मानवाने ५० वर्षांपूर्वी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले होते. परंतु, याच चांद्रमोहिमेदरम्यान अंतराळवीरांनी चंद्रावर केलेला कचरा पृथ्वीवर आणण्यासाठी ‘नासा’ने एक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मानवी कचऱ्यावर उपाय शोधण्यासाठी नासा तीन दशलक्ष डॉलर्स म्हणजेच तब्बल २५ कोटी देऊ करत आहे. ‘नासा’ने त्यासाठी एका चॅलेंजची घोषणा केली आहे. या चॅलेंजचे नाव आहे ‘लुनारिसायकल चॅलेंज’. भविष्यात नासा अंतराळात अनेक योजना आखण्याच्या तयारीत आहे.
त्यामुळे अंतराळात अंतराळवीरांकडून निर्माण झालेल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, ‘नासा’करिता महत्त्वाचे आहे. ‘नासा’ने अशा प्रकारची प्रणाली विकसित करण्याचे आव्हान म्हणून जनतेसमोर ठेवले आहे, ज्याद्वारे चंद्रावर वास्तव्य करणाऱ्या अंतराळवीरांच्या कचऱ्याचा म्हणजेच विष्ठा, मूत्र व उलट्यांचा पुनर्वापर करता येईल. ‘नासा’ची ही कल्पना भविष्यातील अंतराळ मोहिमांमध्ये अमलात आणली जाणार आहे. नासाने लुनारिसायकल चॅलेंज का सुरू केले? त्यामागील नासाचा उद्देश काय? त्याविषयी जाणून घेऊ या.
अंतराळवीरांच्या विष्ठेचा पुनर्वापर करण्यासाठी मिळणार २५ कोटी
अपोलो मिशनमध्ये सहभागी झालेल्या १२ अंतराळवीरांनी मानवी विष्ठा आणि इतर कचरा असलेल्या ९६ पिशव्या चंद्रावरच सोडल्या. हा कचरा पुन्हा पृथ्वीवरून आणून नासा संशोधन करणार आहे. त्यातील विष्ठा, मूत्र व उलट्या यांचे खत, वीज व पिण्याचे पाणी यांसारख्या उपयुक्त संसाधनांमध्ये रूपांतर करणे, हे ‘नासा’चे मुख्य उद्दिष्ट आहे.
एका निवेदनात ‘नासा’ने म्हटले आहे की, ते विषारी उत्सर्जन कमी करण्यासाठी काम करीत आहे. “नासा भविष्यात अनेक अंतराळ मोहिमा करणार असून, अवकाश संशोधनासाठी ती वचनबद्ध आहे. नासा भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांची तयारी करीत आहे. त्यासह अंतराळातील कचरा कसा कमी करायचा, तो अंतराळ वातावरणात कसा साठवायचा, त्यावर प्रक्रिया कशी करायची व त्याचा पुनर्वापर कसा करायचा या बाबींवर विचार करावा लागणार आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
यासंबंधित जी व्यक्ती चांगली आणि उपयुक्त अशी कल्पना सुचवेल, त्या व्यक्तीला तीन दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे. १९६० आणि १९७० च्या दशकात अपोलो मोहिमांमध्ये, अंतराळवीरांनी चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले आणि त्यासाठी त्यांनी सूट, उपकरणे आणि त्यांच्या स्वतःच्या जैविक कचऱ्यापर्यंत सर्व गोष्टी अंतराळातच सोडल्या. नासा तिच्या आर्टेमिस कार्यक्रमांतर्गत अंतराळवीरांना पुन्हा चंद्राच्या पृष्ठभागावर पाठविणार आहे. त्यामुळे मानवी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पर्यावरणीयदृष्ट्या योग्य पद्धत शोधण्याची गरज असल्याचे ‘नासा’चे सांगणे आहे.
जगभरातील संशोधक हे चॅलेंज स्वीकारत असल्याचे नासाचे म्हणणे आहे. परंतु, आता या चॅलेंजअंतर्गत प्रवेशिका घेणे बंद करण्यात आले आहे. एजन्सी आता सर्वांत प्रभावी प्रस्तावांचा आढावा घेत आहे. त्यांनी जगातील सहभागी संशोधकांचे स्वागत केले आहे. या चॅलेंजमध्ये दोन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. पहिले म्हणजे हार्डवेअर आणि इतर घटकांचे प्रोटोटाईप तयार करणे. दुसरे म्हणजे पुनर्वापर प्रणालीची आभासी प्रतिकृती तयार करणे. या दोन पद्धती जगभरातील संशोधकांना सादर कराव्या लागणार आहेत.
अवकाशात सध्या मानवी कचऱ्याचे व्यवस्थापन कसे केले जाते?
चंद्र आणि मंगळावर पुढे अवकाश मोहिमा वाढत जाणार आहेत आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभावशाली कचरा निर्माण होणार आहे. ‘नासा’चे म्हणणे आहे की, चार अंतराळवीरांचा एक गट अंतराळात गेल्यास वर्षभराच्या तेथील प्रवासादरम्यान त्यांच्याकडून २,५०० किलोग्रॅम कचरा निर्माण होऊ शकतो. हा कचरा तेथील जागा तर व्यापतोच, पण त्याबरोबरच त्यामुळे अंतराळवीरांसाठी जैविक आणि भौतिक धोकेसुद्धा निर्माण होऊ शकतात
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) अंतराळवीर सध्या त्यांचा कचरा स्वतः पिशव्यांमध्ये भरून, व्यवस्थापित करतात. हा कचरा त्यासाठी तयार करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये ठेवला जातो. हा कचरा अंतराळयानावर अवलंबून असतो. कचरा पृथ्वीवर परत आणला जाईपर्यंत अंतराळ स्थानकावर साठवला जातो. या कचऱ्याचा पुनर्वापर करता आला, तर या समस्या कमी होतील, तसेच चालू मोहिमादेखील आणखी सोईस्कर होतील.
अंतराळवीरांचा कचरा कुठे जातो?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात निर्माण होणाऱ्या मानवी कचऱ्याचे काय होते, ही विचार करण्यासारखी बाब आहे. अंतराळात प्लंबिंग यंत्रणा नाही आणि त्यामुळे अंतराळवीरांची विष्ठा फ्लश करता येत नाही. त्याऐवजी हा कचरा इतर कचऱ्यासह एकत्रित केला जातो आणि अंतराळ स्थानकामधून फेकला जातो. नासाने दिलेल्या माहितीच्या आधारावर ‘फोर्ब्स’च्या २०१५ च्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की, पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश केल्यावर हा कचरा जळून जातो, ज्यामुळे त्यातील घटक एखाद्या ‘शूटिंग स्टार्स’सारखे दिसतात.
नासाच्या भविष्यातील मोहिमांबद्दल सांगायचे झाल्यास ‘नासा’ने आर्टेमिस मिशनची योजना आखली आहे. अंतराळवीरांना पुन्हा एकदा चंद्रावर नेऊन, त्या मोहिमेंतर्गत त्यांना बराच काळ चंद्रावर थांबावे लागणार आहे. चीन आणि रशियाही आपल्या अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्याच्या तयारीत आहे. भविष्यात इतरही देश अंतराळवीरांना चंद्रावर पाठविण्याची योजना आखू शकतात.