Mahashivratri 2025: यंदाच्या महाशिवरात्रीला महाकुंभचा समारोप झाला. महाशिवरात्र ही हिंदू वर्षगणनेच्या फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील १४व्या दिवशी पाळली जाते. महाशिवरात्रीचा शब्दश: अर्थ भगवान शंकराची भव्य रात्र असा आहे. सामाजिक तसेच अध्यात्मिक दोन्ही प्रकारांच्या उत्सवाचा या दिवशी संगम होतो. विविधता असलेल्या भारतातल्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये महाशिवरात्र विविध प्रकारे साजरी केली जाते. या वैविध्यावर टाकलेला हा एक कटाक्ष…
महाशिवरात्रीची कथा
सगळ्यात लोकप्रिय कथेनुसार अशी श्रद्धा आहे की या रात्री भगवान शंकराचं देवता पार्वतीशी विवाह झाला. त्यामुळे शंकराची मंदिरे सजवली जातात आणि या विवाहाचा जल्लोष साजरा करताना भाविक संपूर्ण रात्र जागे राहतात. हिंदूंच्या अनेक सणांमध्ये परमात्म्याची दैनंदिन जीवनाशी नाळ जोडलेली दिसून येते, त्यामुळे देवांचे जन्म व विवाहही भाविक साजरे करतात. शिवा आणि शक्ती यांचा विवाह म्हणजे चेतना आणि शक्ती यांचा मिलाप असून तो चांगलं संतुलित जीवनाचा पाया असल्याची धारणा आहे.
“महाशिवरात्र ही शंकर व पार्वती यांच्या विवाहाची रात्र असल्याची कथा अत्यंत लोकप्रिय आहे. पण यापलीकडेही अशी काही कारणं आहेत जी या दिवसाचं महत्त्व वाढवतात,” बनारस हिंदू विद्यापीठातील ज्योतिष विभागाचे प्रमुख गिरीजा शंकर शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
“लिंग पुराणात एक मत आढळतं, शंकरानं ज्या दिवशी ज्योतिर्लिंगाचं रुप धारण केलं तो दिवस म्हणजे महाशिवरात्र. हे लिंग इतकं प्रचंड होतं की ब्रह्मदेव व भगवान विष्णू आपापल्या हंस व गरुड या वाहनावर बसून याच्या मुळाचा व अंताचा शोध घ्यायला गेले पण त्यात अपयशी ठरले. शिवा ही अशी अमर्याद अतिंद्रीय शक्ती आहे. जिला आदी नाही वा अंत नाही,” शास्त्रींनी सांगितले.
शास्त्रींनी आणखी एक कारण सांगितलं. ते म्हणाले, “हा दिवस म्हणजे फाल्गुनातील कृष्ण पक्षाच्या १४व्या दिवस भगवान शंकराला विशेष प्रिय आहे आणि या दिवशी त्याची पूजा करण्याने जास्त अध्यात्मिक लाभ मिळतात.” भगवान शंकरांच्या कपाळावर चंद्रकोर आहे, तिचा आकार महाशिवरात्रीच्यादिवशी दिसणाऱ्या चंद्रकोरीसारखा आहे.
अलाहाबाद विद्यापीठातील प्राचीन इतिहासाचे प्राध्यापक डी. पी. दुबे यांनीही ब्रह्मदेव व भगवान विष्णू लिंगाची पूजा करत असल्याची पौराणिक कथा असल्याचे सांगितले. “सिंधू खोऱ्यातील संस्कृतीच्या काळापासून भारतामध्ये शिवलिंगाच्या पूजनाची प्रथा असल्याचे दुबे म्हणाले. राजस्थानमधील कालीबंगन येथील उत्खननात शिवलिंग आढळल्याचा दाखला त्यांनी दिला.
काश्मीरमध्ये महाशिवरात्र: हेरात
काश्मीरमधल्या शैव परंपरेमध्ये महाशिवरात्र हा एक खूप मोठा सण आहे. या उत्सवाबद्दल काश्मिरी हिंदूंच्या अशा काही श्रद्धा आहेत. ‘हर रात्री’ किंवा ‘हेरात’ असं त्याचं काश्मिरी रुप असून भारतातील अन्य ठिकाणी करतात त्याच्या एक दिवस आधी हा सण काश्मीरमध्ये साजरा केला जातो. काश्मीरमधील इतिहासकार उत्पल कौल सांगतात, “काश्मीरमध्ये शंकराची भैरव रुपात पूजाअर्चा केली जाते. आणि अशी श्रद्धा आहे की अनेक भैरव हे काश्मीरचं रक्षण करतात. पारंपरिक श्रद्धेनुसार मानण्यात येते की हेरातच्या दिवशी भगवान शंकर अत्यंत भीतीप्रद अशा लिंगाकाराच्या विद्युलतेमध्ये (ज्लाललिंग) प्रकट झाले. वाटुका भैरव व रमणा भैरव यांनी त्यांना शांत करायचा प्रयत्न केला. त्यामुळे या दोघांचीही या रात्री पूजा केली जाते. ही दोन लहान मुलांच्या रुपात असल्याने त्यांना स्वादिष्ट भोजन दिले जाते.”
तामिळनाडूमध्ये आनंद तांडव
महाशिवरात्रीसंदर्भात अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी आणखी एक परंपरा बघायला मिळते तामिळनाडूमधील चिदंबरम नटराज मंदिरामध्ये. अशी श्रद्धा आहे की या दिवशी शंकरानं आनंद तांडव सादर केले. त्यामुळे मंदिराच्या वतीने महाशिवरात्रीला भव्य उत्सवाचं आयोजन केलं जातं. आनंद तांडवाची गाठही उर्जा आणि जीवनाला अत्यावश्यक अशा शक्तींशी जोडलेली आहे.
व्हिएन्ना टेक्निकल इन्स्टिट्युटमधील अॅस्ट्रोफिजिसिस्ट व नर्तकी असलेल्या जाझिया डोनातोवित्झ यांनी १९९६ मध्ये एक शोध निबंध लिहिला. Symbolism of the Cosmic Dance of Shiva in the South-Indian Temple Dance Tradition, Leonardo, Vol. 29, No. 2) असे त्याचे नाव आहे. यात म्हटलंय की, “आनंद तांडव हे शिवाचं माणसाच्या ह्रदयात केलेलं नृत्य आहे. या नृत्यामध्ये ज्या प्रकारे अवयवांचा वापर केलाय त्यातून निर्मिती, जतन, सृजन, मुक्ती आदी पाच क्रियांचं प्रतीकात्मक दर्शन घडतं. नृत्यात उंचावलेला पाय हा स्वातंत्र्य दर्शवतो. डाव्या हातातील ज्योत विध्वंसातून झालेला बदल दर्शवतो. उजवा हात संरक्षणाचं आणि जीवनाचं जतन करणाऱ्या हमीचं प्रतीक आहे.”