जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव मानल्या जाणाऱ्या हज यात्रेला जून २०२५ मध्ये सुरुवात होणार आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी अनेक कठोर नियम जाहीर केले आहेत. सौदी अरेबियाने या वर्षी लहान मुलांना प्रवेशबंदी केली आहे. त्यासह कठोर व्हिसा नियम, सुरक्षा उपाय व तंत्रज्ञान यांनी परिपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधादेखील लागू केल्या आहेत. हज यात्रेला दरवर्षी वाढणारी यात्रेकरूंची गर्दी पाहता, हा निर्णय घेण्यात आला आहे. हज यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोणकोणते निर्णय घेण्यात आले आहेत? या निर्णयांचा यात्रेकरूंवर काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊ.
हज यात्रेत मुलांच्या प्रवेशास बंदी
सौदी अरेबियाने स्पष्ट केले की, या वर्षी हजमध्ये लहान मुलांना प्रवेशबंदी आहे. सौदीच्या हज आणि उमराह मंत्रालयाने म्हटले आहे की, दरवर्षी वाढणाऱ्या गर्दीमुळे संभाव्य धोक्यांपासून मुलांचे रक्षण करण्याची गरज आहे. मुलांच्या सुरक्षेसाठी आणि हज यात्रेदरम्यान होणारी संभाव्य हानी कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. त्याशिवाय या वर्षी हजसाठी प्रथमच येणाऱ्या यात्रेकरूंना प्राधान्य देण्यात येणार आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/children-ban-in-hajj.jpg?w=830)
व्हिसा नियम अधिक कडक
मुलांच्या प्रवेशावर बंदी आणण्याबरोबरच सौदी अरेबियाने आपल्या व्हिसा धोरणातही बदल केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकारने पर्यटन, व्यवसाय व कौटुंबिक प्रवासासाठी एक वर्षाचा मल्टिपल एन्ट्री व्हिसा अनिश्चित काळासाठी निलंबित केला आहे. १ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या नियमांनुसार, भारतासह १४ देशांतील नागरिक केवळ ३० दिवसांसाठी वैध असलेल्या सिंगल-एन्ट्री व्हिसासाठी पात्र होऊ शकतात. अल्जेरिया, बांगलादेश, इजिप्त, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, इराक, जॉर्डन, मोरोक्को, नायजेरिया, पाकिस्तान, सुदान, ट्युनिशिया व येमेन येथील नागरिकांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
अनधिकृत पद्धतीने हज यात्रेला जाणाऱ्यांना रोखणे, हा या निर्णयाचा उद्देश आहे. यापूर्वी सौदी अरेबियात सिंगल-एन्ट्री व्हिसा असलेले अनेक लोक नोंदणीशिवाय हजमध्ये सहभागी झाले होते, त्यामुळे यात्रेतील गर्दीही वाढली होती. नवीन व्हिसा नियमानुसार, यात्रेकरूंना आता पवित्र स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अधिक कडक आणि महागड्या प्रक्रियेतून जावे लागणार आहे.
परंतु, या निर्णयाचा भारतीयांवर लक्षणीय परिणाम होणार आहे. कारण- भारतातून मोठ्या संख्येने लोक सौदी अरेबियाला भेट देतात. उपलब्ध आकडेवारीनुसार २०२२ मध्ये सुमारे २.५ दशलक्ष भारतीयांनी सौदी अरेबियाला भेट दिली. एक महिन्यापूर्वी सौदी सरकारने भारतीय कामगारांसाठीदेखील कठोर नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार सौदी वर्क व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांनी त्यांच्या व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेची पूर्व पडताळणी पूर्ण करणे आवश्यक आहे.
![](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/hajj-yatra-2025-visa-rules-change.jpg?w=830)
‘नुसुक ॲप’द्वारे नोंदणी
हज २०२५ साठी नोंदणी अधिकृतपणे सुरू झाली आहे. सौदी नागरिक आणि रहिवासी नुसुक ॲप किंवा अधिकृत ऑनलाइन पोर्टलद्वारे नोंदणी करू शकतात. नवीन नियमांनुसार, अर्जदारांनी त्यांच्या माहितीची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि त्यांच्याबरोबर प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची नोंदणी करणेदेखील आवश्यक आहे. त्यासह मंत्रालयाने देशांतर्गत यात्रेकरूंसाठी हप्त्यावर आधारित पेमेंटचा नवीन पर्याय सुरू केला आहे. यात्रेकरू आता हज पॅकेजसाठी तीन हप्त्यांमध्ये पैसे देऊ शकतात. नोंदणी केल्याच्या ७२ तासांच्या आत २० टक्के ठेव आणि त्यानंतर २० टक्के रमजानला व २० टक्के ठेव शव्वालला देणे, अशी ही एकूण प्रक्रिया आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, शेवटचे पैसे मिळेपर्यंत नोंदणीची अंतिम प्रक्रिया पूर्ण होत नाही.
यात्रेकरूंची सुरक्षितता आणखी वाढवण्यासाठी, सौदी मंत्रालयाने सुरक्षिततेसाठी जागरूकता मोहिमा, हज परिसरातील पायाभूत सोयींसाठी आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली, तसेच तंबूतील शिबिरे, पादचारी मार्ग यांसारख्या प्रगत पायाभूत सुविधांनी युक्त अनेक उपाययोजना सुरू केल्या गेल्या आहेत.
हजमध्ये यात्रेकरूंची वाढती संख्या
२०२५ ची हज यात्रा ४ ते ६ जूनदरम्यान चंद्रदर्शनावर अवलंबून असेल. इस्लामच्या पाच महत्त्वाच्या तत्त्वांमध्ये हज यात्रा हे एक महत्त्वाचे तत्त्व आहे. शारीरिक आणि आर्थिकरीत्या सक्षम असणाऱ्या मुस्लिमांनी आयुष्यात एकदा तरी हज यात्रा केली पाहिजे, असे मानले जाते. सौदी अरेबियाद्वारे आयोजित हज यात्रेत प्रत्येक देशाला विशिष्ट कोट्याचे वाटप केले जाते. असे असले तरीही अनधिकृत पद्धतीने लोक हज यात्रेत प्रवेश करतात; त्यामुळे या परिसरात गर्दी वाढते. गर्दी वाढल्याने एकूणच पायाभूत सुविधांवर ताण निर्माण होतो. त्यामुळे यात्रेकरूंच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे आणि त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे अधिक आव्हानात्मक होते. २०२४ मध्ये १,२०० हून अधिक यात्रेकरूंचा अतिउष्णता व गर्दी यांमुळे मृत्यू झाला. नोंदणी न केलेल्या यात्रेकरूंमुळे ही परिस्थिती उद्भवली, असे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
२०२४ मध्ये १.८३ दशलक्षाहून अधिक मुस्लिमांनी हज यात्रा केली, त्यात २२ देशांतील १.६ दशलक्षाहून अधिक मुस्लिम नागरिक सहभागी झाले होते तर २,२२,००० सौदी नागरिक आणि रहिवासी यांचा समावेश होता. हजमध्येही गर्दीचे प्रमाण अधिक असते. ‘असोसिएटेड प्रेस’च्या गणनेनुसार, २०१५ मध्ये हजदरम्यान मीना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत २,४०० हून अधिक यात्रेकरूंनी जीव गमावला होता. ही यात्रेतील आतापर्यंतची सर्वांत मोठी दुर्घटना आहे. हजमधील दुसरी सर्वांत प्राणघातक दुर्घटना म्हणजे १९९० मध्ये झालेली चेंगराचेंगरी, त्यात १,४२६ यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता.