पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी अरुणाचल प्रदेशातील ‘सेला टनेल’चे उदघाटन करण्यात आले. हा बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून १३ हजार फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. या बोगद्याचे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनद्वारे करण्यात आले असून या बोगद्यामुळे आता सर्वच मोसमांमध्ये आसामला थेट अरुणाचल प्रदेशातील तवांगशी जोडता येणार आहे. त्यामुळे रणनीतिकदृष्ट्यासुद्धा हा बोगदा भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. दरम्यान, हा बोगदा का बांधण्यात आला आहे? आणि या बोगद्याची वैशिष्ट्ये काय? याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हा बोगदा का बांधण्यात आला आहे?
तवांग हा प्रदेश भारत-चीन सीमेवर असून चीनची सीमा तवांगपासून केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहे. सद्यस्थितीत तवांगला पोहोचण्यासाठी दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे बालीपारा-चरिदुआर-तवांग मार्ग आणि दुसरा म्हणजे ओरांग-कालकतांग-शेरगाव-रुपा-टेंगा मार्ग. मात्र, हे दोन्ही मार्ग सेला पास येथे जोडले जातात.
याशिवाय तेजपूर ते तवांग मार्गावर नेचिफू, बोमडिला आणि सेला असे तीन प्रमुख पाससुद्धा आहेत. यापैकी बोमडिला पास हा सर्वच मोसमांमध्ये खुला असला तरी नेचिफू पास हा धुक्यांमुळे, तर सेला पास बर्फामुळे बंद राहायचा. त्यामुळे हिवाळ्यात तवांगला थेट पोहोचणे कठीण होते. त्यामुळे हा बोगदा बांधण्यात आला आहे.
सेला टनेलमुळे आता भारतीय सैन्याला कोणत्याही मोसमात थेट भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपर्यंत पोहोचता येणार आहे. तसेच कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीत चीनच्या सीमेपर्यंत सैन्य साहित्य आणि इतर मदत पाठवता येणार आहे. याशिवाय प्रवासाचा वेळही वाचणार आहे. तसेच या बोगद्यातून अवजड वाहनांची वाहतूकही करता येईल.
या बोगद्याची वैशिष्ट्ये काय?
हा बोगदा १३ हजार फूट उंचीवर बांधण्यात आला असून या बोगद्यासाठी ८२५ कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वच मोसमांमध्ये गुवाहाटीला थेट तवांगशी जोडता येणार आहे. या योजनेंतर्गत एकूण दोन बोगदे बांधण्यात आले असून एकाचे उदघाटन गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते. याशिवाय हे दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडण्यासाठी १२०० मीटरचा जोड रस्तादेखील बांधण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापैकी एक बोगदा १९८० मीटर लांब असून दुसरा बोगदा २१५५ किलोमीटर लांब आहे. या बोगद्यामुळे अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामिंग जिल्ह्यातील डेरांग ते तवांगमधील अंतर जवळपास १५ किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच यामुळे सुमारे ९० मिनिटांचा वेळही वाचणार आहे. याशिवाय बोगद्यात वेंटिलेशन सिस्टम, प्रकाशव्यवस्था आणि अग्निशमन यंत्रणादेखील बसवण्यात आली आहे.
हेही वाचा – मोठा पगार अन् पीआर व्हिसा; रशियाच्या युद्धात भारतीयांना कसे ढकलले जातेय?
तवांग प्रांत महत्त्वाचा का?
तवांग प्रांत हा चीनच्या सीमेपासून जवळपास ३५ किलोमीटर दूर आहे. महत्त्वाचे म्हणजे जवळपास अडीच वर्षांपूर्वी चीन आणि भारतीय सैन्यामध्ये झालेली चकमकही याच भागात झाली होती. ल्हासानंतर तवांग हे बौद्ध धर्मीयांचे दुसरे प्रमुख धार्मिक स्थळ मानले जाते. खरं तर पूर्वीपासूनच तवांग प्रांतावर चीनची वाईट नजर आहे. तवांग हा तिबेटचा भाग असल्याचा दावा चीनकडून करण्यात येतो. १९६२ च्या युद्धादरम्यानही चीनने तवांगचा ताबा घेतला होता. जवळपास एक महिना चिनी सैन्य तवांगमध्ये तैनात होते.