स्वातंत्र्य दिन विशेष : दीड शतकाहून अधिक काळ रक्तरंजित लढा दिल्यानंतर १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताला ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळाले. राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला जात होता. मात्र, या समारंभाला स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झटणारे एक महत्त्वाचे शिलेदार महात्मा गांधी उपस्थित नव्हते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील अग्रणी नेते म्हणून महात्मा गांधी यांच्याकडे पाहिले जाते. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संसदेच्या संविधान सभेत ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ (नियतीशी करार) हे अजरामर भाषण दिले. त्यावेळी महात्मा गांधी कलकत्ता (आताचे कोलकाता) येथे फाळणीमुळे उफाळलेला धार्मिक संघर्ष कमी करण्याचा प्रयत्न करीत होते. १५ ऑगस्ट १९४७ साली ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधी यांनी काय केले? भारताच्या स्वातंत्र्याला ७६ वर्षे पूर्ण होत असताना इतिहासातील त्या दिवसाकडे परत एकदा डोकावण्याचा हा प्रयत्न …

हे वाचा >> भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य दिनी काश्मीरमध्ये नेमके काय घडत होते?

Shyam Manav, Shyam Manav Nagpur, constitution,
संविधानाचा मुद्दा, श्याम मानव अन् भाजपची राडा संस्कृती
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
BJP ambitions in Konkan spell trouble for Shinde group in Assembly Elections print politics news
कोकणात भाजपच्या महत्त्वाकांक्षा शिंदे गटासाठी अडचणीच्या
Ravindra Dhangekar Allegation, Radhakrishna Vikhe Patil,
महसूलमंत्र्यांच्या वरदहस्ताने पुनर्वसनाच्या जमिनीमध्ये २०० कोटींचा घोटाळा – आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप
delhi cm atishi pwd
Atishi : दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांचं ‘वर्क फ्रॉम होम’, म्हणाल्या; “फेकलेलं सामान…”
Lalu Prasad Yadav and Tejswi Yadav
लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या मुलांना दिलासा; ‘Land For Jobs’ घोटाळा प्रकरणी जामीन मंजूर!
maharashtra government taking rash decisions just to get votes
महायुती सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी कधी? काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांचा सवाल
ncp sharad pawar peace walk in mumbai
मंत्रालयासमोर ‘राष्ट्रवादी’ची शांतता पदयात्रा

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीच गांधी बंगालमध्ये दाखल

महात्मा गांधी यांचा उल्लेख राष्ट्रपिता, असा केला जातो. अहिंसात्मक आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी लाखो भारतीयांना ब्रिटिशांविरोधात लढण्यासाठी प्रेरित केले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही देशातील नागरिकांमध्ये एकोपा टिकावा यासाठी गांधी प्रयत्नशील होते. ९ ऑगस्ट १९४७ रोजी ते कलकत्ता येथे आले. कलकत्ताहून त्यांनी नाखौली (आता बांगलादेशमध्ये) येथे प्रवास केला. हा त्यांचा दुसरा दौरा होता. त्याआधी नोव्हेंबर १९४६ मध्येही ते नाखौलीत आले होते. फाळणीनंतर पूर्व बंगालचे रूपांतर पूर्व पाकिस्तानमध्ये करण्यात आल्यानंतर तेथील अल्पसंख्याक हिंदू समुदायाचे संरक्षण करण्याचे वचन महात्मा गांधी यांनी दिले होते, अशी माहिती महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी द हिंदू या दैनिकात लिहिलेल्या लेखात दिली.

स्थानिक मुस्लीम समुदायाच्या एका शिष्टमंडळाने महात्मा गांधी यांची भेट घेऊन मुस्लीम समुदायाचे रक्षण करण्यासाठी त्यांना कलकत्ता येथेच थांबण्याची विनंती केली होती. त्यानंतर गांधी यांनी एका अटीवर थांबण्यास होकार दिला. नाखौली येथे अल्पसंख्याक असलेल्या समुदायाच्या सुरक्षेची हमी देत असाल, तर माझा प्रवास थोडा पुढे ढकलतो, अशी अट त्यांनी ठेवली. पण, जर नाखौलीमध्ये हिंसाचार झाला, तर ते बिनशर्त आमरण उपोषण करणार असल्याचे त्यांनी सांगितले, असे ‘द हिंदू’ने आपल्या बातमीत म्हटले होते.

मुस्लीम लीगचे नेते आणि बंगालचे माजी महामंत्री हुसेन शाहीद सुहरावर्दी यांची महात्मा गांधी यांनी भेट घेतली. मुस्लीम समुदायाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करून सुहरावर्दी यांनी महात्मा गांधी यांना कलकत्त्यामध्येच थांबण्याची विनंती केली. त्या बदल्यात नाखौली येथील हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याचे आश्वासन सुहरावर्दी यांनी गांधींना दिले. ‘टेलिग्राफ’ने दिलेल्या बातमीनुसार, महात्मा गांधी यांना मुस्लीमबहुल वस्तीत राहायचे असल्यामुळे बेलियाघाटामधील हैदरी मॅन्शन (आता ते गांधी भवन या नावाने ओळखले जात असून, तिथे स्मारक उभारण्यात आले आहे) ही जागा दोन्ही नेत्यांना (सुहरावर्दी आणि गांधी) राहण्यासाठी निवडण्यात आली.

Gandhi_in_Noakhali_1946
१९४६ साली नाखौलीत दंगल उसळल्यानंतर महात्मा गांधी यांनी नाखौलीचा दौरा केला होता. (Photo – Wikimedia Commons)

हे वाचा >> स्वातंत्र्य दिन विशेष: इंग्रजांविरोधात स्वातंत्र्य लढ्यात पहिला मानवी बॉम्ब वापरणारी राणी ‘वेलू नचियार’!

तथापि, गांधींच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या काही हिंदू तरुणांनी त्यांच्याविरोधात निदर्शने केली. ‘द हिंदू’ने दिलेल्या बातमीनुसार गांधी त्यांना म्हणाले, “मी स्वतः तुमच्या संरक्षणाखाली राहणार आहे. तुम्हाला जर माझ्याविरोधात भूमिका घ्यायची असेल, तर तुमचे स्वागतच आहे. मी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहे. इथून पुढे मला आणखी दूर जायचे नाही. पण, मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की, तुम्ही यापुढेही वेडेपणा करणार असाल, तर तो पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. हाच इशारा नाखौलीमधील मुस्लिमांनाही मी दिलेला आहे. एवढे सांगण्याचा हक्क तर मी नक्कीच मिळवला आहे. जर नाखौलीमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला, तर त्यांना माझे मृत शरीर पाहायला मिळेल.”

१४ ऑगस्टच्या संध्याकाळी गांधी यांनी एका प्रार्थना सभेला संबोधित करताना लोकांना सांगितले की, त्यांनी भारतातील नागरिकांच्या खुशालीसाठी एक दिवसाचा उपवास करावा. ‘द हिंदू’ने दिलेल्या बातमीनुसार, प्रार्थना सभा आटोपताच हैदरी मॅन्शनवर हल्ला करण्यात आला. दगडफेक झाल्यामुळे खिडक्यांचा काचा फुटल्या. गांधी यांनी हल्ला करणाऱ्या जमावाशी संवाद साधून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी सुहरावर्दी यांना बोलावून घेतले; ज्यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर १९४६ रोजी नाखौली येथे झालेल्या हिंसाचाराची जबाबदारी स्वीकारली होती. हिंसाचार झाला तेव्हा सुहरावर्दी बंगालचे अंतरिम मुख्यमंत्री होते. ‘द वायर’ने दिलेल्या बातमीनुसार, मुस्लीम लीगच्या फाळणीच्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी नाखौलीमध्ये हिंदूंच्या विरोधात हिंसाचार घडवून आणला गेला, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.

‘द हिंदू’मध्ये तुषार गांधी यांनी लिहिलेल्या लेखानुसार, १४ ऑगस्टच्या रात्री जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या रात्री गांधींनी नेहमीप्रमाणे खादीसाठी सूतकताई केली आणि त्यानंतर ते शांत झोपले. गांधीजींचे सहकारी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्ष आचार्य कृपलानी हेदेखील स्वातंत्र्याचा सोहळा साजरा करण्यासाठी दिल्लीत न थांबता, कलकत्ता येथे आले होते, अशी माहिती ‘द प्रिंट’ने आपल्या लेखात दिली.

स्वातंत्र्यदिनी गांधी काय करीत होते?

१५ ऑगस्ट १९४७ हा दिवस गांधी यांनी प्रार्थना, उपवास आणि खादीच्या सूतकताईमध्ये घालवला. गांधी यांच्या स्नेही अगाथा हॅरिसन (लंडन) यांना लिहिलेल्या पत्रात गांधी सांगतात, “स्वातंत्र्य दिनासारखा मोठा कार्यक्रम साजरा करण्याचा माझा मार्ग म्हणजे देवाचे आभार मानणे आणि प्रार्थना करणे”

महात्मा गांधी यांच्या उपस्थितीमुळे चमत्कार घडला आणि कलकत्ता शहरातील हिंसाचार थांबला याबद्दल पश्चिम बंगालचे राज्यपाल सी. राजागोपालचारी यांनी महात्मा गांधी यांचे आभार मानले. त्यावर गांधी यांनी उत्तर दिले, “जोपर्यंत हिंदू आणि मुस्लीम एकत्र राहत असताना स्वतःला सुरक्षित समजत नाहीत आणि पूर्वीप्रमाणेच आपापल्या घरात राहण्यासाठी परतत नाहीत, तोपर्यंत मी समाधानी होऊ शकत नाही. जर हृदयपरिवर्तन झाले नाही, तर आज जी घडी बसलेली दिसत आहे, त्यामध्ये भविष्यात पुन्हा बिघाड होण्याची शक्यता आहे.”

पश्चिम बंगाल सरकारमधील अनेक मंत्री १५ ऑगस्ट रोजी महात्मा गांधी यांना भेटण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांना मार्गदर्शन करताना गांधी यांनी सांगितले, “आज तुम्ही डोक्यावर काट्यांचा मुकुट घातला आहे. सत्तेच्या खुर्चीवर बसणे ही त्रासदायक गोष्ट आहे. सत्तेच्या खुर्चीवर बसल्यावर तुम्हाला सदैव जागृत राहावे लागेल. हे करण्यासाठी तुम्हाला अधिक सत्यवादी, अधिक अहिंसक, अधिक नम्र व कमालीचे सहनशील व्हावे लागेल. ब्रिटिश राजवटीत तुम्ही या परीक्षेचा सामना केलेला आहे; पण माझ्या मते ती परिक्षा नव्हतीच. यापुढील काळात तुम्हाला अनेक आव्हाने, कठीण परीक्षा यांना सामोरे जावे लागेल. संपत्तीच्या आमिषाला बळी पडू नका. देव तुमची मदत करो. गाव आणि गरिबांच्या सेवेसाठी तुमची निवड झालेली आहे.” मनू गांधी यांच्या ‘द मिरॅकल ऑफ कलकत्ता या पुस्तकातील वरील उतारा ‘द टेलिग्राफ’ने आपल्या लेखात छापला आहे.

१९४६ रोजी नाखौलीत काय घडले होते?

भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या एक वर्ष आधी ऑगस्ट १९४६ मध्येच नाखौलीत हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. मोहम्मद अली जीना यांनी फाळणीची मागणी रेटून धरल्यानंतर नाखौली येथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंविरोधात हिंसा भडकली. ऑक्टोबर १९४६ रोजी हिंसाचाराची बातमी दिल्लीपर्यंत पोहोचली. तेव्हाच गांधी यांनी नाखौलीत जाण्याचा विचार पक्का केला. त्यानुसार ६ ऑक्टोबर १९४६ रोजी महात्मा गांधी यांनी प्रवासाला सुरुवात केली आणि ते दुसऱ्या दिवशी बंगालमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांच्यासमवेत खासगी सचिव प्यारे लाल नायर, डॉ. राम मनोहर लोहिया, जेबी कृपलानी, सुचेता कृपलानी, सरोजिनी नायडू आणि अन्य सहकारी होते.

९ नोव्हेंबर च्या दिवशी महात्मा गांधी विना सुरक्षा नाखौलीच्या दौऱ्यावर निघाले. पुढचे सात आठवडे ११६ किमींचा प्रवास आणि ४७ गावांचा त्यांनी दौरा केला. मुस्लीम लीगच्या सरकारने निर्माण केलेल्या अडचणींवर मात करून गांधींनी गावा-गावात जाऊन हिंसाचारात बळी पडलेल्या हिंदूचे अश्रू पुसले.