रशियात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेली बंडाची परिस्थिती शमली आहे आणि बंडखोरांना हद्दपार करण्यात आले आहे. वॅग्नर ग्रुपचे प्रमुख येवजेनी प्रिगोझिन यांनी बंडाचा झेंडा फडकावून क्रेमलिनच्या दिशेने चाल केली होती. मात्र, त्यांचे बंड एकाच दिवसात शमविण्यात आले. प्रिगोझिन सध्या बेलारूसमध्ये असल्याची माहिती खुद्ध बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी दिली. काही माध्यमांच्या बातम्यांनुसार- राजधानी ‘मिन्स्क’च्या ज्या हॉटेलमध्ये प्रिगोझिन थांबले आहेत, त्या हॉटेलला खिडक्या नाहीत. प्रिगोझिन यांना ठार मारण्याचा प्रयत्न होऊ नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
मग प्रश्न उभा राहतो की, प्रिगोझिन यांच्या खासगी सैन्यदलाचे काय झाले? रशियाच्या ‘फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस’ने माहिती दिल्यानुसार ‘वॅग्नर’च्या सैनिकांवरील फौजदारी खटला मागे घेण्यात आला आहे. तसेच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी जाहीर केले आहे की, वॅग्नरचे योद्धे रशियन सैन्यदलाशी करार करू शकतात आणि ते त्यांच्या कुटुंबाकडे परत जाऊ शकतात किंवा बेलारूसमध्ये थांबू शकतात. वॅग्नरकडे असलेली युद्धसामग्री, शस्त्रास्त्रे रशियन सैन्यदलाच्या ताब्यात दिली जाणार आहेत.
याचा अर्थ हा वॅग्नर ग्रुपचा शेवट आहे का? रशियात परिस्थिती कशीही असली तरी वॅग्नर ग्रुप आणखी वाढत असून, जगाच्या अनेक भागांतून या ग्रुपमध्ये भरती सुरू असल्याचे समोर आले आहे. नेपाळचे नाव यामध्ये घेतले जात आहे. ‘फर्स्टपोस्ट’च्या लेखानुसार नेपाळमधील लोकप्रिय गोरखा योद्धे वॅग्नर ग्रुपमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होत असल्याची बाब समोर आली आहे. नेपाळमधील योद्ध्यांना मॉस्कोत जायची गरज का भासली? रशियाच्या खासगी सैन्यदलात भरती होण्याचे काय फायदे आहेत? आणि याचा भारताशी संबंध काय? याबाबत घेतलेला हा आढावा…
हे वाचा >> गोरखा आणि कुकरी यांचा रंजक इतिहास माहितीये का?
वॅग्नर ग्रुपमध्ये गोरखाची भरती?
‘फर्स्टपोस्ट’च्या लेखातील माहितीनुसार, गेल्या काही काळात नेपाळमधील गोरखा रशियामध्ये जाऊन पीएमसी वॅग्नर ग्रुपमध्ये सामील झाले आहेत. किती नेपाळी युवकांनी रशियाच्या खासगी सैन्यदलात सामील होण्याचा निर्णय घेतला? याची आकडेवारी समोर आलेली नाही. पण, नेपाळी युवक रशियात जात आहेत, हे उघड सत्य आहे.
गोरखा हे नेपाळमधील योद्धे म्हणून ओळखले जातात. अनेक शतकांपासून त्यांनी आपल्या युद्धकौशल्याने पराक्रम गाजवला आहे. ‘भेकडाप्रमाणे जगण्यापेक्षा मृत्यू बरा’ हे गोरखांचे घोषवाक्य आहे. यावरून त्यांची रणांगणातील धाडसी वृत्ती दिसून येते. गोरखांच्या या शौर्यामुळेच अनेक वर्षांपासून नेपाळमधील युवकांना ब्रिटिश आणि भारतीय सैन्यदलात अधिकृतपणे प्रवेश दिला जातो. १८१५ सालापासून नेपाळी युवक गोरखा योद्धा म्हणून ब्रिटिशांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहेत. त्यावेळी त्यांना ब्रिटिश गोरखा म्हटले जात असे. हीच प्रथा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही सुरू राहिली. भारतीय सैन्यदलात इंडियन गोरखा म्हणून त्यांचा समावेश होतो. गोरखांच्या लोकप्रियतेमुळे काही वर्षांपासून चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’मध्येही गोरखांची भरती केली जात आहे.
आताही रशिया आणि नेपाळमध्ये याबाबत काही अधिकृत करार झालेला नाही. पण, अनेक नेपाळी युवक रशियातील खासगी सैन्यदलात भरती होण्यासाठी जात आहेत. नेपाळ सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एका सैनिकाने परराष्ट्र विभागातील अधिकाऱ्याला सांगितले की, दुबई येथे खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम केल्यानंतर त्याने मॉस्कोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मॉस्कोमध्ये पर्यटक म्हणून गेल्यानंतर तिथे जाऊन रशियाच्या खासगी सैन्यदलात सामील झालो, अशी माहिती त्याने दिल्याचे ‘फर्स्टपोस्ट’ने नमूद केले आहे. तसेच ‘वॅग्नर’मध्ये सहभागी होणारा हा एकटाच गोरखा नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही व्हिडीओंमधून नेपाळी युवकांनी रशियात सैन्याशी संबंधात प्रशिक्षण घेतले असल्याचे दिसून आले आहे.
‘वॅग्नर’मध्ये भरती होण्याचे कारण काय?
पण नेपाळी गोरखांना रशियात जाऊन खासगी सैन्यदलात भरती होण्याची गरज का भासली, या प्रश्नाचा शोध घेतल्यास काही महत्त्वाची कारणे समोर येतात. सर्वांत पहिले म्हणजे १६ मे रोजी रशियाने रशियन नागरिकत्व प्राप्त करण्याच्या नियमांमध्ये शिथिलता आणली. जे लोक रशियन सैन्यदलात किमान एक वर्षासाठी सेवा देतील त्यांच्यासाठी नागरिकत्वाची प्रक्रिया अधिक सोपी केली जाईल, असे रशियाने जाहीर केले आहे. रशियाने केलेल्या नव्या कायद्यानुसार जी व्यक्ती किंवा ज्यांच्या कुटुंबातील व्यक्ती रशियन सैन्यदलात सेवा देतील, त्यांना रशियन नागरिकत्व बहाल केले जाईल. त्यासाठी त्यांचा रहिवासी परवाना विचारात घेतला जाणार नाही.
याशिवाय रशियन सैन्यात भरती होण्यासाठी परदेशी नागरिकांना आता रशियन भाषा अनिवार्य करण्यात आलेली नाही. याचाच अर्थ रशियन भाषा यावी अशी अट नाही. अशा बाबींना मुभा दिल्यामुळे नेपाळी युवकांना रशियन खासगी सैन्यदल आकर्षित करत आहे. नेपाळमध्ये सध्या बेरोजगारीचा दर ११.२ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे अनेक गोरखा देश सोडून इतरत्र रोजगाराच्या शोधात जात आहेत.
नेपाळी माध्यमाला प्रतिक्रिया देताना एका नेपाळी युवकाने त्याचा ‘वॅग्नर’ भरतीचा किस्सा सांगितला. हा युवक रशियन विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी गेला होता. मात्र, त्याचा व्हिसा समाप्त झाला. मग त्याच्यासमोर त्यानंतर दोनच पर्याय होते- नेपाळमध्ये जाऊन बेरोजगार होणे किंवा रशियन सैन्यात भरती होणे. रशियन सैन्यात भरती झाल्यानंतर या युवकाला नेपाळी रुपयांमध्ये ५० हजार एवढे वेतन मिळत आहे, तसेच त्याला विमा सरंक्षण देण्यात आले आहे. काठमांडू येथील माध्यमाशी बोलत असताना या युवकाने सांगितले की, जर मी एका वर्षाच्या आत मेलो नाही, तर मला कायमचे रशियन नागरिकत्व मिळू शकते.
‘अग्निपथ’ योजनेमुळे भारतीय सैन्यदलातील भरती बंद
नेपाळी युवक वॅग्नर ग्रुपकडे वळण्याचे आणखी एक कारण असून, ते भारताशी संबंधित आहे. मागच्या काळात भारतीय सैन्यदलात गोरखांची भरती होत होती. मात्र, भारताने ‘अग्निपथ’ योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे सैन्यदलातील कार्यकाळ कमी झाला असून, निवृत्तिवेतन आणि इतर सुविधाही मिळणार नाहीत. त्यामुळे भारत आणि नेपाळमध्ये या विषयावरून थोडा विसंवाद निर्माण झाला आहे. या योजनेवर नाराजी व्यक्त करत नेपाळने सैन्यभरती प्रक्रियेची २०० वर्षे जुनी परंपरा खंडित केली आहे. अग्निपथ या योजनेबाबत अधिक स्पष्टता येईपर्यंत ही भरती प्रक्रिया बंद करण्यात आली आहे.
तिसरे कारण म्हणजे रशियात गेल्यामुळे तिथून युरोपमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होतो. नेपाळी गोरखांना चांगल्या जीवनशैलीची आस लागल्यामुळे हा मार्ग त्यांना अधिक जवळचा वाटतो. “मी फ्रेंच सैन्यदलात भरती होण्याचा विचार करत होतो. मात्र, त्यांची निवड प्रक्रिया लांबलचक आहे आणि युरोपमध्ये जाणे कठीण काम आहे. रशिया त्या तुलनेत खूप सोपे प्रकरण आहे”, अशी माहिती नुकत्याच वॅग्नरमध्ये भरती झालेल्या युवकाने नेपाळी माध्यमांना दिली असल्याचे ‘फर्स्टपोस्ट’ने सांगितले आहे.
वॅग्नर ग्रुपने रशियाच्या विरोधात बंड पुकरण्याच्या दिवसांपर्यंत बरीच लोकप्रियता मिळवलेली आहे. युक्रेनमध्ये लढत असताना बखमुत शहर काबीज करून वॅग्नरने आपल्या शौर्याचा दबदबा निर्माण केला. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वॅग्नर ग्रुपकडून सैनिकांना चांगला पगार आणि भत्ते दिले जातात. एका वॅग्नर सैनिकाला जवळपास २,५०० डॉलरपर्यंत (भारतीय रुपयांमध्ये २.०४ लाख) पगार मिळतो. रशियातील इतर क्षेत्रांतील नोकरदाराची तुलना केल्यास सरासरी पगार एक हजार डॉलरपर्यंत (८१ हजार रुपये) मिळत असल्याचे समोर आले आहे. यासाठीच नेपाळी युवक आपली विचारधारा बाजूला ठेवून रशियाची वाट धरत असल्याचे म्हटले जात आहे.
आणखी वाचा >> विश्लेषण: ‘वॅग्नर ग्रुप’चा भस्मासुर रशियावरच उलटणार? भाडोत्री लष्कराचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ!
हे चिंतेचे कारण का आहे?
नेपाळी गोरखा – रशिया संबंधाकडे भारताने गांभीर्याने पाहिले आहे. माजी लष्करप्रमुख जनरल वेद प्रकाश मलिक यांनी सांगितले की, भारताने आता सतर्क राहायला हवे आणि जे लोक खासगी सैन्यदलात काम करून आले आहेत, त्यांना आपल्या सैन्यात घेताना काळजी घेतली पाहीजे. एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलत असताना ते म्हणाले की, नोकऱ्यांची कमतरता असल्यामुळे बेरोजगार युवकांना प्रलोभन देण्यात येत आहे. सध्याच्या घडीला किती नेपाळी युवकांनी रशियात जाऊन वॅग्नर ग्रुपमध्ये सहभाग घेतला आहे, त्याची आकडेवारी माझ्याकडे नाही. मात्र, जेव्हा केव्हा नोकऱ्यांची कमतरता जाणवते, तेव्हा त्याचा लाभ असे काही घटक उचलत असतात.
दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रवक्ते खासदार जयराम रमेश यांनीही ट्विट करत यावर भूमिका मांडली आहे. गोरखांना जगातील चांगल्या योद्ध्यांपैकी एक मानले जाते. मात्र, ‘अग्निपथ’सारख्या चुकीच्या योजनेमुळे मागच्या २०० वर्षांची परंपरा असलेली गोरखा सैनिकांची भारतीय सैन्यदलातील भरती प्रक्रिया या वर्षी होऊ शकलेली नाही. या भरती प्रक्रियेत खंड पडल्यामुळेच त्याचा लाभ रशियातील वॅग्नर ग्रुपसारख्या खासगी सैन्यदलाने उचलला आहे.