भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) चेंडूला चकाकी आणण्यासाठी पुन्हा एकदा लाळेचा वापर करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. शमीने अशी मागणी करण्यामागचे कारण काय, लाळेचा वापर केल्याने गोलंदाजांना कसा फायदा होतो, याचा घेतलेला आढावा.
शमीची मागणी काय?
दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीने ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडकातील बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पाच गडी बाद करीत सर्वांचे लक्ष वेधले. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात तीन बळी मिळवत संघाच्या विजयात योगदान दिले. एकूण चार सामन्यांत शमीने आठ बळी घेतले आहेत. तो स्पर्धेतील सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर शमीने ‘आयसीसी’कडे चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करण्यास परवानगी द्यावी, असे म्हटले आहे. ‘‘आम्ही चेंडू रीव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र, त्याकरिता आम्ही सामन्यात लाळेचा वापर करू शकत नाही. आम्हाला लाळेचा वापर करण्यासाठी परवानगी द्यावी, असे वारंवार सांगत आहोत. जेणेकरून आम्हाला चेंडू रीव्हर्स स्विंग करण्यासाठी मदत मिळू शकते,’’ असे शमी म्हणाला.

‘आयसीसी’ने लाळेच्या वापरावर बंदी का घातली?

करोना प्रादुर्भाव वाढल्यानंतर प्रथम मे २०२० मध्ये चेंडूवर लाळेचा वापर करण्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली होती. मात्र, सप्टेंबर २०२२ मध्ये ‘आयसीसी’कडून ही बंदी कायम करण्यात आली. ‘आयसीसी’च्या नवीन नियमानुसार क्रिकेटच्या कोणत्याही प्रारूपात खेळाडूवर लाळेचा वापर करता येत नाही. ‘आयसीसी’कडून बंदी घालण्यात आली असली, तरीही नियमात काही प्रमाणात सूटही देण्यात आली. खेळाडू चेंडूवर लाळेचा वापर करताना दिसला, तर पंच त्याला दोनदा ताकीद देईल. मात्र, पुन्हा तो खेळाडू नियमाचे उल्लंघन करताना आढळल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला पाच धावा देण्याचा नियम आहे. लाळेचा वापर करण्यास मुभा नसली, तरीही खेळाडू घामाने चेंडूवर चकाकी आणू शकतात.

गोलंदाजांसाठी लाळेचे महत्त्व काय?

गोलंदाजांसाठी चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचा वापर करणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, करोनानंतर यामध्ये बदल झाले. इतक्या वर्षांनंतर करोनाचे निर्बंध उठले, तरी ‘आयसीसी’चा लाळेसंबंधीचा नियम हा कायम आहे. लाळेचा वापर चेंडूवर केल्यास त्याला चमक येते. शिवाय त्यामुळे चेंडूची एक बाजू अधिक खडबडीत राहते. वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यास विशेष मदत मिळते. चेंडू जुना झाल्यावर रीव्हर्स स्विंग करता येतो. क्रिकेटच्या सुरुवातीपासूनच लाळेचा वापर गोलंदाज करतात. गेल्या काही काळात लाळेवरील बंदीमुळे गोलंदाज कमी प्रमाणात रीव्हर्स स्विंग करताना दिसतात.

साऊदी, फिलँडरकडून पाठिंबा

शमीच्या मागणीला माजी गोलंदाज व्हरनॉन फिलँडर आणि टीम साऊदी यांनी पाठिंबा देत लाळेचा उपयोग न करण्याच्या नियमामुळे खेळातून रीव्हर्स स्विंग हा प्रकारच बाहेर पडल्याचे म्हटले आहे. ‘‘या नियमाचा अवलंब करोना प्रादुर्भाव काळात करण्यात आला. आपण सध्या फलंदाज ३००हून अधिक धावसंख्या करताना पाहत आहोत. त्यामुळे सामन्यात गोलंदाजांसाठीही काहीतरी असणे गरजेचे आहे. त्यामुळे लाळेचा वापर करण्याची परवानगी अजूनपर्यंत देण्यात आली का नाही, हे मला कळत नाही. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये चेंडू सुरुवातीची काही षटके स्विंग होतो. लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये अधिक काळ चेंडू स्विंग करता येतो. मात्र, त्यालाही मर्यादा येतात. लाळेच्या वापराचा फायदा हा लाल चेंडूमध्ये अधिक मिळतो,’’ असे साऊदी म्हणाला. ‘‘आपण सामन्याच्या अखेरच्या षटकांमध्ये चेंडूची स्थिती पाहिल्यास ती चांगली नसते, अशा वेळी लाळेचा वापर केल्यास रीव्हर्स स्विंगची शक्यता वाढते. माझ्या मते गोलंदाजांना लाळेचा वापर करण्याची परवानगी देण्यात यावी. एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाज वरचढ होताना दिसत आहेत. बऱ्याच काळापासून चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळेचाच वापर केला जात होता. घामाच्या वापराला काही मर्यादा आहेत,’’ असे फिलँडरने सांगितले.

Story img Loader