सुजित तांबडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुण्यातील वेताळ टेकडी हा चर्चेचा विषय झाला आहे. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी ही टेकडी फोडून तीन बोगदे तयार करणे; तसेच ‘बालभारती’ ते पौड फाटा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावरून नागरिक, पर्यावरणप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे. नागरिकांनी आंदोलन सुरू केले असताना, महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र येऊन भाजपला कोंडीत पडकले आहे.

वेताळ टेकडी का महत्त्वाची?

पुण्याच्या पश्चिम भागातील वेताळ टेकडी ही जैवविविधतेमुळे पुणेकरांचे व्यायामाला जाण्याचे हक्काचे ठिकाण झाले आहे. व्यायामाबरोबरच या टेकडीवरील जैवविविधता जपण्यासाठी नागरिक आपापल्या परीने प्रयत्न करतात. या टेकडीवर वेताळबाबा यांचे देऊळ असल्याने त्यावरून या टेकडीला नाव पडले. या टेकडीचा विस्तार लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर, सिम्बायोसिसपर्यंत आहे. कोथरूडहून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्गाकडे जाण्यासाठी या टेकडीजवळून जावे लागते.

प्रस्ताव काय आणि विरोध का?

लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी बालभारती ते पौड फाटा रस्ता; तसेच कोथरूड, पाषाण आणि सेनापती बापट रोड यांना जोडणारे तीन बोगदे तयार करण्याचा प्रस्ताव आहे. जैवविविधतेला धोका, म्हणून नागरिकांचा यास विरोध आहे.
पुणे महापालिकेने सुमारे २५३ कोटी रुपयांचा बालभारती ते पौड फाटा हा सुमारे दोन कि.मी. लांबीचा रस्ता बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा रस्ता वेताळ टेकडीवरून किंवा पायथ्याजवळून तयार करण्याचे प्रस्तावित आहे. ३० मीटर रुंदीच्या या रस्त्यामुळे काही झाडे तोडावी लागतील. त्यामुळे नागरिकांकडून विरोध होऊ लागला आहे.

बालभारती ते पौड फाटा रस्त्याचा वाद केव्हापासून?

यापूर्वी १९८० च्या सुमारास बालभारती ते पौडफाटा रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने मांडला होता. तेव्हाही त्यास विरोध झाला होता. या रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी सुटणार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. नागरिकांचा विरोध पाहून तत्कालीन राज्य सरकारने १९८७ मध्ये शहराच्या विकास आराखडय़ातून हा रस्ता वगळला होता. १९९६ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पुन्हा या रस्त्याला मंजुरी देण्यात आली होती. २००६ मध्ये पुन्हा या रस्त्याला विरोध झाला. प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. २०१६ मध्ये न्यायालयाने या रस्त्याला स्थगिती दिली. आता महापालिकेने या रस्त्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याचा मार्ग काढला. त्यामध्ये महापालिकेचे अधिकारी आणि दोन तज्ज्ञ नागरिकांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये तज्ज्ञ नागरिकांकडून या रस्त्याच्या उपयुक्ततेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले, तरीही महापालिकेने हा रस्ता तयार करण्याचे ठरविले आहे.

नागरिकांचा विरोध का?

बालभारती ते पौड फाटा या रस्त्यामुळे लॉ कॉलेज रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होईल, हा महापालिका प्रशासनाचा दावा फोल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा प्रकल्प केल्यास वेताळ टेकडीवरील जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्यामुळे ‘वेताळ टेकडी बचाव कृती समिती’ तयार करून नागरिकांनी पदयात्रा काढून विरोधाला सुरुवात केली आहे. विकास आराखडय़ातून हा रस्ता वगळावा आणि या टेकडीला ‘शून्य विकास क्षेत्र’ म्हणून घोषित करावे, वेताळ टेकडीवरील रस्ते आणि बोगद्यांवर खर्च करण्यापेक्षा महापालिकेने सार्वजनिक परिवहन सेवा सक्षम करून बसगाडय़ांची संख्या वाढवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

भाजपची भूमिका नेमकी काय?

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या रस्त्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी महापालिका प्रशासनासह बैठक घेतली, तेव्हा प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांना ‘हम करे सो कायदा’ चालणार नसल्याचे त्यांनी सुनावले. मात्र, भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी उघडपणे या प्रकल्पाला विरोधाची भूमिका घेतली. भाजपच्या अन्य नेत्यांनी हा रस्ता आवश्यक कसा आहे, हे नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला. नागरिकांचा विरोध पाहूून पाटील यांनी त्याच दिवशी या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या नागरिकांची लगेच भेट घेऊन नव्याने सर्वसाधारण सभा अस्तित्वात येईपर्यंत निर्णय घेतला जाणार नसल्याचे सांगत एक पाऊल मागे घेतले.

विरोधकांची एकजूट होईल?

महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) यांनी नागरिकांच्या बाजूने उभे राहून भाजपला कोंडीत पकडले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही महाविकास आघाडीला साथ देत प्रकल्पाला विरोध केला आहे. नागरिकांनी काढलेल्या पदयात्रेत हे पक्षही सामील झाले. आगामी महापालिका निवडणुकांपूर्वी भाजपच्या विरोधात वातावरण तयार करण्यास विरोधी पक्षांनी ही संधी शोधली आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why oppose breaking the hill print exp 0423 amy
Show comments