चीनमध्ये वाघ-अवयवांना मागणी का?
चीन हा वाघांच्या अवयवांचा सर्वात मोठा ग्राहक देश आहे. चिनी पारंपरिक औषधांमध्ये या अवयवांचा वापर होतोच; पण वाघाची त्वचा, नखे, दात हे फॅशनच्या वस्तू /दागिने बनवण्यासाठी अथवा घराच्या सजावटीसाठी वापरले जातात. वाघनखे, दात हे चीनमध्येही शौर्याचे प्रतीक मानले जाते. वाघाचे मांस, रक्त, हाडे, चरबी, जननेंद्रिय हे सर्व पारंपरिक औषध, टॉनिक आणि विविध आजारांवरील उपचारांमध्ये वापरले जाते. वाघाचे हाड उकळल्यानंतर ते ‘टायगर बोन ग्ल्यू’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिकट पदार्थात रूपांतरित होते; जो चीनसह अनेक देशांमधील पारंपरिक औषधांचाच एक घटक आहे. चीनची ही मागणी पूर्ण करण्यासाठीच वाघांच्या अवयवांची तस्करी होते. ‘टायगर वाईन’देखील वाघांच्या हाडांपासून तयार केली जाते.
भारतासाठी प्रश्न कितपत गंभीर?
जगभरात सर्वाधिक वाघ भारतात असले आणि भारत हे जगातील सर्वाधिक व्याघ्र संवर्धन प्रकल्प भारतातच असले तरीही वाघांच्या शिकारीचा सर्वाधिक धोकाही भारतालाच आहे. भारतात २०१९ मध्ये ३८; तर २०२० मध्ये ३१ वाघांची शिकार करण्यात आली. २०२१ मध्ये ५६ वाघ, तर २०२२ मध्ये ३९ वाघ मारले गेले. २०२३ मध्येही ५६ वाघांची शिकार करण्यात आली.
तस्करीसाठी कोणत्या मार्गांचा वापर?
वाघांच्या अवयवांच्या तस्करीसाठी चार मार्गांचा प्रामुख्याने वापर केला जातो. यात नेपाळ-भूतान सीमा, आसाम सीमा, ब्रह्मपुत्र नदी आणि पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे हे मार्ग भारतातील पाच व्याघ्रसंवर्धन क्षेत्रांशी संबंधित आहेत. या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमार्फत तस्कर चीनमध्ये पोहोचतात. वाघांच्या अवयवांना त्यांच्या ठरावीक ठिकाणी पोहोचवण्यासाठी रेल्वे, विमान, कार, बोट यासारखी वाहने आणि प्रसंगी माणसांचाही वापर केला जातो. भारतातून तस्करी करण्यासाठी प्रामुख्याने नेपाळ किंवा म्यानमारसारख्या देशांचा वापर केला जातो. मलेशिया आणि इंडोनेशियामधून होणारी तस्करी थायलंड, म्यानमार आणि व्हिएतनामद्वारा होते.
हे रोखण्यासाठी नेपाळशी सहकार्य?
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या नवी दिल्ली येथील कार्यालयात नुकत्याच आयोजित बैठकीत या क्षेत्रातील तज्ज्ञ, नेपाळमधील वरिष्ठ कायदा अंमलबजावणी अधिकारी, केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखा, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण आणि केंद्रीय अन्वेषण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह भारतातील वन्यजीव गुन्हे नियंत्रण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात वाघांच्या तस्करीबाबत सुरू असलेल्या तपासावर महत्त्वपूर्ण माहितीची देवाणघेवाण करण्याची तयारी भारत आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दर्शवली. भारतातून नेपाळमार्गे चीनकडे जाणारा रस्ता वाघ, बिबट आणि इतरही वन्यप्राण्यांच्या अवयव- तस्करीसाठी वापरला जात असून केंद्रीय अन्वेषण विभागाने यावर चिंता व्यक्त केली आहे.
तस्करांविरुद्ध मोहीम सुरू करण्यासाठी भारत आणि नेपाळमधील अधिकारी इंटरपोलचा वापर करतील. तस्करीच्या मार्गामुळे जे देश प्रभावित झाले आहेत, त्या देशातील कायदा अंमलबजावणी संस्थांशी सहकार्य केले जाईल.
तस्करीचे अधिक प्रमाण कोणत्या राज्यांत?
अलीकडच्या कारवायांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू व आसाम या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या जप्तीची तीव्रता अधिक दिसून आली आहे. तसेच पश्चिम घाट क्षेत्राजवळदेखील जप्तीचे प्रमाण अधिक आढळले आहे. महाराष्ट्रासह बंगाल, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांमध्ये वाघांच्या अवयवांच्या बेकायदा तस्करींचे प्रमाण अधिक आहे. तर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश हे शिकारीचे प्रमुख ठिकाण ठरू शकण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रात अलीकडची कारवाई कोणती?
महाराष्ट्रात २०२३ साली गडचिरोली ते आसाममधील गुवाहाटीपर्यंत पसरलेल्या वाघांच्या शिकार प्रकरणाचा उलगडा झाला. त्याखेरीज, मेघालयातील शिलाँगला जात असलेल्या पाच व्यक्तींकडून गुवाहाटी येथे वाघाची कातडी, हाडे, पंजे जप्त करण्यात आले ते महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील असल्याचा अंदाज होता. चौकशीनंतर ते गडचिरोली जिल्ह्यातील वाघांचे अवयव असल्याचे समोर आले. पुढील तपासात गडचिरोली-चंद्रपूर परिसरात आणखी १३ शिकाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांनी महाराष्ट्रात चार वाघ मारल्याची कबुली दिली होती.
rakhi.chavhan@expressindia.com