Lord Basaveshwara Jayanti 2023 कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय घडामोडी सध्या होताना दिसत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील गेल्याच वर्षी कर्नाटकातील लिंगायत पंथाची दीक्षा घेवून येणाऱ्या निवडणुकीची नांदी केली होती. गेल्या काही दिवसात अनेक भाजपा लिंगायत नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. १० मे २०२३ रोजी कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. अक्षय तृतीयेच्या दिवशी लिंगायत धर्माचे स्थापक भगवान बसवेश्वर यांची तिथीनुसार जयंती आहे. कर्नाटक निवडणुकीच्या मुखावर अनेक राजकीय घडामोडींसाठी ही सुवर्णसंधी असल्याचे मानले जात आहे. याच निमित्ताने बसवेश्वर स्वामी व त्यांनी स्थापन केलेल्या धर्माविषयी जाणून घेणे इष्ट ठरावे.
कोण होते भगवान बसवेश्वर?
कर्नाटक व काही प्रमाणात महाराष्ट्रात आढळणाऱ्या लिंगायत धर्माची स्थापना करणारे भगवान बसवेश्वर यांचा जन्म ११३१ साली वैशाख महिन्याच्या तृतीयेस झाला. त्यांच्या जन्मस्थानाविषयी अभ्यासकांमध्ये मतमतांतरे आहेत. कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी या गावात वीरशैव कुटुंबात वडील मादिराज आणि आईचे नाव मादलांबिका या दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे शिक्षण कृष्णा व मलप्रभा या नद्यांच्या संगमावरील कुडलसंगम येथील प्राचीन वीरशैव अध्ययन केंद्रात झाले होते.
आणखी वाचा: विश्लेषण: पंतप्रधान मोदी यांनी भारताला लोकशाहीची जन्मभूमी का म्हटले? संदर्भ नेमका काय आहे?
लिंगायत नक्की कोण आहेत?
शिव उपासना मूलाधार असलेल्या वीरशैव पंथाचीच ओळख ही लिंगायत म्हणून आहे, असे मानले जात होते. कोणत्याही परिस्थितीत वीराप्रमाणे शिव उपासना करणाऱ्या साधकास वीरशैव असे म्हटले जाते. बसवेश्वर स्वामी यांनी वीरशैव पंथाचा प्रभाव असलेला लिंगायत धर्म स्थापन केला. या धर्मात कोणत्याही जातीपातीचे बंधन नव्हते. तसेच स्त्री- पुरुष असे कोणीही लिंग धारण करू शकत असत. म्हणूनच समतावादी म्हणून या धर्माची ख्याती आहे. हे सर्व असले तरी लिंगायत व वीरशैव हे एकच असल्याचे काही अभ्यासक मानतात. परंतु बसवेश्वर यांच्या जन्मापूर्वीपासून वीरशैव हा आगम प्रधान पंथ अस्तित्त्वात असल्याचे सिद्ध झाले आहे. शिव हा या दोन्ही पंथांचा आद्य असला तरी दोन्ही पंथाच्या विचारसरणीत फरक असल्याने त्यांचे अस्तित्त्व वेगळे मानण्यावर लिंगायतांचा भर असतो.
बसवेश्वर यांचा लिंगायत व वीरशैव संप्रदाय यांच्यात नेमका फरक काय?
पूर्वी लिंगायत व वीरशैव हे एकच असल्याचे मानले जात होते. परंतु काही नवीन संशोधक हे दोन्ही वेगवेगळे असल्याचे मानतात. म्हणूनच कर्नाटक राज्यामध्ये लिंगायत संप्रदायाला स्वतंत्र अधिष्ठान मिळावे यासाठी लिंगायत समाजाकडून नेहमीच प्रयत्न केले जातात. वीरशैव हे हिंदूंच्या १६ संस्कारांमध्ये समाविष्ट असलेले सर्व संस्कार मानतात. लिंगायत समाजात उपनयन किंवा मुंज यांसारखे संस्कार पाळले जात नाही. वर्ण, जाती किंवा लिंगानुसार होणारा भेद लिंगायत पंथात झुगारून देण्यात आलेला आहे.
आणखी वाचा: विश्लेषण: Same-sex relationship: समलिंगी संकल्पना भारतासाठी नवीन आहे का ?
भगवान बसवेश्वर यांनी स्वतंत्र धर्म का स्थापन केला?
स्वामी बसवेश्वर हे मूलतः समानतावादी होते. त्यांच्या समानतावादी दृष्टिकोनाचा दाखला देताना त्यांच्या उपनयनाच्या वेळी घडलेल्या प्रसंगाचे उदाहरण दिले जाते. मी उपनयन करणार नाही, मी आधीच लिंगायत (वीरशैव) पंथाची दीक्षा घेतली आहे असे त्यांनी उपनयनप्रसंगी सांगितले. त्यांची भूमिका कर्मकांडाला विरोध करणारी होती, असे मानले जाते. त्यांनी कर्मकांड, वर्णभेद, वर्गभेद व जातीभेद यांना नेहमीच विरोध केला. १२ व्या शतकातील वाढलेल्या सामाजिक विषमतेला त्यांनी कडाडून विरोध केला. तत्कालीन भक्ती संप्रदाय चळवळीचा परिणाम त्यांचा विचारसरणीवर होता. त्यांच्या या धर्मात प्रवेश करताना एकदा का तुम्ही लिंग धारण केले की तुमच्या पूर्वाश्रमीच्या जातीच्या भिंती गळून पडत असत. त्या काळी समाजाच्या विविध थरातून अनेक स्त्री व पुरुषांनी या चळवळीत सहभाग घेतला होता. स्त्रियांना समान दर्जा देणारा ‘लिंगायत’ हा एकमेव धर्म आहे असा ठाम विश्वास लिंगायत समाज व्यक्त करतो, म्हणून १२ व्या शतकातील ३५ स्त्रिया (शरण- लिंगायत संप्रदायात लिंग धारण करणाऱ्या साधकास शरण असे म्हणण्यात येत असे) या धर्माची वचने लिहू शकल्या. तत्कालीन समाजातील शरीरविक्रय करणाऱ्या स्रिया आणि त्यावेळी शूद्र समजला जाणारा समाज यांनी मोठ्या प्रमाणात याच धर्माची दीक्षा घेतली होती. याशिवाय अपराधी म्हणून गणल्या गेलेल्या परंतु सुधारणेच्या वाटेवर असलेल्या अनेकांनी या धर्माची कास धरली होती.
भगवान बसवेश्वर यांनी समाधी का घेतली?
भगवान बसवेश्वर यांनी आपल्या आयुष्याच्या प्राथमिक टप्प्यात कामकाजाची सुरुवात बिज्जल दूसरा नावाच्या कल्याणी चालुक्यांच्या महामंडलेश्र्वराकडे कारकुनाच्या नोकरीपासून केली होती. हाच बिज्जल दूसरा पुढे जावून दक्षिण कलचुरी कुळातील स्वतंत्र राजा झाला. बिज्जल याने बसवेश्वर यांच्या सुधारणावादी धर्माला विरोध केला होता. परिणामस्वरूपी या राजाने त्यांच्या अनुयायांवर सैनिक धाडले होते. शेवटी या होणाऱ्या हिंसेला कंटाळून भगवान बसवेश्वर यांनी कूडलसंगम तेथे समाधी घेतली.
लिंगायत कर्नाटकच्या निवडणुकीत महत्त्वाचे का आहेत ?
Karnataka Assembly Elections 2023 हल्लीच जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी या मोठ्या नेत्यांनी भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यामुळे लिंगायत समाज दूर जाण्याची भीती भाजपाला वाटत आहे. त्यानंतर भाजपा नेत्यांच्या पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार म्हणून एखाद्या लिंगायत समाजाच्या नेत्याची घोषणा निवडणुकीपूर्वीच करावी असा सल्ला अनेकांनी दिला. त्यामुळेच लिंगायत समाजाचे कर्नाटकच्या निवडणुकीत असलेले महत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राजकीयदृष्ट्या प्रभावशाली लिंगायत समुदाय हा कर्नाटक राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे १७ टक्के आहे, उत्तर कर्नाटक मधील भाजपाचा सबळ मतदार वर्ग याच समाजातील आहे. दोन दशकांहून अधिक काळ भाजपचे समर्थक असलेल्या लिंगायतांनी राज्यातील २२४ विधानसभा जागांपैकी १०० जागांच्या निकालावर वर्चस्व गाजवले आहे. वर्षानुवर्षे, कठोर हिंदू जातिव्यवस्था टाळण्यासाठी मागास जातीतील अनेक लोकांनी लिंगायत होण्याचा पर्याय निवडला होता. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात असलेल्या समाजाच्या मतांसाठी काँग्रेस व भाजपा हे दोघेही ताकदीने प्रयत्न करताना दिसत आहेत.