सीरियाची राजधानी दमास्कसमधील त्यांच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात १३ अधिकारी ठार झाले आहेत. ठार झालेल्यांमध्ये इराण एलिट कुड्स फोर्स कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा जाहेदी आणि त्यांचे डेप्युटी ब्रिगेडियर जनरल मोहम्मद हादी हाजी रहिमी यांचा समावेश आहे. ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रझा जाहेदी हे इराणच्या सर्वोच्च कमांडरांपैकी एक होते. खरं तर इराण आणि इस्रायल यांच्यात अशा ठरवून केलेल्या हत्यांच्या संघर्षाचा इतिहास काही नवा नाही. मात्र, इस्रायलने अद्याप या हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या हल्ल्यामागे इस्रायल असल्याचंही चार इस्रायली अधिकाऱ्यांनी मान्य केले. परंतु इमारतीला राजनैतिक दर्जा असल्याचं मात्र नाकारलं. इराण आता इस्रायलविरुद्ध सूड उगवणार असल्याचंही बोललं जातंय. इराणच्या सरकारी टीव्हीने इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खेमेनी यांचे वक्तव्यही टीव्हीवर दाखवले. “आम्ही असा गुन्हा आणि तत्सम कृत्यांबद्दल खेद व्यक्त केला असता,” असंही खेमेनी म्हणाल्याचं वृत्त एपीने दिले आहे. स्ट्राइक, लक्ष्य अन् या हल्ल्यामुळे या भागात हिंसाचार पुन्हा वाढू शकतो, अशी चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.
कुड्स फोर्स कोण आहेत?
कुड्स फोर्स ही इराणी रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRCG)चे निमलष्करी दल अन् गुप्तचर शाखा आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सची स्थापना १९७९ मध्ये इराणच्या क्रांतीनंतर झाली. त्याची स्थापना करण्याचा निर्णय इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खेमेनी यांनी घेतला. देशातील इस्लामिक व्यवस्था कायम राखणे आणि नियमित सैन्यासह सत्तेचा समतोल राखणे हा त्याचा उद्देश होता. इराणमधील शाह यांच्या सत्तेच्या पतनानंतर देशामध्ये सत्तेवर आलेल्या सरकारने नव्या राजवटीचे संरक्षण करण्यासाठी अशा सैन्याची स्थापना केली. इराणच्या मौलवींनी नवीन कायद्याचा मसुदा तयार केला, ज्यामध्ये देशाच्या सीमा आणि अंतर्गत सुरक्षेचे रक्षण करण्याची जबाबदारी नियमित सैन्याला देण्यात आली आणि रिव्होल्युशनरी गार्डला सत्तेवर असलेल्यांचे रक्षण करण्याचे काम देण्यात आले. परंतु सध्या जमिनीवर दोन्ही सेना एकमेकांच्या आड येत आहेत. उदाहरणार्थ, रिव्होल्युशनरी गार्ड कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करण्यात मदत करते आणि लष्कर, नौदल आणि हवाई दल यांचे समर्थन सतत मिळत असते. कालांतराने रिव्होल्युशनरी गार्ड इराणच्या लष्करी आणि राजकीय शक्तीसाठी महत्त्वपूर्ण झाले आहे. सध्या रिव्होल्युशनरी गार्डमध्ये १.२५ लाख सैनिक आहेत. यामध्ये भूदल, नौदल, हवाई दल यांचा समावेश आहे आणि ते इराणच्या सामरिक शस्त्रास्त्रांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारीही घेतात.
थिंक टँक कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स (CFR) नुसार, IRGC म्हणजे इराणच्या सशस्त्र दलांच्या समांतर एक शक्ती आहे. लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या शाखेचा यात समावेश आहे. कुड्स फोर्स हे रिव्होल्युशनरी गार्डची विशेष सैन्य तुकडी आहे आणि त्याची जबाबदारी परदेशी भूमीवर संवेदनशील कारवाया करणे आहे. खरं तर कुड्स फोर्स ही हिजबुल्लाह, इराकचे शिय्या लढवय्ये किंवा इराणच्या जवळच्या सशस्त्र गटांना शस्त्रे आणि प्रशिक्षण देते. याशिवाय इराणमध्ये बसिज फोर्सदेखील आहे, जी स्वयंसेवकांची फौज आहे. यामध्ये सुमारे ९० हजार स्त्री-पुरुषांचा समावेश आहे. बसिज फोर्स गरज पडल्यास १० लाख स्वयंसेवक एकत्र करू शकते. बसिज फोर्सचे पहिले काम म्हणजे देशातील सरकारविरोधी कारवायांना सामोरे जाणे आहे.
कुड्स फोर्समुळे इस्रायलला नेमकी समस्या काय?
तेहरानने इराणच्या सीमेपलीकडे आपले हितसंबंध सुरक्षित करण्यासाठी मध्यपूर्वेतील कुड्स फोर्स युनिट्स एकत्रित केली आहेत. सौदी अरेबिया हा सुन्नी मुस्लिमबहुल देश असून, तिथे मोठी संसाधनं आहेत, तसेच तो देश समृद्ध आहे. तर इराणही शिया मुस्लिमांच्या प्रभावखाली असून, दोन्ही देश दीर्घ काळापासून भौगोलिकदृष्ट्या एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी राहिले आहेत. त्यावर लक्ष ठेवण्याचे काम कुड्स फोर्स करते. तसेच देशातील वांशिक आणि धर्माच्या आधारित संघर्षांमध्ये सामील असलेल्यांवर नियंत्रण ठेवण्याचंही कामही कुड्स फोर्स करते. खरं तर इराणला इस्रायल आणि अमेरिकेची मैत्री खुपते. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खोमेनी यांनी अमेरिका मोठा राक्षस आणि इस्रायलला लहान राक्षस म्हटलं आहे. १९७९ च्या क्रांतीपासून इराण अमेरिकेच्या निर्बंधांखाली आहे. इराण आणि इस्रायलमधून वास्तवही जात नाही. १९९० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच दोन्ही देशांचं शत्रुत्व जगानं उघडपणे पाहिले आहे. दोन्ही देश एकमेकांविरोधात छुप्या कारवाया करीत असतात. इराणचा आण्विक कार्यक्रम हा इस्रायलला धोका वाटतो, तर इस्रायलने इराणविरोधात सायबर हल्ला केल्याचाही संशय आहे. कुड्स फोर्स ही शिया दहशतवादी गटाला लष्करी अन् आर्थिक मदत करते. इस्रायली आणि अमेरिकेच्या हितसंबंधांवर हल्ले करण्यासाठी इराणकडून कुड्स फोर्सचा वापर केला जातो.
हेही वाचाः विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? अलीच्या समाजाचे स्वराज्य रक्षणात काय योगदान?
सीरियामध्ये कुड्स फोर्सची उपस्थिती किती उल्लेखनीय?
२०१० च्या दशकाच्या सुरुवातीस जेव्हा सीरियामध्ये गृहयुद्ध सुरू झाले, तेव्हा शिया धर्मस्थळांचे संरक्षण करण्यासाठी कुड्स फोर्स देशात स्थापित करण्यात आली. त्यांनी युद्धात सक्रियपणे हस्तक्षेप केला आणि सीरियाच्या सरकारी सैन्याच्या बाजूने ISIS विरुद्ध लढा दिला आणि अमेरिकेच्या तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांना सत्तेवर ठेवण्यासाठी रशियन लोकांबरोबर काम केले. दमास्कस आणि तेहरान हे जवळचे सामरिक मित्र आहेत. कुड्स फोर्सची सीरियामध्ये लक्षणीय उपस्थिती आहे. इराणने देशभरात डझनभर लष्करी तळ उभारल्याचं सांगितलं जात आहे. लेबनॉनमधील दहशतवादी गटाचा विकास आणि कार्य पुढे नेण्यात मदत करण्यासाठी जनरल झहेदी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, असेही एपीने सांगितले आहे. या हल्ल्यात हिजबुल्लाचा एक सदस्यही मारला गेला, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
कुड्स फोर्सच्या नेतृत्वाला यापूर्वी लक्ष्य केले गेले आहे का?
३ जानेवारी २०२० रोजी अमेरिकन सैन्याने इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर ड्रोन हल्ल्यात IRCG चे कमांडर आणि कुड्स फोर्सचे प्रमुख कासेम सुलेमानी यांना ठार केले. अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ डिफेन्सने म्हटले आहे की, परदेशात अमेरिकन कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी ही कारवाई एक निर्णायक पाऊल होती. इराकमधील अमेरिकन मुत्सद्दी आणि सेवा सदस्यांवर हल्ला करण्याच्या योजना सक्रियपणे विकसित करीत आहेत. २००३मध्येही अमेरिकेने इराकवर केलेल्या आक्रमणादरम्यान कुड्स फोर्सेसने अमेरिकन लष्करी जवानांवर हल्ला केल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. इराणने २०२० मध्ये बदला घेण्याचे वचन दिले आणि ८ जानेवारी रोजी इराकमधील अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्यावर क्षेपणास्त्र हल्ले केले. परंतु कोणतीही जीवितहानी झाली नाही.