भारतात मोठ्या प्रमाणात सोन्यात गुंतवणूक केली जाते. सोन्याने नेहमी चांगला परतावा दिला आहे. त्यामुळे सोन्याची गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. २०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किमती १० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात वाढल्या आहेत. सोमवारी सोन्याच्या किमती १.५ टक्क्यांहून अधिक वाढल्या आणि त्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन टॅरिफ योजना जाहीर केल्यानंतर जागतिक व्यापारयुद्धाच्या भीतीमुळे सोन्याच्या मागणीतही वाढ झाली आहे.
ट्रम्प यांनी रविवारी सर्व स्टील आणि ॲल्युमिनियम आयातीवर अतिरिक्त २५ टक्के शुल्क लादण्याची घोषणा केली. त्यांनी असेही सांगितले की, ते या आठवड्यात परस्पर शुल्क जाहीर करतील. आर्थिक आणि भू-राजकीय अशांततेच्या काळात सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. अशात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)देखील मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत आहे. सोन्याच्या साठ्यात वाढ करण्यामागील नेमके कारण काय? जाणून घेऊ.
सोने खरेदीबाबत निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
लोकसभेत काँग्रेस खासदार मनीष तिवारी यांनी विचारले की, सोन्याची खरेदी वाढवणे म्हणजे डॉलरपासून दूर जाणे किंवा पर्यायी आंतरराष्ट्रीय सेटलमेंट यंत्रणेवर भर देणे आहे. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी स्पष्ट केले की, भारतातील वाढत्या सोन्याचा साठा वाढवणे यात कोणत्याही आंतरराष्ट्रीय चलनाची जागा घेण्याचा हेतू नाही. आरबीआयच्या सोने खरेदीबाबत सीतारमण यांनी स्पष्ट केले की, आरबीआय बॅलन्स रिझर्व्ह पोर्टफोलिओ राखण्यासाठी सोन्याची साठवणूक करत आहे, असे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/RBI-buying-tonnes-of-gold.jpg?w=830)
अमेरिकन डॉलर हा भारताच्या परकीय चलनसाठ्याचा प्रमुख घटक आहे. मात्र, असे असले तरीही आरबीआयकडे इतर चलने आणि सोन्याचेही साठे आहेत. भारताने डॉलरपासून दूर जाण्याचा किंवा पर्यायी आंतरराष्ट्रीय सेटलमेंट यंत्रणेवर भर देण्याऐवजी हे पाऊल राखीव निधीमध्ये विविधता आणण्याच्या भारताच्या धोरणाचा एक भाग आहे यावर सीतारमण यांनी भर दिला. सध्या डी-डॉलरीकरणाबाबत जागतिक चर्चांना वेग आला आहे. काही देश व्यापार आणि राखीव साठ्यासाठी पर्याय शोधत आहेत. परंतु, सीतारमण यांनी स्पष्ट केले की, भारतातील सोन्याचा वाढलेला साठा अशा कोणत्याही बदलाचे संकेत देत नाही.
आरबीआयकडून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी
३१ जानेवारीपर्यंत भारताचा परकीय चलनसाठा ६३०.६ अब्ज डॉलर्स होता. २४ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात यात १.०५ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली होती. मागील आठवड्यात यात ५.५ अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आली असून, परकीय चलनसाठ्यात ही सलग दुसरी वाढ होती. या वाढीचे मुख्य कारण म्हणजे सोन्याचे साठे, जे १.२ अब्ज डॉलर्सने वाढून ७०.८९ अब्जांवर स्थिरावले. आरबीआयने २०२४ मध्ये त्याच्या सोन्याच्या साठ्यात ७२.६ टनांची भर घातली. डिसेंबर २०२४ अखेरीस आरबीआयचा सोन्याचा साठा ८७६.१८ टन इतका होता, ज्याचे मूल्य ६६.२ अब्ज डॉलर्स होते. एक वर्षापूर्वी याच कालावधीत ८०३.५८ टन सोन्याच्या साठ्याचे मूल्य ४८.३ अब्ज डॉलर्स होते. त्यातून ७२.६ टन सोने खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट होते. २०२४ ची सोन्याची खरेदी ही २०२१ नंतरची सर्वोच्च आणि २०१७ मध्ये सोन्याची खरेदी सुरू केल्यापासून दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च खरेदी होती.
लक्षणीयरीत्या तुर्की, स्विस किंवा अगदी चिनी समकक्षांसारख्या इतर अनेक जागतिक मध्यवर्ती बँकांप्रमाणे आरबीआय क्वचितच सोन्याची विक्री करते. कारण- हा राजकीयदृष्ट्या कठीण निर्णय असतो. जागतिक स्तरावर मध्यवर्ती बँकांनी २०२४ मध्ये सोन्याची खरेदी वेगाने सुरू ठेवली. सलग तिसऱ्या वर्षी खरेदी १,००० टनांपेक्षा जास्त झाली. चौथ्या तिमाहीत खरेदीत लक्षणीय वाढ झाली, जी ३३३ टनांपर्यंत पोहोचली. मध्यवर्ती बँकांसाठी वार्षिक एकूण खरेदी १,०४५ टन झाली.
आरबीआय सोन्याचा साठा का वाढवत आहे?
मध्यवर्ती बँक जलद गतीने सोने खरेदी करत आहे. कारण- सोने खरेदी केंद्रीय बँकेला चलनातील अस्थिरता आणि राखीव निधीच्या पुनर्मूल्यांकनापासून स्वतःचे संरक्षण करण्यास मदत करते. उदाहरणार्थ- एप्रिल-सप्टेंबर २०२४ दरम्यान मूल्यमापन नफ्यामुळे परकीय चलन साठ्यात ५६ अब्ज डॉलर्स जोडले गेले; परंतु एक वर्षापूर्वी याच कालावधीत १७.७ अब्ज डॉलर्सचा तोटा झाला. दुसरीकडे सोन्याच्या किमती वर्षभरात २५ टक्क्यांहून अधिक वाढल्या. आपल्या परकीय चलनसाठ्यातील पुनर्मूल्यांकन जोखीम कमी करण्यासाठी आणि चलन अस्थिरता कमी करण्यासाठी आरबीआयने ऑक्टोबरपासून सोन्याची खरेदी वाढवली आहे.
आयडीएफसी बँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ गौरा सेनगुप्ता यांनी गेल्या महिन्यात ‘ईटी’ला सांगितले होते, “मध्यवर्ती बँकांकडून सोन्याची खरेदी ही परकीय चलनसाठ्यातील मालमत्तेत वैविध्य आणण्याचा प्रयत्न आहे. डॉलर मजबूत होत असताना मूल्यांकन तोट्याचा धोका वाढतो.” सेनगुप्ता म्हणाले, “सध्या मध्यवर्ती बँकांना यूएस ट्रेझरी उत्पन्न आणि डॉलरची मजबुती या दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागत आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात पुनर्मूल्यांकन तोटा होत आहे. परकीय चलनसाठ्याचे सोन्यामध्ये विविधीकरण करण्याचे उद्दिष्ट पुनर्मूल्यांकन तोटा होण्याचा धोका कमी करणे आहे.”
आरबीआय डिसेंबर २०१७ पासून तिच्या राखीव व्यवस्थापन धोरणाचा भाग म्हणून सोन्याची साठवणूक करत आहे. परंतु, कोविडनंतर हे प्रमाण अधिक वाढले आहे. आरबीआय जागतिक मध्यवर्ती बँकांमध्ये सोन्याच्या प्रमुख खरेदीदारांपैकी एक आहे. रिझर्व्हमध्ये सोने ठेवण्याचे आरबीआयचे उद्दिष्ट मुख्यतः महागाई आणि परकीय चलनाच्या जोखमींपासून बचाव म्हणून त्याच्या विदेशी चलन मालमत्तेत विविधता आणणे आहे. २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर जागतिक स्तरावर केंद्रीय बँकांनी सक्रियपणे मोठ्या प्रमाणात सोने जमा करण्यास सुरुवात केली आहे. विविध बाजार विश्लेषकांच्या मते, मध्यवर्ती बँकांकडून सक्रिय सोने खरेदी सुरू राहण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे वरिष्ठ बाजार विश्लेषक लुईस स्ट्रीट म्हणाले, “२०२५ मध्ये मध्यवर्ती बँका अधिक मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करतील, अशी आमची अपेक्षा आहे.”