युक्रेनमध्ये जन्मलेल्या आणि जपानचं नागरिकत्व प्राप्त केलेल्या कॅरोलिना शिनो या मॉडेलने २०२४ मिस जपान सौंदर्यस्पर्धेचा किताब पटकावला. मात्र काही तासातच तिला हा किताब परत करावा लागला. नागोया आयची प्रांतातील २६ वर्षीय कॅरोलिना शिइनोने २२ जानेवारी रोजी टोकियो येथे आयोजित मिस जपान ग्रँड प्रिक्स पिजंट स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली नैसर्गिक जपानी नागरिक (नॅचुरलाईझ्ड जॅपनीज सिटीझन) ठरली.
काहींनी तिचे स्वागत केले तर काहींनी तिच्यावर टीका केली. एका स्थानिक मासिकाने तिचे एका विवाहित पुरुषासोबत अफेअर असल्याचा खुलासा केल्याने हा वाद आणखी उफाळला.
हा वाद काय?
शिनो आणि एका इन्फ्ल्युएन्सर डॉक्टरचे संबंध होते असं शुकान बुनशून या टॅब्लॉइडने दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. मात्र इतर कोणत्याही प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात बातमी दिलेली नाही. स्पर्धेच्या आयोजकांनी सुरुवातीला २६ वर्षीय तरुणीला पुरुषाच्या वैवाहिक आयुष्याबद्दल माहिती नसल्याचे सांगून तिचा बचाव केला. “‘मिस जपान असोसिएशन’चा विश्वास आहे की कॅरोलिना शिइनोचा कोणताही दोष नाही,” असे त्यांनी त्यांच्या वेबसाइटवर म्हटले.
परंतु नंतर त्यांनी पुष्टी केली की, तिला याबद्दल कळल्यानंतरही तिने हे नाते पुढे नेले. सोमवारी जारी करण्यात आलेल्या निवेदनात ‘मिस जपान असोसिएशन’ने म्हटले आहे की, तिने किताब सोडण्याची तयारी दर्शवली आहे किंवा किताब परत करणार असल्याचंही तिने सांगितलं. प्रायोजक, परीक्षक आणि चाहत्यांची माफी मागितली आहे. शिनो हिने किताब परत केल्यानंतर वर्षभर कुणीच या मुकूटाचा मानकरी होणार नाही.
सोमवारी तिच्या इंस्टाग्रामवर शिइनोने तिच्या फॉलोअर्सची माफी मागितली आणि लिहिले, “तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आणि ज्यांनी मला पाठिंबा दिला त्यांच्याशी विश्वासघात केल्याबद्दल मी सर्वांची माफी मागते.” ती पुढे म्हणाली की, भीतीमुळे तिने खरे बोलणे टाळले. ‘द इंडिपेंडंट’च्या म्हणण्यानुसार, शिइनोच्या एजन्सी ‘फ्री वेव्ह’ने त्यांच्यासोबतचा तिचा करार रद्द करण्याचा तिचा प्रस्तावही स्वीकारला आहे.
वंशावरून वाद
युक्रेनमध्ये जन्मलेली शिइनो वयाच्या पाचव्या वर्षी जपानला आली, जेव्हा तिच्या आईने एका जपानी पुरुषाशी लग्न केले. नागोया शहरात ती लहानाची मोठी झाली. ही स्पर्धा जिंकणारी ती पहिली नैसर्गिक जपानी नागरिक असली तरी, तिच्या या विजयाने जपानी असण्याचा नेमका अर्थ काय? या चर्चेला उधाण आले आहे. जपानी नागरिक तिच्यावर सातत्याने आरोप करत आहेत.
‘एक्स’वरील एका वापरकर्त्याने टिप्पणी केली की, “मिस जपान म्हणून निवडलेली ही व्यक्ती, हिला साधी जपानी भाषा येत नाही. ती १००% युक्रेनियन आहे. असे तो म्हणाला. “ती सुंदर आहे हे मान्य आहे, पण ही ‘मिस जपान’ आहे? हिचा जपानीपणा कुठे आहे?”, असा प्रश्नही त्याने केला. तर दुसऱ्याने सांगितले की, तिच्या विजयामुळे देशातील इतरांना चुकीचा संदेश मिळत आहे. “युरोपियन चेहरेपट्टी असणाऱ्या माणसांना सुंदर जपानी म्हटलं तर मूळ जपानी लोकांना काय वाटेल? असं करता येईल.”
एकाने म्हटले “तिचा जन्म जपानमध्ये झालेला नाही, तिला जपानी भाषा येत नाही. तिच्यात जपानचं असं काही नाही.” युक्रेनियन असलेल्या मॉडेलची निवड करणे एक राजकीय निर्णय असल्याचा आरोप एका वापरकर्त्याने केला. “जर ती रशियात जन्मली असती तर ती जिंकली नसती. तिला संधीही मिळाली नसती. साहजिकच यामागे राजकीय हेतु आहे.”
या प्रतिक्रियांना उत्तर देताना मिस जपान ग्रँड प्रिक्स पिजंट स्पर्धेचे आयोजक आय वाडा यांनी ब्रिटीश वृत्तवाहिनीला सांगितले की, स्पर्धेतील जजेसनी पूर्ण आत्मविश्वासाने शिइनोला विजेता म्हणून निवडले आहे. “ती सुंदर आणि सभ्य जपानी भाषेत बोलते आणि लिहिते आणि ती आपल्यापेक्षा जास्त जपानी आहे,” असे वाडा म्हणाले.
मिस जपानचा किताब
सर्व जपानी महिलांमधले सर्वोत्कृष्ट सौंदर्य हा किताब पटकावणारी शिइनो ही युरोपियन वंशाची पहिली महिला आहे. २६ वर्षीय शिइनोने गेल्या वर्षी इंस्टाग्रामवर सांगितले की, ती जपानी दिसत नसली तरी जपानमध्ये लहानाची मोठी झाल्यामुळे ती मनाने जपानी आहे.
मिस जपान ग्रँड प्रिक्स पिजंट स्पर्धेतील तिच्या भाषणात, तिने स्वतःला मनाने जपानी असल्याचे संगितले. “मला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागले. मला जपानी म्हणून स्विकारण्यापासून रोखले गेले. परंतु जपानी व्यक्ती म्हणून या स्पर्धेत मला ओळख दिल्याबद्दल मी कृतज्ञ आहे,” असे ती म्हणाली.
स्पर्धा जिंकल्यानंतर ‘जपान टाईम्स’शी बोलताना तिने तिच्या संघर्षांबद्दल सांगितले. “माझ्या संपूर्ण आयुष्यात मला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे मी जपानी नाही असं अनेकदा मला सांगण्यात आलं. तशी टीकाही झाली. परंतु मला माहित आहे की मी जपानी आहे. मी जपानी नाही हे सांगण्याचा कोणालाही अधिकार नाही. जर एखाद्या व्यक्तीला वाटते की ती जपानी आहे, तर ती आहे.” असे तिने स्पष्ट केले.
विजेतेपद जिंकणारी पहिली द्वि-वांशिक महिला
हेही वाचा : पाकिस्तानमध्ये अनेक महिलांना त्यांच्या पतींनी मतदानापासून रोखले; काय आहे यामागचे कारण?
बीबीसीच्या दुसऱ्या वृत्तानुसार, २०१५ मध्ये मिस जपानचा किताब जिंकणारी एरियाना मियामोटो ही पहिली द्वि-वांशिक महिला ठरली होती. तब्बल १० वर्षांनी शिइनो विजेती ठरली. २०१५ सालीही असाच काहीसा वाद सुरू झाला होता. मियामोटोचे वडील आफ्रिकन अमेरिकन आणि आई जपानी होती. मिश्र वंशाची असल्याने तिला स्पर्धा जिंकण्याची परवानगी द्यावी की नाही, या विषयावर वाद निर्माण झाला होता.