गावाच्या जल सुनिश्चिततेमध्ये तलावाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि म्हणूनच मागील काही शतकांमध्ये समाजाने हजारो तलावांची निर्मिती केली. मात्र, पुढील पिढ्यांचे दुर्लक्ष, वाढती लोकसंख्या, नागरिकीकरण याच्या रेट्यामुळे आज या तलावांची दुरवस्था झाली आहे. अनेक तलाव नामशेष झाले आहेत. पूर्व विदर्भातील गोंडकालीन तलाव अनेक दशके पाण्याची आणि सिंचनाची गरज भागवीत होते. आज यापैकी अनेक तलाव अस्तित्वातच नाहीत किंवा अतिक्रमण आणि प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. भंडारा येथील मनीष राजनकर आणि अनेक समाजसेवक निःस्वार्थपणे यावर काम करत आहेत. त्यांनी जवळजवळ पाच जिल्ह्यांत ४५ तलाव जिवंत केले आहेत.
तलाव मृत आहे हे कशावरून समजायचे?
तलावात पाणी असूनही तलाव मृत म्हणजेच मेलेला असू शकतो. पूर्व विदर्भात अशा मृत तलावाला ‘चापटा तलाव’ म्हणतात. म्हणजेच त्या तलावात फक्त पाणी आहे आणि कोणत्याही स्थानिक वनस्पती नाहीत. तलावात स्थानिक मासे तर नसतातच, पण पाणपक्षी आणि इतर जैवविविधताही फार कमी असतात. अशा तलावांमध्ये माशांची चांगली वाढ तर होत नाहीच, पण त्यांची चव आणि रंगही फिका असतो. त्यामुळे हा तलाव मृत समजला जातो.
तलावांचा उपयोग गावकरी कसा करतात?
गावात तलाव असेल तर कमीत कमी २६ प्रकारे त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. यातील सिंचन, जनावरांना पाणी पाजणे, तलावातील शेती यांसारखे काही मोजके उपयोग सोडले तर अधिकाधिक उपयोग असे आहेत, जिथे पाणी खर्च होत नाही. यात प्रामुख्याने मासेमारी, तलावातील खाद्य वनस्पती व कंद, गवतापासून झाडू तयार करणे यांसारखे उपयोग आहेत. तलावाच्या पाण्यातील जैवविविधताच लोकांना जगण्याचे साधन पुरवते.
तलाव जिवंत करण्यासाठी पहिला प्रयोग कुठे?
‘फाऊंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड इकॉलॉजिकल डेव्हलपमेंट’ या संस्थेने गोंदिया जिल्ह्यातील जांभळी गावातील स्थानिक ढिवर समाजातील लोकांसोबत चर्चा करून प्रयोग केला. दोन हेक्टर जलक्षेत्र असणाऱ्या नवतलावात आठ प्रकारचे स्थानिक मासे आणि दोन प्रकारचे पक्षी होते आणि माशांचे एकूण उत्पादन ४० किलो होते. स्थानिकांशी संवाद साधून तलावात असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मातीची आधी नोंद केली. कोणत्या मातीत कोणत्या वनस्पती येतात याची नोंद करून त्या वनस्पती तलावात पुन्हा वाढवायच्या असतील तर काय करावे लागेल, त्या कशा लावाव्या लागतील हे सर्व ठरवून प्रयोगाला सुरुवात केली.
प्रयोग काय आणि त्याचे परिणाम काय?
उन्हाळ्यात पाणी नसलेला तलावाचा भाग नांगरून काढला. त्यानंतर पावसाळ्यात त्या ठिकाणी एक ते दोन फूट पाणी जमा झाले. त्या वेळी तलावात ज्या वनस्पती असतात त्या इतर ठिकाणांहून मुळासकट आणून तलावात लावल्या. त्याची तीन महिने राखण केली. वनस्पतीसाठी हानिकारक असणारे विदेशी मासे त्यात टाकले नाही. याचे सकारात्मक परिणाम हळूहळू दिसू लागले आणि तब्बल तीन वर्षांनंतर तलाव जिवंत झाला. आज त्या ठिकाणी स्थानिक माशांच्या २८ जाती, १६ पक्षी प्रजाती आणि ४०० किलो माशांचे उत्पादन मिळाले.
तलावात जिवंत ठेवण्यात माशांचे महत्त्व किती?
मासेमारी योग्य पद्धतीने केली तर ती तलाव जिवंत ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. मासेमारीची पद्धत चुकली तर तलाव जिवंत राहण्याऐवजी ते मृत पावण्याची शक्यता असते. प्रत्येक माशासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे जाळे वापरावे लागते आणि त्याचे ज्ञान स्थानिकांना असते. शिकारी मासे अधिक असतील तर जास्त उत्पादन देणारे मासे राहात नाहीत. त्यामुळे या माशांची वाढ थांबते व परिणामी नैसर्गिक अन्नसाखळीमध्ये खंड पडतो. कारण हे अधिक उत्पादन देणारे मासे तलावातील वनस्पतींवर घरटी तयार करतात. हे मासेच नसतील तर या वनस्पतीदेखील राहात नाहीत.
विदर्भातील तलावांचे जिल्हे कोणते?
पूर्व विदर्भातील गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांची ओळख ‘तलावांचे जिल्हे’ अशी आहे. या भागात हजारो तलाव गोंड राजांच्या काळात बांधले गेले. या तलावांपासून शेतीचे संरक्षित सिंचन तर होतेच, पण सोबतच मोठ्या प्रमाणावर मासेमारीचे कामही होते. या तलावातील जल जैवविविधता गावातील लोकांना जगण्याचा आधार देते.