवतींना विमान चालवण्यापासून सूट देऊन काही दिवस वेगळे वा कार्यालयीन काम करू देणे, लहान मुलांसाठी पाळणाघर चालवणे किंवा पाळणाघराचे शुल्क वेगळ्याने देणे, अशा सुविधाही विमान कंपन्यांनी दिल्या.

शुल्ककपातीचाही फायदा?

विमान चालवण्याचे प्रशिक्षण अतिशय महागडे आहे. परंतु भारतात काही राज्य सरकारांनी स्त्रियांना ते कमी शुल्कात मिळावे यासाठी योजना राबवण्याचा निर्णय घेतला. काही व्यावसायिक कंपन्या पुढे आल्या आणि त्यांनी स्त्रियांना भारतात वैमानिक प्रशिक्षण घेण्यासाठी पूर्ण रकमेच्या शिष्यवृत्ती देणे सुरू केले. या सर्व गोष्टींमुळे मुली याकडे वळू लागल्या.

तीस वर्षांत मानसिकतेत बदल?

निवेदिता भसीन या व्यावसायिक विमान कंपनीसाठी काम करणाऱ्या जगातील पहिल्या सर्वांत कमी वयाच्या कॅप्टन आहेत. ३३ वर्षांपूर्वी – म्हणजे १९८९ मध्ये त्या कॅप्टन झाल्या, तेव्हा स्त्री वैमानिकांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन कसा होता याबद्दल त्यांनी सांगितले आहे. ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेला त्यांनी सांगितले होते, की सुरुवातीला घाईगडबडीने कॉकपिटमध्ये शिरून तिथेच राहाण्यास सांगितले जायचे. जेणेकरून प्रवाशांना ‘एक स्त्री विमान चालवणार आहे’ हे कळून त्यांची प्रवासाबद्दलची चिंता वाढू नये. आता मात्र ही मानसिकता बदलली आहे हेच स्त्री-वैमानिकांच्या वाढत्या संख्येवरून दिसून येते. आताच्या अनेक स्त्री वैमानिक आपल्या कुटुंबाचा आपल्याला खंबीर पाठिंबा मिळत असल्याचे जाहीरपणे सांगतात.

हेही वाचा- विश्लेषण: वरवरा राव यांना मिळालेल्या कायमस्वरूपी वैद्यकीय जामिनाचा अर्थ काय?

अपघातांचे प्रमाण कमी?

अमेरिकेतील एका संस्थेने केलेल्या पाहणीनुसार, १९८३ ते १९९७ या काळात झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांमध्ये पुरुष वैमानिकांचे प्रमाण खूपच अधिक होते. कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये अधिक काळजीपूर्वक निर्णय घेऊन कमीत कमी धोका पत्करण्याची प्रवृत्तीही महिला वैमानिकांना अधिक विश्वासार्ह बनवते, असे अनेक पाहण्यांतून आढळून आले आहे.

पुरुष मक्तेदारी संपुष्टात?

हे क्षेत्र आता ‘केवळ पुरुषांचे’ राहिले नसून भविष्यातही ते पुरुषप्रधान राहाणार नाही अशी आशा देणारीच सध्याची आकडेवारी आहे. वैमानिक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या भारतीय मुलींसाठी उत्साहवर्धक अशी ही परिस्थिती आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the proportion of women pilots the highest in india print exp 0822 dpj