Railway Interesting Facts: आयुष्यात कधी ना कधी तुम्हीही रेल्वेने प्रवास केला असेल हो ना? असं म्हणतात की मुंबईत तर अनेकांचं अर्ध आयुष्य हे लोकल ट्रेनमध्ये जातं. थोडक्यात काय तर ट्रेनचे स्टेशन व रेल्वेचा रूळ पाहिला नाही असे क्वचितच काही जण असतील. अलीकडे अनेक महानगरांमध्ये मेट्रो सेवाही सुरु झाल्या आहेत. या मेट्रोचे रूळ रेल्वे रुळापेक्षा वेगळे असतात. लोकल व मेट्रोच्या रुळाच्या रचनेबाबत अनेकांना कुतुहूल असते, रुळाचे क्रॉसिंग कसे केले जाते? रुळावरून रेल्वे ट्रॅक कशी बदलते? आणखी एक इंटरेस्टिंग निरीक्षण म्हणजे रेल्वेच्या रुळावर छोटे दगड किंवा खडी टाकलेली असते हे आपणही पाहिले असेल पण मेट्रोच्या रुळावर असे दगड टाकले जात नाहीत. याचे कारण काय? रेल्वेच्या रुळावर दगड का टाकले जातात? मेट्रोच्या रुळावर दगड का टाकले जात नाहीत? या प्रश्नांची सोपी उत्तरे आपण आज जाणून घेणार आहोत..
रेल्वे रुळावर दगड का टाकले जातात?
रेल्वे रुळांवर टाकलेल्या दगडांमागे एक विज्ञान लपलेलं आहे. रुळांच्या मधोमध ठेवलेल्या दगडांकडे बारकाईने पाहिल्यास तुम्हाला हे लक्षात येईल की, हे दगड काही थरांमध्ये टाकले जाते. जेव्हा ट्रेन लोखंडी रुळावर फिरते तेव्हा रुळावर कंपनं जाणवतात. लोखंडापासून तयार केलेल्या एका ट्रेनचे वजन जवळपास दहा लाख किलो इतके असते. यामुळे कर्कश्श आवाज व हालचाल होते. ट्रॅकवरील दगड, ज्याला गिट्टी म्हणतात, हे आवाज आणि कंपन कमी करण्याचे काम करतात.जगभरातील प्रत्येक रेल्वे रुळावर गिट्टी टाकली जात असली तरी, मेट्रो ट्रॅकवर हे दगड टाकले जात नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे मेट्रो ट्रॅक धातू किंवा दगडाने नव्हे तर काँक्रीटचे बनलेले असतात.
हे ही वाचा << विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?
रेल्वे रुळावर टाकण्यात येणारे दगड हे फार काळजीपूर्वक निवडावे लागतात. यासाठी पाणवठ्यांमध्ये असणारे किंवा गोलाकार कडा असणारे दगड वापरता येत नाहीत, असे दगड वापरल्यास जेव्हा ट्रेन रुळावरून जाते तेव्हा हे दगड हलून रुळाला आदळू शकतात. म्हणूनच रेल्वे रुळावर टाकण्यासाठी केवळ तीक्ष्ण व खबडबडीत कडा असलेलेच दगड वापरता येतात. या दगडी थरांच्या साहाय्याने रुळाच्या आजूबाजूला झाडे उगवत नाहीत तसेच दगडांच्या साहाय्याने जमिनीवरून रुळांची उंची थोडी वाढते. यामुळे अपवाद वगळता साधारण स्थितीत पावसाळ्यातही रूळ पाण्याखाली जात नाहीत.
हे ही वाचा << विश्लेषण: श्रद्धा वालकरच्या खुनाने हादरला देश; भारतात लिव्ह इन रिलेशनचे कायदे काय आहेत?
मेट्रोच्या ट्रॅकवर दगड का टाकले जात नाहीत?
मेट्रोचे ट्रॅक जमिनीवर फार क्वचितच बनवले जातात. ते एकतर जमिनीच्या वर किंवा जमिनीच्या खाली बांधले जातात याचा अर्थ असा आहे की त्यांची देखभाल करणे कठीण आहे आणि दगडांमुळे त्यांच्या देखभालीसाठी जास्त खर्च होऊ शकतो.
कंपनाची समस्या सोडवण्यासाठी मेट्रोचे ट्रॅक काँक्रीटने बनवले जातात. काँक्रीटची किंमत दगडापेक्षा जास्त असली तरी, मेहनत कमी करण्यासाठी तसेच मेट्रोच्या कंपनांमुळे रुळांची होणारी झीज टाळण्यासाठी काँक्रीटचा उपयोग अधिक फायद्याचा ठरतो.