प्रयागराजच्या महाकुंभ २०२५ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या व्यक्तींमध्ये अभय सिंह यांच्या नावाचा समावेश होता. आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी असलेले अभय सिंह महाकुंभमध्ये मोठा चर्चेचा विषय ठरले होते आणि आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध झाले. एरोस्पेस अभियंता होण्यापासून ते आध्यात्म स्वीकारण्यापर्यंतच्या त्यांच्या प्रवासाने अनेकांना भुरळ घातली आणि अनेकांचे लक्ष वेधले. परंतु, त्यांच्या लोकप्रियतेने आता नाट्यमय वळण घेतले आहे.
जुना आखाड्याने अभय सिंह यांना शिस्तीच्या कठोर संहितेचा भंग केल्याचा आणि त्यांचे गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप करत हा गुरू-शिष्य परंपरेतील गंभीर गुन्हा असल्याचे सांगत आखाड्यातून बाहेर काढले आहे. अभय सिंहने मात्र कोणत्याही चुकीचे कृत्य केले नसल्याचे सांगितले आहे आणि त्याच्याबरोबर असणाऱ्यांनी त्याच्या विरोधात अफवा पसरवल्याचा आरोप केला आहे. हा वाद कशामुळे निर्माण झाला? त्यांना आखाड्यातून बाहेर का काढण्यात आले? जाणून घेऊ.
हेही वाचा : बांगलादेशच्या संविधानातून ‘धर्मनिरपेक्ष’ शब्द हटणार? नेमका हा वाद काय?
आयआयटीयन बाबाची चर्चा
अभय सिंह हे आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस अभियांत्रिकी पदवीधर आहेत. त्यांनी आध्यात्मिक प्रवास सुरू करण्यासाठी आपले करिअर मागे सोडले आहे. हरियाणातील सासरौली गावातील रहिवासी असणारे अभय सिंह यांनी त्यांच्या अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी केली आणि नंतर कॅनडामध्ये वार्षिक ३६ लाख रुपयांच्या प्रभावी पगारावर काम केले. सिंह यांनी दावा केला की, आपण परदेशात नैराश्याशी लढा दिला. त्यांच्या मानसिक आरोग्याच्या समस्यांमुळे त्यांना जीवनाचा अर्थ शोधायचा होता. अशा प्रकारे त्यांनी सांगितले की, त्यांनी आपली उच्च पगाराची नोकरी सोडली आणि आध्यात्म शिकण्यासाठी ते भारतात परत आले.
‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या एका मुलाखतीत सिंह यांनी सांगितले की, बालपणापासून त्रस्त झालेल्या आणि घरातील अत्यंत क्लेशकारक कौटुंबिक हिंसाचाराचा त्यांच्यावर कसा परिणाम” झाला आणि त्यांनी आध्यात्मिक मार्ग कसा स्वीकारला. “माझ्या शाळेच्या दिवसात, मी संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता घरी यायचो आणि घरातील गोंधळापासून वाचण्यासाठी सरळ झोपी जायचो. जेव्हा सर्व काही शांत असायचे आणि कोणीही भांडण करत नसायचे तेव्हा मी मध्यरात्री उठून, दार बंद करून शांततेने अभ्यास करायचो,” असे सिंह म्हणाले.
लहानपणी आपल्या आई-वडिलांना भांडताना पाहून वाटलेल्या असहायतेबद्दल त्यांनी सांगितले, “लहानपणी तुम्हाला काय होत आहे हे समजत नाही आणि तुम्हाला प्रतिक्रिया कशी द्यावी हे कळत नाही. तुमचे मन पुरेसे विकसित झालेले नसते. तुम्ही केवळ असहाय असता,” असे त्यांनी पुढे सांगितले. अहवाल असे सुचवितो की, सिंह यांनी आयआयटी जेईई २००८ च्या परीक्षेत ७३१ ची अखिल भारतीय रँक (AIR) प्राप्त केली आणि त्यांनी आयआयटी बॉम्बेमध्ये प्रवेश मिळवला.
आयआयटीयन बाबांची हकालपट्टी का करण्यात आली?
आयआयटी बाबा म्हणून ओळखल्या जाणारे अभय सिंह यांनी त्यांचे गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरण्यासह गैरवर्तनाचा आरोप झाल्यानंतर जुना आखाड्यातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली. “अभय सिंहच्या कृती पवित्र गुरु-शिष्य (गुरु-शिष्य) परंपरेचे आणि संन्यासाच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या होत्या. एखाद्याच्या गुरुचा अनादर करणे हा सनातन धर्माचा आणि आखाड्याने पाळलेल्या मूल्यांचा घोर अवमान आहे,” असे जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक महंत हरी गिरी म्हणाले. वृत्तांमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, सिंह यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त व्हिडीओ पोस्ट केले. त्यांच्या वडिलांना हिरण्यकश्यप म्हणून संबोधले आणि त्यांच्या गुरुला वेडा म्हटले, ज्यामुळे द्रष्ट्यांमध्ये संताप पसरला.
आश्रमातील इतर द्रष्ट्यांनी ‘आज तक’ला सांगितले की, सिंहच्या सतत माध्यमांवरील देखाव्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम होत आहे, परिणामी ते अयोग्य वर्तन करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी अभय सिंहवर ड्रग्ज घेतल्याचा आरोपही केला आणि त्यामुळे त्यांच्या वागणुकीबद्दलच्या चिंता वाढल्याचे सांगितले. त्यामुळे जुना आखाड्याच्या शिस्तपालन समितीने त्यांची हकालपट्टी केली. सिंह जोपर्यंत आखाड्याच्या तत्त्वांचा आदर करत नाहीत आणि त्यांच्या शिस्तीचे पालन करत नाहीत तोपर्यंत त्यांना प्रतिबंधित केले जाईल. त्यांना आता आखाडा छावणी आणि परिसरात जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे.
आयआयटीयन बाबांची प्रतिक्रिया काय?
आयआयटी बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंह यांनी जुना आखाड्यातून आपली हकालपट्टी केल्याचा दावा नाकारला आहे. ‘इंडिया टुडे’शी बोलताना त्यांनी द्रष्ट्यांवर त्यांच्याबद्दल खोट्या अफवा पसरवल्याचा आरोप केला. “त्यांना वाटते की मी प्रसिद्ध झालो आहे आणि मी त्यांच्याबद्दल काहीतरी उघड करू शकतो, म्हणून ते दावा करतात की मी गुप्त ध्यानासाठी गेलो आहे. ते लोक मूर्ख गोष्टी बोलत आहेत,” असे सिंह म्हणाले. त्यांनी सांगितले की, मी अजूनही धार्मिक मेळाव्याला उपस्थित आहे.
हेही वाचा : जमिनीचे कायदेशीर अधिकार देणारी स्वामित्व योजना आहे तरी काय? याचा फायदा कोणाला होणार?
सिंह यांनी जुना आखाड्याचे महंत सोमेश्वर पुरी यांच्यावरही टीका केली, ज्यांनी यापूर्वी सिंह यांना त्यांचा शिष्य म्हणून संबोधले होते. “मी त्यांना आधीच सांगितले होते की, आमच्यात गुरु-शिष्याचे नाते नाही. आता मी प्रसिद्ध झालो आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला माझा गुरु केले आहे,” असे सिंह म्हणाले. याव्यतिरिक्त, सिंह यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. त्यांनी त्यांच्या मानसिक आरोग्याच्या स्थिरतेवर शंका घेणाऱ्यांवर टीका केली. “हे मानसशास्त्रज्ञ कोण आहेत, ज्यांना माझी मानसिक स्थिती माझ्यापेक्षा चांगली माहिती आहे? मला प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असली पाहिजे,” अशी टीका सिंह यांनी केली. सिंह यांनी त्यांच्याविरुद्धच्या दाव्यांना आव्हान दिल्याने आणि महाकुंभमेळ्यात त्यांची उपस्थिती कायम ठेवल्याने वाद वाढतच चालला आहे.