गेल्या दशकांत चक्रीवादळे, त्यांच्या नोंदी, हवामानातील बदलांचा सखोल अभ्यास यामुळे चक्रीवादळे नेमकी कधी येणार याचा अचूक अंदाज जगभारत लावला जाऊ लागला आहे. यामुळे अनेक ठिकाणी तातडीची पावले उचलली जात संभाव्य मनुष्यहानी आणि काही प्रमाणात वित्त हानी टाळण्यास मदत झाली आहे. विशेषतः ज्या भागात चक्रीवादळे नियमित धडकतात तिथे चक्रीवादळांपासून कमी नुकसान व्हावे यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभ्या केल्याने नुकसानाची तीव्रताही कमी करण्यात यश मिळाले आहे. असं असलं तरी गेल्या वर्षात चक्रीवादळे बेभरवशाची झाल्याने या विषयातील तज्ञांची झोप उडाली आहे.
चक्रीवादळांचा अंदाज जरी वर्तवण्यात येत असला तरी गेल्या काही वर्षात अचानक चक्रीवादळाची वाढलेली तीव्रता आणि याचा अंदाज न बांधता येणे यामुळे होणाऱ्या नुकसानाची तीव्रताही वाढली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे क्युबाच्या पश्चिम भागातून गेलेले आणि आता अमेरिकेच्या दक्षिणेला फ्लोरिडावर धडकणारे Hurricane Ian – इआन नावाचे चक्रीवादळ. रविवारी समुद्रात चक्रीवादळच्या निर्मितीच्या वेळी याची तीव्रता कमी होती, मात्र अचानक याची तीव्रता वाढत आता या चक्रीवादळाचा समावेश चार नंबरच्या प्रकारात करण्यात आला आहे. प्रत्यक्ष चक्रीवादळाच्या ठिकाणी वाऱ्याचा वेग हा २०० किलोमीटर प्रति तास एवढा प्रंचड असणार आहे. हा सर्व बदल अवघ्या काही तासात झाला, तीव्रता वाढण्याचा अंदाज देता आला नाही ही खरी चिंता आहे. तेव्हा मुद्दा हा आहे की चक्रीवादळातील बदलांचा आणखी अंदाज का लावता येत नाही?
समुद्राचे वाढत असलेले तापमान
जागातीक तापमानात झालेल्या वाढीस अर्थात माणूस कारणीभूत आहे. १९०१ पासून समुद्राच्या तापमानाबद्द्ल निश्चित नोंदी उपलब्ध असून National Oceanic and Atmospheric Administration नुसार आत्तापर्यंत समुद्राच्या तापमानात एक अंश सेल्सियसपेक्षा कितीतरी कमी वाढ झालेली असली तरी त्याचा कमी अधिक परिणाम या सर्वत्र झालेला आहे. एक परिणाम अर्थात चक्रीवादळांवरही झालेला आहे. समुद्राच्या तापमानाl झालेल्या वाढीमुळे चक्रीवादळाची तीव्रता वाढण्यास आणखी हातभार लागत असल्याचं स्पष्ट झालं आहे. चक्रीवादळाची व्याप्ती आणि वेगही वाढत असल्याचे निरीक्षणानुसार स्पष्ट झालं आहे. उपग्रहांनी नोंदवलेल्या नोंदीनुसार १९७९ नंतर आठ टक्के चक्रीवादळांच्या तीव्रतेत बदल झाला आहे.
वाऱ्याचा वेग अचानक वाढतो
Massachusetts Institute of Technology चे चक्रीवादळ क्षेत्रातील तज्ज्ञ इमॅन्युएल यांच्या म्हणण्यानुसार समुद्राचे वातावरण आणि तापमान यामुळे चक्रीवादळाचा आकार अधिक वाढतो आणि यामुळे चक्रीवादळची तीव्रता आणि वेगही वाढतो. अमेरिकेत चक्रीवादळाच्या अभ्यास करणाऱ्या National Hurricane Center या संस्थेच्या म्हणण्यानुसार २४ तासात स्वरुप , तीव्रता आणि वेग वाढलेल्या चक्रीवादळाचे प्रमाण हे आता १९८० च्या दशकापासून आता पाच टक्के वाढलं आहे. म्हणजेच दरर्षी अंदाज वर्तवलेल्या चक्रीवादळांपैकी पाच टक्के चक्रीवादळांनी अंदाज खोटा ठरवला आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त नुकसान केलं आहे.
अंदाज चुकल्याने काय होतं?
जगात समुद्रावरुन जमीनावर धडकणाऱ्या चक्रीवादळांचे प्रमाण हे अमेरिकच्या पूर्व किनाऱ्यावर आणि समुद्रात तुलनेत जास्त आहे. यामुळे या भागात चक्रीवादळाचा अगदी तासातासाचा हिशोब मांडला जातो, वादळाच्या प्रवासाची माहिती जाहिर केली जाते. मात्र चक्रीवादळांची तीव्रता अचानक बदलत असल्याने नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. विशेषतः लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात संबंधित यंत्रणेची तारांबळ उडत आहे. वाढलेल्या वादळामुळे पावसाचे प्रमाण अचानक वाढल्याने अनेक भाग जलमय होत नुकसानीची तीव्रता कमी करणे अशक्य झाले आहे.
चक्रीवादळाचा हा लहरीपणा फक्त अमेरिकेत नाही तर जगात अनेक ठिकाणी आढळत असल्याने आधीच विध्वंसकारी ठरलेली चक्रीवादळे ही आता आणखी धोकादायक ठरत आहेत.