युरोपियन युनियनमध्ये राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी माल्टाचा गोल्डन व्हिसा कार्यक्रम महत्त्वाचा ठरत आहे. या कार्यक्रमात सर्वाधिक असलेल्या राष्ट्रीयत्वांमध्ये चीन, व्हिएतनाम, भारत, दक्षिण आफ्रिका आणि तुर्की यांचा समावेश आहे. यूएई गोल्डन व्हिसा आणि कॅनडाच्या गुंतवणूकदार व्हिसानंतर माल्टा परमनंट रेसिडेन्सी प्रोग्राम (एमपीआरपी) महत्त्वाचा ठरत आहे.

गुंतवणुकीद्वारे निवास किंवा गोल्डन व्हिसा हा दुसऱ्या देशात स्थलांतर, कायमस्वरूपी निवास किंवा अखेर नागरिकत्व मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे व्हिसा श्रीमंत व्यक्तींना निवासस्थानाचे अधिकार प्रभावीपणे खरेदी करण्याची संधी देतात.

माल्टा व्हिसा कार्यक्रमाचे नेमके आकर्षण काय?

एमपीआरपी, अर्थात माल्टा परमनंट रेसिडेन्सी प्रोग्राम अनेक कारणांमुळे अर्जदारांना आकर्षित करत आहे. माल्टा हे युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्र आहे. यामुळे रहिवाशांना शेंजेन क्षेत्रातून मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा मिळते. यामध्ये इतर २७ युरोपीय देशांचा समावेशही आहे.
“माल्टा हा त्याच्या समृद्ध इतिहासासाठी, वास्तुकलेसाठी आणि समुद्रकिनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे असे मत हेन्ली अँड पार्टनर्सचे रोहित भारद्वाज यांनी व्यक्त केले आहे. एमपीआरपी पाच वर्षांनंतर नैसर्गिकीकरणाच्या किंवा नागरिकत्वाच्या शक्यतेसह कायमस्वरूपी निवासस्थान देते. मालमत्तेतील गुंतवणूक आणि सरकारी योगदानावर आधारित हा एक स्पष्ट गुंतवणूक कार्यक्रम आहे. तसंच माल्टा ही १९६४ मध्ये स्वातंत्र्य मिळवलेली एक ब्रिटीश वसाहत आहे. माल्टा कॉमनवेल्थचा सदस्य तसंच यूकेशी सांस्कृतिक, कायदेशीर आणि आर्थिक घटकांशीही संबंधित आहे.

“यूकेतील अनेक व्यवसाय विशेषत: ब्रेक्झिटनंतर माल्टामध्ये स्थलांतरित झाले आहेत. हे व्यवसाय युरोपियन युनियन बाजारपेठेत प्रवेश आणि अनुकूल वातावरणाच्या प्रतीक्षेत आहेत. माल्टाचे मजबूत वित्तीय क्षेत्र, आय-गेमिंग उद्योग आणि यूकेच्या तुलनेत कमी खर्चिक राहणीमान यादेखील आकर्षणाच्या गोष्टी आहेत,” असेही भारद्वाज यांनी सांगितले. एमपीआरपीमध्ये भौतिक उपस्थितीची आवश्यकतादेखील बंधनकारक नाही, यामुळे अर्जदारांना दरवर्षी माल्टामध्ये कमीत कमी वेळ घालवूनही निवासस्थान कायम राखता येते. माल्टा गोल्डन व्हिसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये अर्जदारांसह त्यांचे पती-पत्नी, मुले आणि पालक यांचा समावेश करण्याचीही परवानगी आहे.

भारतीय गुंतवणूकदार नेमकं काय पाहतात?

युरोपियन युनियनमध्ये निवास शोधण्यासाठी एमपीआरपी हा दुसरा फायदेशीर पर्याय ठरत आहे. युरोपियन युनियनचे सदस्य राष्ट्र म्हणून माल्टा शेंजेन क्षेत्रात प्रवेश देतो. यामध्ये इतर २७ युरोपीय देशांचा समावेश असून व्हिसा-मुक्त प्रवासाची परवानगीही मिळते. हा कार्यक्रम व्यवसाय आणि विश्रांतीसाठी फायदेशीर असल्याचे आरआयएफ ट्रस्टचे गौरव नलावडे यांनी सांगितले आहे. देशाच्या गोल्डन व्हिसा कार्यक्रमामुळे अनुकूल कर रचना, गुंतवणूक संधी, स्थिरता आणि सुरक्षितता, उच्च दर्जाचे जीवनमान, कायमस्वरूपी निवास आणि नागरिकत्व असे अनेक फायदे भारतीयांना आकर्षित करत आहेत.

या व्हिसासाठी पात्रता निकष काय?

या गोल्डन व्हिसासाठी पात्र होण्यासाठी मुख्य अर्जदाराचे किमान वय १८ वर्षे असले पाहिजे आणि अर्जाच्या तारखेपासून त्यांच्याकडे पाच लाख युरो म्हणजेच ४.७ कोटीएवढी आर्थिक संपत्ती असणं गरजेचं आहे.
१. यासाठी ३ लाख ७५ हजार युरो म्हणजे ३ लाख ५३ कोटी इतकी मालमत्ता खरेदी किंवा १३.२ लाखाची भाडेतत्वावरील मालमत्ता तसंच त्यासंबंधित खर्च दाखवणे गरजेचे आहे.
२. भाडेतत्वावरील मालमत्ता असल्यास माल्टीज अर्थव्यवस्थेत ५६ लाखांचे परत न करण्यायोग्य योगदान आवश्यक.
३. बिगर-सरकारी संस्थेला १.८ लाखाची देणगी.
४. ४७ लाखांचे परत न करण्यायोग्य प्रशासन शुल्क.

इतर युरोपिय देशांचा आणि माल्टाचा व्हिसा यात काय फरक आहे?

युरोपियन युनियन ब्लॉकमधील अनेक देश गोल्डन व्हिसा देतात. यामध्ये पोर्तुगाल, ग्रीस आणि स्पेन यांचा समावेश आहे. गुंतवणूक आवश्यकता आणि गुंतवणुकीच्या स्वरूपाच्या बाबतीत हे व्हिसा माल्टाच्या व्हिसापेक्षा वेगळे ठरतात. माल्टाची किमान गुंतवणूक स्पेनपेक्षा कमी आहे, मात्र ग्रीस आणि पोर्तुगालपेक्षा थोडी जास्त आहे. असं असतानाही ते गुंतवणुकीबाबत अधिक फ्लेक्सिबिलिटी देते. माल्टा आणि ग्रीसमध्ये राहण्याची कोणतीही बंधनं नाहीत. याच कारणामुळे मोठ्या आणि व्यस्त गुंतवणूकदारांसाठी ते अधिक फायदेशीर ठरतात. स्पेनमध्ये जास्त काळ राहणं बंधनकारक आहे. बांधकाम व्यवसायातील गुंतवणूक, सरकारी योगदान आणि धर्मादाय देणग्या अशा परवडणाऱ्या गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध आहेत. हे गुंतवणुकीचे पर्याय इतर युरोपियन निवास पर्यायांच्या तुलनेत अधिक परिणामकारक ठरतात.

माल्टाच्या गोल्डन व्हिसाची कररचना कशी आहे?

माल्टामध्ये परदेशी उत्पन्नावर १५ टक्के कर आहे. तसंच इथे दुहेरी करारदेखील आहेत, जे भारतीय नागरिकांना दुहेरी कर टाळण्यास फायदेशीर ठरतात. माल्टाच्या व्हिसा कार्यक्रमात अनेक सकारात्मक बाबी आहेत, मात्र एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की संपूर्ण रिअल इस्टेट किंवा व्यवसाय गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या इतर युरोपियन युनियन कार्यक्रमांमध्ये माल्टामध्ये परत न करण्यायोग्य देणगी सरकारला देणे आवश्यक आहे. तसंच गुंतवणूकदारांनी मालमत्ता भाड्याने घेतली किंवा खरेदी केली तरी माल्टाच्या बांधकाम व्यवसायांतर्गत किमती वाढत असल्याचेही सांगितले जाते. माल्टा हे तात्काळ कायमस्वरूपी निवास, राहण्याचे बंधन आणि कर लाभ मिळवू पाहणाऱ्या श्रीमंत गुंतवणूकदारांसाठी उत्तम पर्याय आहे.