पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २३ ऑगस्ट रोजी युक्रेन दौऱ्यावर जात आहेत. युक्रेनवर रशियाने २४ फेब्रुवारी २०२२ रोजी हल्ला केला. त्यानंतर युक्रेनला पंतप्रधानांची ही पहिलीच भेट असेल. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी रशियाला भेट दिली, त्यावेळी त्या भेटीविषयी अमेरिका, युक्रेनसह अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काही दिवसांनी पंतप्रधान युक्रेनलाही जाणार, या स्वरूपाचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. युक्रेनच्या दौऱ्यात मोदी त्या देशाचे अध्यक्ष वोदोलिमीर झेलेन्स्की यांच्याशी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करणार, युद्धात मध्यस्थी करणार का, याविषयी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिली युक्रेन भेट

भारताच्या कोणत्याही राष्ट्रप्रमुखाने आतापर्यंत युक्रेनला भेट दिलेली नाही. मोदींची नियोजित भेट विशेष असेल, कारण युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच कीव्हला जात आहेत. पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर ते काही दिवसांपूर्वी रशियाला जाऊन आले. त्यावेळी अमेरिका आणि युक्रेनसह अनेक देशांनी टीका केली होती. या पार्श्वभूमीवर युक्रेन भेटीचा बेत भारताच्या परराष्ट्र खात्याने आखल्याचे बोलले जात आहे. तीस वर्षांपूर्वी भारत आणि युक्रेन यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. यानंतर दोन्ही देशांचे प्रमुख काही आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने भेटले. मात्र मोदी भेटीच्या निमित्ताने प्रथमच भारतीय पंतप्रधान त्या देशाला भेट देत आहेत.

हेही वाचा : Super Blue Moon सुपर ब्लू मून म्हणजे काय? किती वर्षांनी घडते ही खगोलीय घटना?

रशिया भेट वादात?

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच म्हणजे ८ जुलै रोजी रशियाला भेट दिली. त्या भेटीत त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आलिंगन दिले, ज्याविषयी अनेक देशांनी नाराजी व्यक्त केली. ‘अतिशय निराशाजनक’ अशा शब्दांत झेलेन्स्की यांनी समाजमाध्यमांवर त्या प्रसंगाचे वर्णन केले. अमेरिकेने त्यानंतर कित्येक दिवस वेगवेगळ्या व्यासपीठांवरून भारताच्या आणि मोदींच्या त्या कृतीविषयी नाराजी व्यक्त केली. भारत हा समतोल साधण्याचा प्रयत्न करत असेल, तर ही कृती त्याच्या विपरीत ठरते असा अमेरिकेच्या टिकेचा सूर होता. मोदी रशियाला गेले त्याच दिवशी रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्र हल्ला केला, ज्यात काही मुलांचा मृत्यू झाला. मोदींनी पुतिन यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या हल्ल्याचा उल्लेख करून खेद व्यक्त केला. युद्धभूमीवर प्रश्न सुटत नसतात हेही मोदी यांनी पुतिन यांना एकापेक्षा अधिक वेळा ऐकवले आहे. पण पुतिन यांच्याशी त्यांच्या घनिष्ठ मैत्रीत त्यामुळे फरक पडलेला नाही. उलट पुतिन सहाव्यांदा अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पहिल्या नेत्यांमध्ये मोदीही होते.

समतोल साधण्याचा प्रयत्न

युक्रेनवरील हल्ल्याला रशिया ‘लष्करी कारवाई’ असे संबोधतो. या हल्ल्याबद्दल भारताने एकदाही रशियाचा निषेध केलेला नाही. उलट रशियाशी व्यापार सुरू ठेवणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. युक्रेनमधील बुचा नरसंहाराचा निषेध भारताने केला होता. खनिज तेल, शस्त्रसामग्री, खनिजे, धान्य आदींसाठी भारत रशियावर अवलंबून आहे. भारताची ही निकड युक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी मान्य केली आहे. पण रशियाविषयी अधिक नेमकी आणि कठोर भूमिका भारताने कधीतरी घ्यायला हवी, अशी या देशांची अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या युक्रेनसंबंधी ठरावांर तटस्थ राहून भारताने मात्र त्यांची निराशाच केली आहे. युक्रेन युद्धावर चर्चा, वाटाघाटी आणि सामोपचाराने तोडगा काढावा अशी भारताची अधिकृत भूमिका आहे. आम्ही यावर कायम आहोत असेही भारताने सांगितलेले आहे.

हेही वाचा : Kolkata doctor rape-murder case:पीडितेच्या पालकांनी ममता बॅनर्जींना विचारला जाब; ही दुटप्पी भूमिका का आणि कशासाठी?

अजेंड्यावर काय?

२४ ऑगस्ट हा युक्रेनचा राष्ट्रीय दिवस असतो. त्या दिवशी मोदींच्या भेटीसाठी युक्रेन सरकार प्रयत्नशील होते. मात्र त्याऐवजी २३ ऑगस्ट हा दिवस निवडण्यात आला आहे. मोदींची ही भेट सदिच्छा भेट स्वरूपाचीच असेल, असे विश्लेषकांना वाटते. भारत मध्यममार्गी भूमिका घेतो हे टीकाकारांना पटवून देण्याच्या दृष्टीने या भेटीचे महत्त्व आहे. त्यापलीकडे या भेटीतून फार अपेक्षा बाळगल्या जाऊ नयेत, असे काही विश्लेषक आणि माजी मुत्सद्दींना वाटते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why narendra modi visit ukraine chances of mediation in russia ukrain war print exp css