अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय विश्वचषकाच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने अविस्मरणीय खेळी करताना ऑस्ट्रेलियाला अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. मॅक्सवेलने १२८ चेंडूंतील नाबाद २०१ धावांच्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले. या खेळीसह त्याने टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिले. आतापर्यंतचा मॅक्सवेलचा प्रवास कसा राहिला आहे, तसेच या खेळीने त्याच्या कारकिर्दीला कशी कलाटणी मिळू शकेल, याचा आढावा.
मॅक्सवेलची खेळी महत्त्वपूर्ण का समजली जात आहे?
ऑस्ट्रेलियन संघासाठी विश्वचषकाची सुरुवात चांगली झाली नव्हती. त्यातच आघाडीच्या खेळाडूंना लय सापडत नव्हती. त्यांना भारत व दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत व्हावे लागले होते. यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने आपली कामगिरी उंचावली. सलग पाच सामने जिंकले. त्यानंतर वानखेडेवर झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने दिलेल्या २९२ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था ७ बाद ९१ अशी बिकट झाली. या कठीण परिस्थितीतून सामना जिंकणे आव्हानात्मक होते. मात्र, मॅक्सवेलने आपला नैसर्गिक आक्रमक खेळ सुरू ठेवत चौफेर फटकेबाजी केली आणि ऑस्ट्रेलियाला निर्णायक विजय मिळवून देताना उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करून दिले. त्याने आपल्या या खेळीत २१ चौकार व दहा षटकार मारले. दमटपणामुळे गोळे येऊ लागल्यामुळे त्याला पायाच्या हालचालींवर मर्यादा येत असतानाही त्याने नेटाने खेळपट्टीवर उभे राहत आपले महत्त्व सर्व क्रिकेट जगताला पटवून दिले.
मॅक्सवेलने आपल्या या खेळीत कोणकोणते विक्रम रचले?
मॅक्सवेलने या द्विशतकी खेळीदरम्यान अनेक विक्रम रचले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारा मॅक्सवेल पहिला ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला. सलामीच्या दोन फलंदाजांव्यतिरिक्त (नॉन-ओपनर) अन्य स्थानावरील फलंदाजासाठी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मॅक्सवेलने रचला. त्याने झिम्बाब्वेच्या चार्ल्स कॉवेंट्रीचा १९४ धावांचा विक्रम मोडीत काढला. यासह त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वोत्तम वैयक्तिक खेळी केली आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी रचलेला फखर झमानचा (१९३) विक्रम मोडला. विश्वचषक स्पर्धेतही धावांचा पाठलाग करताना ही सर्वोत्तम खेळी ठरली. तसेच त्याचे हे द्विशतक विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत जलद ठरले. त्याने याकरिता १२८ चेंडूंचा सामना केला. यापूर्वी, नेदरलँड्सविरुद्ध मॅक्सवेलने ४० चेंडूंत शतक झळकावले. हे एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील सर्वांत जलद शतक ठरले.
मॅक्सवेलने टीकाकारांना कसे प्रत्युत्तर दिले?
मॅक्सवेल हा नेहमीच आपल्या निर्भीड खेळासाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याच्या आक्रमक खेळावर अनेकांनी टीका केली आहे. मानसिकदृष्ट्याही त्याला काही आव्हानांचा सामना करावा लागला होता. विश्वचषक सुरू होण्याच्या काही महिन्यांआधी मॅक्सवेल एका कार्यक्रमादरम्यान पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली. त्यामुळे काही महिने तो क्रिकेटपासून दूर होता. विश्वचषकातही तो खेळणार का, याबाबत साशंकता होता. मात्र, तो वेळीच दुखापतीतून सावरला आणि त्याला संघात स्थान मिळाले. तरीही त्याच्या लयीबाबत अनेकांना प्रश्न उपस्थित केले. तसेच, लेग-स्पिनर ॲडम झॅम्पाला फिरकी गोलंदाजीला साथीदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते. विश्वचषकाच्या पहिल्या दोन सामन्यांत ऑस्ट्रेलियाला पराभूत व्हावे लागल्यानंतर मॅक्सवेलच्या निवडीवर प्रश्न उपस्थित होऊ लागले. मात्र, नेदरलँड्सविरुद्ध आक्रमक शतक झळकावत त्याने आपले महत्त्व पटवून दिले. यानंतर गोल्फ कार्टवरून पडून मॅक्सवेलच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याला एका सामन्याला मुकावे लागले. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात बाहेर बसल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने झंझावाती खेळी केली. त्यामुळे जेव्हा जेव्हा मॅक्सवेलवर टीका झाली, तेव्हा तेव्हा त्याने आपल्या खेळाने चोख प्रत्युत्तर दिले.
मॅक्सवेलचा भारताशी संबंध कसा?
मॅक्सवेल आपल्या खेळीने जसे सर्वांचे लक्ष वेधतो, त्याचप्रमाणे आपले वैयक्तिक आयुष्यही चर्चेचा विषय ठरते. मॅक्सवेलची पत्नी विनी रमनचा तमिळनाडूशी संबंध असून तिचा जन्म हा ऑस्ट्रेलियामध्ये झाला आहे. तिने ऑस्ट्रेलियामधून वैद्यकीय शिक्षण घेतले. मॅक्सवेल आणि विनीची भेट ही २०१३ मध्ये झाली होती. यानंतर २०२० मध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला. मात्र, करोनामुळे २०२२ मध्ये त्यांचे लग्न पार पडले. या दोघांना एक मुलगी आहे. मॅक्सवेलच्या खेळीनंतर अनेकांनी त्याचे समाजमाध्यमांवर कौतुक केले आणि त्यामध्ये त्याची पत्नी विनीचाही समावेश होता.