तमिळनाडूच्या रामेश्वरममधील बेटाला मुख्य भूभागाशी रेल्वेने जोडणाऱ्या नवीन पंबन पुलाला तांत्रिक चमत्कार म्हणून गौरवलं जात आहे. परंतु, या पुलाच्या अंदाजे आयुर्मानाने चिंता वाढवली आहे. हा पूल ३८ वर्षे देखभालीशिवाय आणि कमीत कमी देखभालीसह ५८ वर्षे टिकेल, असा रेल्वे अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. १०८ वर्षांहून अधिक काळ खडतर सागरी परिस्थितीत सेवा देणाऱ्या जुन्या पंबन पुलाशी त्याची तुलना केली जात आहे. जुना पूल १०८ वर्षे टिकला; मात्र नवीन तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेल्या पुलाचे आयुष्य ५८ वर्षेच का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे? त्याचविषयी जाणून घेऊ..
जुन्या आणि नवीन पंबन पुलामध्ये अंतर काय?
पंबन पूल हा तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम येथील एक सागरी रेल्वे पूल आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या रामेश्वरमध्ये फक्त या पुलाद्वारेच प्रवेश करता येतो. २४ फेब्रुवारी १९१४ मध्ये तो वाहतुकीस खुला करण्यात आला होता. हा भारतामधील सर्वांत पहिला सागरी पूल आहे. १९१४ मध्ये ब्रिटिशांनी बांधलेला मूळ पूल डिसेंबर २०२२ पर्यंत कार्यरत होता. हा पूल शतकानुशतके टिकला. त्याचे श्रेय मजबूत कॅन्टिलिव्हर डिझाइन आणि त्यासाठी वापरलेला अपवादात्मक गंजप्रतिरोधकता प्रदान करणारा महागडा चांदीचा रंग यांना देण्यात आले. वारंवार दुरुस्ती, वेगावरील निर्बंध यांसारख्या आव्हानांना न जुमानता, प्रत्येक वातावरणात हा पूल शतकाहून अधिक काळ टिकून राहिला.
हेही वाचा : जगातील सर्वांत मोठा हिमखंड ‘या’ बेटावर धडकणार? याचे परिणाम किती विध्वंसक?
त्या तुलनेत टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी नवीन पुलाच्या बांधकामात पॉलिसिलॉक्सेन या रंगाचा वापर करण्यात आला आहे. गंजप्रवण भागात या रंगाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. परंतु, रेल्वे सुरक्षा आयुक्त (CRS) यांनी त्याच्या अंदाजे आयुर्मानाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. नियोजन, अंमलबजावणी व गंजरोधक पद्धती या क्षेत्रांमध्ये सुधारणा होण्याची गरज आहे, असे त्यांचे सांगणे आहे. त्यानंतर दक्षिण रेल्वेने सुधारणात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत आणि पुलाच्या प्रगत वैशिष्ट्यांवर प्रकाश टाकणाऱ्या मोहिमा सुरू केल्या आहेत.
२.०७ किलोमीटर असणारा नवीन पंबन पूल हा भारतातील पहिला व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज आहे. जहाजे जाण्यास परवानगी देणारी या पुलाखालील लिफ्ट यंत्रणा केवळ पाच मिनिटे आणि ३० सेकंदांत पूर्ण होते. जुन्या पंबन पुलाखाली असणारी यंत्रणा अधिक वेळखाऊ आणि अधिक श्रमकेंद्रित होती. या कॅन्टिलिव्हर प्रणालीमध्ये आता सुधारणा करण्यात आली आहे. वाढत्या रहदारीचे प्रमाण सामावून घेत जलद, सुरक्षित रेल्वे आणि सागरी कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे हे नवीन डिझाइनचे उद्दिष्ट आहे.
दक्षिण रेल्वेने या पुलाची तुलना जागतिक अभियांत्रिकी उदाहरणांशी केली आहे, जसे की लंडनचा टॉवर ब्रिज आणि अमेरिकेतील आर्थर किल व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज. दक्षिण रेल्वेने नवीन पुलाची स्तुती करताना जारी केलेल्या दस्तऐवजात म्हटले आहे, “हे पूल त्यांच्या काळात महत्त्वपूर्ण असले तरी नवीन पंबन ब्रिजमध्ये आधुनिक साहित्य आणि तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे; ज्यामुळे हा पूल कार्यक्षमता आणि टिकाऊपणामध्ये अधिक सक्षम आहे.” जुन्या पुलाच्या तुलनेत नवीन पूल तीन मीटर उंच आणि समुद्रसपाटीपासून २२ मीटर उंच आहे. नव्या पुलावर रेल्वे ८० किलोमीटर वेगाने धावू शकणार आहे. जुन्या पुलावर रेल्वेचा वेळ ताशी १० किलोमीटर होता.
नवीन उभ्या लिफ्ट ब्रिजमुळे प्रवासाचा कालावधी बराच कमी होतो, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे. “वाहतुकीचे वाढते प्रमाण, जलद व सुरक्षित कनेक्टिव्हिटी यांच्या गरजेमुळे सरकारने नवीन संरचना तयार करण्याचा निर्णय घेतला, जी तांत्रिकदृष्ट्या प्रगत, टिकाऊ व भविष्यासाठी तयार असेल,” असेही रेल्वे दस्तऐवजात म्हटले आहे. “अत्याधुनिक सागरी सेतूचे बांधकाम वाढत्या रहदारीचे प्रमाण सामावून घेऊ शकेल, टिकाऊपणा सुनिश्चित करील व सुरळीत सागरी नेव्हिगेशन सुलभ करील,” असे त्यात म्हटले आहे.
नोव्हेंबर २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन पुलाची पायाभरणी करण्यात आली आणि फेब्रुवारी २०२० मध्ये बांधकामाला सुरुवात झाली. सुरुवातीला डिसेंबर २०२१ पर्यंत या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार होते. परंतु, कोविड-१९ साथीच्या आजार आणि आव्हानात्मक हवामान यांमुळे या पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी विलंब झाला. नवीन पंबन पूल हा वारसा आणि नावीन्यपूर्णतेच्या मिश्रणाचे प्रतीक आहे, तरीही त्याच्या टिकाऊपणाबद्दलचे प्रश्न कायम आहेत.
हेही वाचा :आई-वडिलांचा घटस्फोट मुलांसाठी ठरतोय जीवघेणा? कारण काय? नवीन संशोधन काय सांगते?
पुलाचा लाभ कोणाला होणार?
रामेश्वरम येथे जाण्यासाठी येणाऱ्या भाविकांना याचा विशेष लाभ होणार आहे. रामेश्वरम येथे येणाऱ्या भाविकांना मंडपम येथून बस किंवा टॅक्सीद्वारे रामेश्वरम येथे जावे लागते. त्यासाठी बरेच तास लागतात. कारण रामेश्वरमला जाण्यासाठी एकच पूल आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीदेखील होते. आता या पुलाचे काम पूर्ण झाल्यामुळे भाविकांना रेल्वेने थेट रामेश्वरमला जाता येणार आहे आणि त्यांचा वेळही वाचणार आहे. भाविक अनेक दिवसांपासून या पुलाच्या प्रतीक्षेत होते.