महाराष्ट्रासह वेगवेगळ्या देशांत सध्या गणेशोत्सवाची धूम आहे. महाराष्ट्रासह पश्चिमेकडील अनेक राज्यांत १९ सप्टेंबरपासून या उत्सवाला सुरुवात झाली असून तो एकूण १० दिवस चालणार आहे. दरम्यान, गणेशोत्सवाला कोणी सुरुवात केली, असे विचारल्यावर लोकमान्य टिळकांचे नाव घेतले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढा बळकट करण्यासाठी लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी या उत्सवाची सुरुवात केली. लोकमान्य टिळकांचा हा प्रयोग काय होता? त्यामागे नेमका उद्देश काय होता? हे जाणून घेऊ या…
गणेशोत्सवाची प्रथा टिळकांनी रुजवली
१८९३ सालाच्या आधीही गणेश चतुर्थी साजरी केली जायची. मात्र हा सण कुटुंब स्तरावर साजरा केला जायचा. तेव्हा ब्राह्मण आणि उच्च जातीमधील लोक हा सण प्रामुख्याने साजरा करायचे. विशेष म्हणजे हा सण फक्त एक दिवस असायचा. मात्र कालांतराने या सणामध्ये बदल होत गेले. सध्या तर हा सण मोठ्या उत्साहात तब्बल दहा दिवस साजरा केला जातो. गणेशोत्सव हा सामूहिक स्तरावर साजरा करण्याची प्रथा लोकमान्य टिळकांनी रुजवली.
१९ शतकाच्या अखेरच्या दशकात अनेक राष्ट्रभक्तांचा उदय
१९ शतकाच्या अखेरच्या दशकात भारतभरात अनेक राष्ट्रभक्त नेते उदयास आले. यातील काही देशभक्त ब्रिटनमध्ये राहून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. यातील अनेक नेते आधुनिक नागरी आणि राजकीय अधिकारांची मांडणी करत होते. यासह ब्रिटिश राजकवटीकडून भारतीयांवर कशा प्रकारे अत्याचार केला जात आहे, ब्रिटिश राजवट ढोंगी असल्याचे हे नेते सांगत होते. १८५७ सालचा उठाव अपयशी ठरला. ब्रिटिश लष्करात काम करणाऱ्या भारतीय सैनिकांनी या काळात ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. मात्र ब्रिटिशांनी हे बंड चिरडून काढले. या उठावानंतर ब्रिटिशांना पूर्ण विरोध न करता, त्यांच्याकडून भारतीयांसाठी काही सुविधा आणि सवलती मिळाव्यात अशी भूमिका काही नेते घेऊ लागले.
टिळक पत्रकार, शिक्षक आणि राजकारणी
त्या काळात मात्र लोकमान्य टिळकांचे (१८५७ ते १९२०) विचार वेगळे होते. ते स्वराज्याची संकल्पना मांडायचे. ते एक पत्रकार, शिक्षक, राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते होते. १९८१ साली त्यांनी गो. ग. आगरकर यांच्यासह मराठा आणि केशरी या दोन वृत्तपत्रांची स्थापना केली. केशरी हे वृत्तपत्र मराठी तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी या भाषेत प्रकाशित व्हायचे. ते निर्भिड आणि बेधडक वृत्तीचे होते. हाच स्वभाव जोपासत ते या दोन नियतकालिकांत लेख लिहायचे.
हिंदू प्रतिकात्मकतेचा आधार घेत राजकीय मोहिमा राबवल्या
राष्ट्रीय पातळीवर महात्मा गांधी यांचा उदय होण्याआधी लोकमान्य टिळक हे ब्रिटशांच्या वसाहतवादी धोरणाला विरोध करणारे सर्वांत मोठे आणि कट्टरपंथी नेते मानले जात. ज्या काळात स्वराज्य, संपूर्ण स्वातंत्र्याची कल्पना करणे अवघड होते, त्या काळात टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणारच’ असा नारा दिला होता. ब्रिटिशांविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी त्यांनी तरुणांमध्ये नवचेतना निर्माण केली. तसेच लोकांना एकत्र करण्यासाठी हिंदू प्रतिकात्मकतेचा आधार घेत राजकीय मोहिमा राबवल्या.
१८९३ सालापासून गणेशोत्सव सामूदायिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात
त्याचाच एक भाग म्हणून टिळकांनी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रथा सुरू केली. १८९३ सालापासून गणेशोत्सव सामूदायिक स्तरावर साजरा करण्यास सुरुवात झाली. या उत्सवादरम्यान देशभक्तीपर गीते गायली जायची. तसेच राष्ट्रवादी विचारांचा प्रचार प्रसार केला जाई. दुसरीकडे वृत्तपत्रीय लेख, भाषण, संघटनेच्या माध्यमातून गणेशोत्सव हा सण सार्वजनिक पातळीवर साजरा करावा, असे लोकमान्य टिळक सांगत. त्याचाच परिणाम म्हणून आज संपूर्ण भारतभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून तरुणांना एकत्र करण्याचा प्रयत्न
धनंजय कीर यांनी लिहिलेल्या टिळकांच्या आत्मरित्रात्मक पुस्तकात गणेशोत्सवामागील दृष्टीकोनाबाबत लिहिले आहे. “संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सव सोसायट्या स्थापन करण्यात आल्या. तरुणांनी एकत्र येत गायन पार्ट्या स्थापन केल्या. गणेशोत्सवादरम्यान पुरोहित आणि नेते तरुणांना देशभक्ती आणि स्वातंत्र्याचे धडे देत होते, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते,’ असे कीर यांनी ‘लोकमान्य टिळक : फादर ऑफ इंडियन फ्रीडम स्ट्रगल,’ १९५९ या पुस्तकात लिहिलेले आहे. पुढे महाराष्ट्रातील तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी म्हणून टिळकांनी १९८६ साली शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचे ठरवले. याच वर्षी टिळकांनी कापडावर उत्पादन शुल्क लागू केल्यामुळे महाराष्ट्रात परदेशी कपड्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.
टिळकांचे जातीनिर्मूलन आणि स्त्री मुक्तीबाबत पुराणमतवादी विचार असल्याचा आरोप
टिळक भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचे नेते हेत्. मात्र त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला जातीय रंग दिल्याचा आरोप केला जातो. जातीनिर्मूलन आणि स्त्री मुक्तीबाबत टिळकांचे पुराणमतवादी विचार होते, असेही म्हटले जाते. १८९३ साली हिंदू आणि मुस्लीम समाजात जातीय संघर्ष निर्माण झाला होता. ११ ऑगस्ट १८९३ रोजी मुंबई शहरात या संर्घषाचे पडसाद उमटले होते. ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लीम यांच्यात संघर्ष निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले, असा आरोप तेव्हा टिळकांनी केला होता.
काळानुसार गणेशोत्सवात अनेक बदल
दरम्यान, आज आपण जो गणेशोत्सव पाहतो त्याची लोकमान्य टिळकांनी कदाचित कल्पनाही केली नसावी. काळानुसार गणेशोत्सवात खूप बदल झालेला आहे. आता गणेशोत्सवात राजकारणाचाही प्रवेश झाला आहे. असे असले तरी सध्या महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांत साजरा केला जाणारा गणोशोत्सव हा टिळकांच्या संकल्पनेतूनच उभा राहिलेला आहे.