सीरियामधील बंडानंतर अध्यक्ष बशर अल-असद देश सोडून पळून जाताच हमास युद्धात गुंतलेल्या इस्रायलने तातडीने लष्करी हालचाली करत दोन्ही देशांच्या सीमेवरील गोलन पठाराचा निर्लष्करीकरण करण्यात आलेला परिसर झपाट्याने ताब्यात घेतला. हे पाऊल आपल्या सुरक्षेसाठी उचलले असून ही तात्पुरती रचना असल्याचा दावा इस्रायलने केला असला, तरी हा संपूर्ण परिसर आपल्या ताब्यात असावा ही इस्रायली राज्यकर्त्यांची दीर्घ काळापासूनची मनिषा आहे. इस्रायलसाठी गोलन पठार महत्त्वाचे का, एकदा ताब्यात घेतलेला प्रदेश नेतान्याहू सहजासहजी सोडणार का, गोलन पठाराचे पश्चिम आशियातील सामरिक महत्त्व काय, याचा हा आढावा…
गोलन पठार कुठे आहे?
या परिसराचा केवळ नकाशा बघितला, तरी गोलन पठार इस्रायल आणि इराणधार्जिण्या दहशतवादी संघटनांसाठी महत्त्वाचे का आहे, याचा उलगडा होऊ शकेल. उत्तर दिशेला लेबनॉन (तेथे इराणपुरस्कृत हेजबोलाचे प्राबल्य आहे); पश्चिमेकडील सीमेवर इस्रायल; त्याच्या बरोबर उलट दिशेकडे, पूर्वेची मोठी सीमा सीरियाला लागून (तेथे एवढी वर्षे इराण-रशियाच्या पाठिंब्यावर असद कुटुंबाची सत्ता होती) आणि दक्षिणेकडे जॉर्डन या देशांच्या ‘चौका’वर सुमारे १२०० चौरस किलोमीटरचा हा पठारी भाग आहे. गोलन पठाराचा प्रदेश सुपीक असल्यामुळे अर्थकारणाच्या दृष्टीनेही हा परिसर महत्त्वाचा आहे. पठाराच्या पश्चिमेकडील भाग इस्रायलने तोडून आपल्याकडे घेतल्यानंतर तेथे शेती, पर्यटन आदी व्यवसाय सुरू केले. इस्रायल नियंत्रित गोलन पठाराची लोकसंख्या साधारण ५५ हजारांच्या आसपास आहे. यातील सुमारे २४ हजार नागरिक हे ‘ड्रुझ’ या अरब अल्पसंख्याक समाजाचे आहेत. विशेष म्हणजे यातील अनेक ड्रुझ हे सीरियातील असद राजवटीला मानणारे आहेत. इस्रायलने या भागाचा ताबा घेतल्यानंतर दिलेला नागरिकत्वाचा प्रस्तावही त्यांनी अमान्य केला होता.
पठाराचा भूराजकीय इतिहास काय?
१९६७ सालापर्यंत हे संपूर्ण पठार सीरियाच्या ताब्यात होते. मात्र सहा दिवसांच्या आखाती युद्धात इस्रायलने गोलन टेकड्यांचा बहुतांश परिसर ताब्यात घेतला व १९८१ साली तो एकतर्फी आपल्या भूभागाशी जोडून घेतला. बहुतेक अरब देशांची याला मान्यता नाही. गोलनचा काही भाग अद्याप सीरियाच्या ताब्यात असून इस्रायलने पठारावरून संपूर्ण माघार घ्यावी अशी सीरियाची भूमिका असून ती अर्थातच इस्रायलला मान्य नाही. असे असले तरी, १९७४मध्ये इस्रायल आणि सीरियातील युद्धविरामानंतर गोलनचे पठार अन्य पश्चिम आशियाच्या तुलनेत बऱ्यापैकी शांत आहे. २००० साली इस्रायल आणि सीरियाने गोलनबाबत वाटाघाटींचा अयशस्वी प्रयत्न केला. २०१७मध्ये अमेरिकेचे तत्कालीन (आणि भावी) अध्यक्ष वादग्रस्त शहर जेरुसलमला इस्रायलची राजधानी म्हणून मान्यता दिली व आपला दूतावास तेथे नेला. त्यानंतर २०१९ साली त्यांनी गोलनवरील इस्रायलच्या सार्वभौम हक्काला मान्यता दिली. अर्थातच अरब राष्ट्रे या एकतर्फी घोषणेमुळे नाराज झाली.
इस्रायलसाठी गोलन परिसर महत्त्वाचा का?
सीरियामध्ये एवढी वर्षे इराणधार्जिण्या बशर अल-असद यांची निरंकुश सत्ता होती. दोन्ही देशांच्या मध्ये असलेला हा पठारी भाग त्यामुळे इस्रायलच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा मानला जातो. या परिसराचा वापर करून इराण किंवा त्यांचे अतिरेकी गट इस्रायलमध्ये कारवाया करण्याची शक्यता अधिक होती. परिणामी गोलन पठार ताब्यात असणे इस्रायलला स्वसंरक्षणासाठी आवश्यक वाटते. त्यामुळेच गोलन पठाराचा गॅलिली परिसर ताब्यात घेऊन तेथून इस्रायल सीरियावर नजर ठेवून होता. असद यांचा पाडाव होण्यापूर्वी इस्रायलने अनेकदा सीरियानियंत्रित गोलनमधील अनेक इराणी तळांवर हल्ले केले. यावरूनही गोलन पठाराचे सामरिक महत्त्व अधोरेखित होते. गोलन पठार ताब्यात असण्याचे दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या परिसरात आभावाने आढळणारी नैसर्गिक सधनता… गोलनमध्ये अनेक नैसर्गिक जलस्रोत असून तेथील जमीनही सुपिक आहे. त्यामुळेच इस्रायल आणि सीरिया या दोघांनाही गोलनचा ताबा आपल्याकडे असावा असे वाटते.
इस्रायल संपूर्ण पठार ताब्यात घेणार?
एकीकडे बशर अल-असद यांचे विमान मॉस्कोच्या दिशेने निघाले असताना गोलन पठाराच्या निर्लष्करीकरण करण्यात आलेल्या भागात इस्रायली सेनांनी धडक दिली आणि तो परिसर ताब्यात घेतला. इस्रायलच्या म्हणण्यानुसार असद यांच्या पाडावानंतर सीरियाचे राज्यकर्ते कोण होणार आणि त्यांचे गोलनबाबत धोरण काय असणार हे अस्पष्ट असल्यामुळे आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचलले आहे. परिस्थितीचा अंदाज घेतल्यानंतर ‘बफर झोन’मधून आपण माघार घेऊ, असे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. मात्र आजवरचा इतिहास बघता इस्रायल गॅलिलीप्रमाणेच नव्याने ताब्यात घेतलेला परिसरही आपल्याकडेच ठेवेल आणि तेथे नव्याने इस्रायली वस्त्या निर्माण करेल, अशी शक्यता आहे. कदाचित अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने याला मान्यता दिली नसती. मात्र जानेवारीपासून जेरुसलेमला इस्रायलची राजधानी करणारे ट्रम्प पुन्हा राष्ट्राध्यक्ष होत असल्यामुळे नेतान्याहूंच्या या संभाव्य कृतीला अमेरिकेचा पाठिंबा मिळण्याचीच शक्यता अधिक आहे. हे समीकरण मांडूनच इस्रायलने सीरियातील अराजकाचा फायदा उठवित गोलन पठार ताब्यात घेण्यास सुरुवात केली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
amol.paranjpe@expressindia.com