५ नोव्हेंबर रोजी अमेरिकेमध्ये अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विद्यमान उपाध्यक्ष कमला हॅरीस आणि माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात अत्यंत अटीतटीची लढाई सुरू आहे. ‘नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवारी’ कोण बाजी मारणार याची जगभरात उत्सुकता असताना हाच दिवस मतदानासाठी का निवडण्यात आला, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. खरेतर कायद्याच्या भाषेत हा दिवस वेगळ्याच पद्धतीने लिहिण्यात येतो, असे का? वरवर अजब वाटणारा हा ‘मुहूर्त’ निवडण्याचे कारण काय, याची रंजक कथा या विश्लेषणाच्या माध्यमातून…

मतदानासाठी हा दिवस कधी निश्चित झाला?

१८४५ सालापर्यंत अमेरिकेमध्ये वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या दिवशी मतदान होत असे. त्यावेळी दळणवळण आणि संभाषणाची साधने फारशी उपलब्ध नसल्यामुळे भिन्न दिवशी मतदान झाले, तरी एके ठिकाणची बातमी दुसरीकडे पोहोचायला बरेच दिवस लागत असत. मात्र कालांतराने, विशेषतः टेलिग्राफ आणि रेल्वेच्या निर्मितीनंतर एकीकडच्या निकालाचा परिणाम अन्य राज्यातील मतदानावर होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे अमेरिकन कायदेमंडळाने (काँग्रेस) १८४५ साली कायदा करून संपूर्ण देशात एकाच दिवशी मतदान घेण्याचे निश्चित केले. सुरुवातीला हा नियम केवळ अध्यक्षीय निवडणुकीपुरता ठेवण्यात आला होता. कालांतराने काँग्रेस तसेच गव्हर्नरच्या निवडणुकाही याच मुहूर्तावर सरकविण्यात आल्या. आता अमेरिकेत दर चार वर्षांनी नोव्हेंबरच्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी अध्यक्ष-उपाध्यक्ष, सर्व ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’मधील (कनिष्ठ सभागृह) जागा, एक तृतियांश सेनेटमधील (वरिष्ठ सभागृह) जागा आणि काही राज्यांमध्ये गव्हर्नरपदासाठी मतदान होते. त्यानंतर दोन वर्षांनी येणाऱ्या नोव्हेंबरच्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी मध्यावधी (मिड टर्म) निवडणुका होतात. त्यावेळी सर्व ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्ज’ (कार्यकाळ दोन वर्षे), एक तृतियांश सेनेट (कार्यकाळ सहा वर्षे) आणि उर्वरित गव्हर्नरपदासाठी मतदान घेतले जाते. यावेळी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडले जात नाहीत.

Vikas Yadav
Vikash Yadav: पन्नूनच्या हत्येच्या कटात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग- अमेरिकेचा आरोप; दिल्लीत यादवला अटक का करण्यात आली होती?
22nd October Rashi Bhavishya In Marathi
२२ ऑक्टोबर पंचांग: जन्मराशीनुसार आज कर्तुत्वाला मिळेल चांगला…
gurpatwant singh pannun
गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण : अमेरिकेच्या आरोपपत्रातील ‘तो’ आरोपी आता सरकारचा कर्मचारी नाही, भारताचे स्पष्टीकरण!
Donald trump Vladimir putin
विश्लेषण: ‘मित्र’ पुतिन यांच्या सतत संपर्कात असतात ट्रम्प? नव्या पुस्तकातील दाव्याने युक्रेनच्या चिंतेत भर?
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
mohhammad mizzu meet india
भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?
election in America
अमेरिकेतील निवडणूक नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारीच का असते? जाणून घ्या
reserve bank
व्याजदर कपातीबाबत अनिश्चितता; पतधोरण समितीच्या तीन बाह्य सदस्यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबरला संपणार

हेही वाचा >>> विश्लेषण : काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा झी-मोर्ह प्रकल्पावर हल्ला… हा प्रकल्प संपर्क सुविधेसाठी महत्त्वाचा का?

नोव्हेंबर महिनाच का?

जेव्हा हा निर्णय घेण्यात आला, तेव्हा अमेरिका हा प्राधान्याने कृषिप्रधान देश होता. बहुतांश जनता ही शेतकरी, शेतमजूर किंवा कृषीक्षेत्राशी संबंधित व्यवसायात होती. वर्षभर शेतीची कामे केल्यानंतर साधारणत: ऑक्टोबरच्या अखेरीस कापणी होऊन शेतकरी वर्ग मोकळा श्वास घेत असे. मात्र अधिक उशीर केला, तर डिसेंबरपासून अमेरिकेचा बहुतांश भाग बर्फमय होण्यास सुरुवात होते. त्यामुळे शेतीची कामे संपल्यानंतर आणि कडक हिवाळा सुरू होण्यापूर्वी साधारणत: नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा हा मतदानासाठी सोयीचा कालखंड मानला गेला.

मतदान केवळ मंगळवारीच का?

त्या काळात बहुतांश अमेरिकन हे रोमन कॅथलिक ख्रिश्चन असल्यामुळे रविवार हा त्यांच्या प्रार्थनेचा दिवस होता. त्यामुळे तो दिवस बाद झाला. बुधवारी अनेक राज्यांमध्ये बाजार भरत असत, त्यामुळे त्या दिवशी मतदान घेण्याचाही प्रश्न नव्हता. पूर्वीच्या काळी मतदानकेंद्रे काही मैल अंतरावर असल्यामुळे व प्रवासाची वेगवान साधने उपलब्ध नसल्यामुळे मतदारांना प्रवासाला एक दिवस लागेल, असेही गृहित धरले गेले. त्यामुळे हे दोन दिवस प्रवासातूनही बाद झाले आणि पर्यायाने सोमवार आणि गुरुवार या दिवशी मतदान घेणे शक्य नव्हते. त्यामुळे मंगळवार हाच सर्वार्थाने सोयीचा वार असल्याचे लक्षात आले आणि तो दिवस निवडला गेला. मात्र मंगळवारी पहिली तारीख असेल तर?

१ नोव्हेंबर मंगळवारी आल्यास काय?

नोव्हेंबरचा पहिलाच दिवस मंगळवार असेल, तर मात्र त्या दिवसाऐवजी ८ तारखेला मतदान होते. असे करण्यामागे खास कारणे आहेत आणि तशी कायदेशीर तरतूदही आहे. वर म्हटल्याप्रमाणे कायदा झाला त्यावेळी बहुतांश जनता ख्रिश्चन होती आणि १ नोव्हेंबर हा दिवस ख्रिश्चनांमध्ये ‘ऑल सेंट्स डे’ म्हणून साजरा केला जातो. तसेच अनेक व्यापारी हे १ तारखेला आपली खातेवही बंद करत असल्यामुळे त्या दिवशी मतदारांचा कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता गृहित धरली गेली. हे टाळण्यासाठी १८४५च्या कायद्यात एक मेख मारून ठेवण्यात आली आहे. या कायद्यानुसार ‘नोव्हेंबरच्या पहिल्या सोमवारनंतर येणाऱ्या मंगळवारी’ मतदान घेण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे १ नोव्हेंबरला मंगळवार आलाच, तरी तो पहिल्या सोमवारनंतरचा नसल्याने आपोआप बाद होतो.

हेही वाचा >>> विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?

बदलत्या काळात ‘मुहूर्त’ किती आवश्यक?

आता अमेरिकेची केवळ २ टक्के जनता ही शेतीवर विसंबून आहे. त्याउलट शनिवार-रविवारी सुट्टी घेणारे नोकरदार-कामगार यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे ‘नोव्हेंबरचा पहिला मंगळवार’ हा मतदानाचा दिवस अनेकांसाठी गैरसोयीचा ठरणारा आहे. मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल, तर ते सप्ताहअखेरीस, म्हणजे शनिवारी किंवा रविवारी घेण्यात यावे, असा एक मतप्रवाह आहे. मात्र ‘नोव्हेंबरच्या पहिल्या मंगळवार’ला एवढे वलय प्राप्त झाले आहे, की हा दिवस बदलण्यासाठी अद्याप कोणीही पावले उचलेलली नाहीत. त्याऐवजी मतटक्का वाढविण्यासाठी ‘वेळेआधीचे मतदान’ (अर्ली व्होटिंग), टपालाद्वारे मतदान असे काही मार्ग काढण्यात आले. त्यामुळे अद्याप तरी अमेरिकेच्या राजकारणात दर दोन वर्षांनी येणाऱ्या या मंगळवारचे महत्त्व अबाधित आहे.
amol.paranjpe@expressindia.com