सर्वसामान्य प्रवाशांना जोडणाऱ्या भारतीय रेल्वेने सध्या अनेक विभागात पायाभूत सुविधांची विकासकामे हाती घेतली आहेत. अनेक प्रकल्पांची पायाभरणी, भूमिपूजन करण्यात येत आहे. मुंबईतील पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर ब्लॉक घेऊन प्रलंबित कामे पूर्ण केली जात आहेत. सध्या पश्चिम रेल्वे मार्गावरील ब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात येत आहेत. प्रचंड गर्दीतून, जीव मुठीत धरून प्रवाशांना प्रवास करावा लागतो आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर ही परिस्थिती का उद्भवली, सेवा विस्कळीत का झाली अशा मुद्द्यांचा आढावा…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वक्तशीर असलेली पश्चिम रेल्वे अचानक विस्कळीत का झाली?

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या तुलनेने वेळेत धावतात. वक्तशीरपणासाठी पश्चिम रेल्वेचा आवर्जून उल्लेख करण्यात येतो. पश्चिम रेल्वेची मार्गिका सरळ रेषेत असल्याने, कोणताही अडथळा न येता प्रवासी इच्छितस्थळी वेळेत पोहचतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे गाड्या विलंबाने धावत आहेत. आता २७ ऑक्टोबरपासून ते ६ नोव्हेंबरपर्यंत मोठा ब्लॉक घेतल्याने २ हजारांहून अधिक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी दादर, वांद्रे, सांताक्रूझ, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, वसई, विरार या स्थानकात प्रचंड गर्दी होत आहे. पश्चिम रेल्वेवर दर तीन मिनिटांनी एक लोकल फेरी होत होती. सध्या आता १५ ते १७ मिनिटांनी एक लोकल फेरी धावत आहे.

ब्लॉक काळात पश्चिम रेल्वे कोणती कामे पूर्ण करणार?

वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव दरम्यान ८.८ किमीच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने ७ ऑक्टोबरपासून ब्लॉक घेण्यास सुरुवात केली. हा ब्लॉक ५ नोव्हेंबरपर्यंत असून तब्बल २९ दिवसांचा असा मोठा ब्लॉक घेतला आहे. या कालावधीत गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे टर्मिनस अशा सहा यार्डमधील नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यात आले आहे. तसेच एकूण २० पॉईंटचे काम कोणत्याही लोकल व्यत्ययाशिवाय करण्यात आले. ७ ते २६ ऑक्टोबर दरम्यान सुमारे ५ तासांचे रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आले, तर, २७ ऑक्टोबरपासून ४ ते १० तासांचे विशिष्ट कालावधीत ब्लॉक घेण्यात येत आहेत. त्यामुळे दररोज १०० ते ३०० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. नॉन-इंटरलॉकच्या कामांमुळे यार्डजवळील रेल्वेगाडीचा वेग ३० किमी प्रतितास असा प्रतिबंधित केला आहे. त्यामुळे अनेक लोकल विलंबाने धावत आहेत.

हेही वाचा… विश्लेषण: मुंबईत ‘अँटी स्मॉग गन’ खरेच किती परिणामकारक? सध्याच्या प्रदूषणापासून सुटका केव्हा?

वांद्रे टर्मिनस येथे पाचवी आणि सहावी मार्गिका जोडण्यासाठी ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून ते ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत २४ तासांचा ब्लॉक असेल. त्यावेळी त्यामुळे १०० लोकल फेऱ्या आणि ९ लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द केल्या जातील. तसेच २५ रेल्वेगाड्या अंशतः रद्द केल्या जातील. वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव दरम्यान रेल्वे जोडणीचे काम पूर्ण झाल्यावर, या कामाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ५ आणि ६ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रद्द केलेल्या काही लोकल पूर्ववत करण्यात येत आहे. वांद्रे टर्मिनस ते गोरेगाव मार्गिकेचे काम ६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर गोरेगाव ते बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले.

कूर्मगतीने सुरू असलेल्या प्रकल्पाला वेग कसा आला?

प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्यासाठी व एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्रत मार्ग तयार करण्यासाठी मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका सुरू करण्याचे नियोजन आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) मुंबई नागरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) दोन अंतर्गत या मार्गिकेला २००८-०९ साली मान्यता देण्यात आली होती. त्या कामामुळे अप आणि डाऊन जलद लोकलचे वेळापत्रक सुरळीत होईल. मात्र गेल्या १४ वर्षांपासून कूर्मगतीने प्रकल्प सुरू आहे. आता प्रलंबित प्रकल्पाच्या कामाला वेग आला आहे. परंतु यावेळी कोणत्याही गटातील प्रवाशांचा कसलाही विचार न करता सरसकट लोकल सेवा रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबई महानगरातील प्रवाशांचा खडतर प्रवास सुरू आहे. तब्बल १४ वर्षांपासून जमीन हस्तांतरित करणे, वांद्रे, खार, सांताक्रूझ व इतर भागातील रेल्वे मार्गिकेच्या जागेवरील अतिक्रमणे हटवणे, झाडे कापणे करणे अशी कामे करण्यात आली.

ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना फायदा काय?

वांद्रे टर्मिनस येथे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्यांचा प्रवास अधिक सुरळीत होईल. तसेच वक्तशीरपणात सुधारणा होईल. सध्या पाचव्या मार्गावरील रेल्वे वाहतुकीचा ताण सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात येईल. त्यामुळे गोरेगाव-वांद्रे टर्मिनस दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वेगाड्यांची संख्या विभाजित करणे शक्य होईल. तसेच वांद्रे टर्मिनसवरून सुटणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवता येणे शक्य आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is western railway so disrupted know exactly what technical tasks were disrupted print exp dvr