-प्रशांत केणी
सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या प्रलंबित पाचव्या कसोटी सामन्यासाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराकडे भारताचे कर्णधारपद सोपवण्यात आले. बुमरा हा भारताचा ३६वा कसोटी कर्णधार असला तरी कपिल देव यांच्यानंतरचा फक्त दुसराच वेगवान गोलंदाज आहे. रोहित शर्माला करोनाची लागण झाल्यामुळे आणि केएल राहुलच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया झाल्यामुळे बुमराकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. परंतु तरीही भारताच्या कसोटी कर्णधारपदावर फलंदाजांचेच वर्चस्व आढळते. बुमराच्या निमित्ताने भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनणे दुर्मीळ का आहे, याचा घेतलेला वेध.
जागतिक क्रिकेटमध्ये कोणत्या वेगवान गोलंदाजांनी कर्णधारपद सांभाळले आहे?
लक्षवेधी उदाहरणे द्यायची झाल्यास कोर्टनी वॉल्श, वसिम अक्रम, वकार युनुस, मश्रफे मोर्तझा, बॉब विलिस, हीथ स्ट्रीक, डॅरेन सामी, जेसन होल्डर, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमरा या निव्वळ वेगवान गोलंदाजांसह कपिलदेव, शॉन पोलॉक, इम्रान खान, इयान बोथम या अष्टपैलू वेगवान गोलंदाजांनी जागतिक क्रिकेटमध्ये कर्णधारपद सांभाळले आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज कर्णधार दुर्मीळ का असतात?
वेगवान गोलंदाजांच्या कारकीर्दीचा बराचसा भाग दुखापतींशी झगडण्यात जातो. त्यामुळे तंदुरुस्ती राखून सातत्याने नेतृत्व करणे हे कठीण असते. त्यामुळेच जागतिक क्रिकेटमध्ये वेगवान गोलंदाज कर्णधार झाल्याची फार थोडी उदाहरणे आढळतात. वेगवान गोलंदाज आक्रमकपणे चेंडू टाकताना आपली पूर्ण ऊर्जा वापरतो. या साथीने संघाची रणनीती ठरवणे आणि मानसिकदृष्ट्या अन्य गोलंदाजांनाही पाठबळ देणे हे सोपे नसते, असे क्रिकेटमधील जाणकारांचे म्हणणे आहे. आता अनेक देश वेगवान गोलंदाजांचा ‘रोटेशन’ पद्धतीने वापर करीत त्यांच्यावरील खेळाचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे दीर्घ काळ प्रत्येक सामन्यासाठी वेगवान गोलंदाज उपलब्ध राहतीलच याची शाश्वती नसते.
भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार का घडले नाहीत?
कपिलदेव यांच्या जडणघडणीच्या वयात प्रशिक्षण शिबिरात त्यांना अधिक आहार हवा होता. तेव्हा वेगवान गोलंदाजाला उत्तम आहार लागतो, असे ते तेथील अधिकाऱ्यांना पटवून देऊ लागले. तेव्हा ते अधिकारी कपिल यांना म्हणाले, ‘‘भारतात वेगवान गोलंदाज नसतात.’’ भारताने कसोटी क्रिकेटमध्ये जी कर्तबगारी दाखवली आहे, तीच मुळी फिरकीच्या बळावर हे वास्तव नाकारता येत नाही. देशात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या करून पाहुण्या संघांवर वर्चस्व गाजवायचे आणि परदेशातील वेगवान माऱ्यापुढे हाराकिरी पत्करायची, हा भारतीय क्रिकेटचा इतिहास वर्षानुवर्षे कायम होता. त्यामुळे दर्जेदार वेगवान गोलंदाज त्या काळात भारतात घडले नाहीत. वेगवान गोलंदाजांचा वापर त्या काळात प्रामुख्याने चेंडू जुना करण्यासाठी व्हायचा. कारण चेंडू जुना झाला की तो फिरकी गोलंदाजांना अधिक साथ द्यायचा. वेगवान गोलंदाजांची वानवा असल्याने बऱ्याचदा मग सुनील गावस्कर यांच्याकडेही चेंडू दिला जायचा. त्यामुळेच कपिल आणि आता बुमरा वगळता भारतात वेगवान गोलंदाज कर्णधार बनले नाहीत. मात्र गेल्या चार-पाच वर्षांत भारतामधील हे चित्र पालटले आहे. इशांत शर्मा, बुमरा, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी अशी वेगवान गोलंदाजांची फळी निर्माण झाली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांच्या बळावर परदेशात आपण जिंकू शकतो, हा विश्वास सार्थ ठरवला आहे. यात उमरान मलिक, टिलक वर्मा, मोहसिन खान, मुकेश चौधरी आणि अर्शदीप सिंग अशा नव्या गोलंदाजांचीही भर पडते आहे.
कर्णधारपद सांभाळणारे वेगवान गोलंदाज कपिलदेव यांचे महत्त्व कशामुळे अधोरेखित होते?
१९८२-८३मध्ये कपिल यांच्याकडे प्रथमच नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. त्यांनी ३४ कसोटी सामन्यांत नेतृत्व करताना चार सामन्यांत विजय, सात सामन्यांत पराजय, तर २३ सामने अनिर्णीत राखले. कपिल यांनी १९७८मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले. त्यानंतर १३१ कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत त्यांना एकही सामना दुखापतीमुळे गमवावा लागला नाही. त्यांना वेगवान गोलंदाजांची भक्कम साथ लाभली नाही. चेतन शर्मा, मनोज प्रभाकर, रॉजर बिन्नी, जवागल श्रीनाथ या त्यांच्या साथीदार गोलंदाजांची कारकीर्द तुलनेने अल्पकालीन ठरली. निवृत्तीप्रसंगी कपिल यांच्या खात्यावर कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक ४३४ बळी जमा होते.