The World’s Largest Snake Gathering: साप म्हटलं की, आपसूकच एक भीतीची भावना मनाला, मेंदूला शिवल्यावाचून राहत नाही. गेल्या अनेक दशकांपासून कायमच एकटे राहणारे, शिकारीसाठी बाहेर पडणारे अशीच धारणा सापांविषयीची होती. पण, अलीकडील संशोधन मात्र या संकल्पनेला छेद देत आहे. या एकट्या वावरणाऱ्या प्रजातीतील काही सापांच्या जाती इतर समाजात एकत्र वावरणाऱ्या प्राण्यांप्रमाणे परस्परांमध्ये मिसळतात. याचेच उत्तम उदाहरणं म्हणजे बटलरचे गार्टर साप. या सापांमध्ये वय आणि लिंग यानुसार विभागलेली एक गुंतागुंतीची सामाजिक रचना दिसून येते. याविषयीची सविस्तर माहिती २०२३ साली नोव्हेंबर महिन्यात प्रसिद्ध झालेल्या बिहेविरल इकॉलॉजी या संशोधन पुत्रिकेत देण्यात आली आहे.
एकत्र वावर सकारात्मक
ज्या सापांमध्ये समाजशीलता म्हणजेच समाजात एकत्र वावरण्याची वृत्ती आढळते, तेच अधिक तंदुरुस्त आणि आरोग्यदृष्ट्या सक्षम असतात. त्यामुळे सापांमध्ये समाजशीलता अर्थात एकत्र वावर आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो, हे सिद्ध होते. या निष्कर्षांमुळे दीर्घकाळ प्रचलित असलेले गृहीतक बदलले आहे.
इथे दडलंय सापांचं भूमिगत आश्रयस्थळ

या बातमीसह सर्व प्रिमियम कंटेंट मोफत वाचा

सापांच्या हिवाळ्यातील आरामासाठी गुहा या योग्य ठरतात. रेड-सीडेड गार्टर साप म्हणजे Thamnophis sirtalis parietalis संपूर्ण उत्तर अमेरिकेत मोठया प्रमाणावर आढळतात. पण मॅनिटोबाच्या इंटरलेक परिसरासारखी परिस्थिती त्यांना दुसरीकडे कुठेच अनुभवायला मिळत नाही. या भागात हिवाळ्यात तापमान नेहमीच मायनस ३० डिग्री सेल्सिअस खाली जाते. एखाद्या ectothermic (बाह्य तापमानावर अवलंबून असलेल्या) प्राण्याचा अशा परिस्थिती मृत्यू होऊ शकतो. परंतु, नर्सिसच्या वाऱ्यांनी झोडपलेल्या माळरानाखाली काळाच्या ओघात तयार झालेलं एक भूमिगत आश्रयस्थळ दडलेलं आहे. येथे मऊ, सच्छिद्र आणि प्राचीन चुनखडीचा खडक आहे. सुमारे ४५० दशलक्ष वर्षांपूर्वी हा भूभाग एका उष्णकटिबंधीय समुद्राचं तळ होतं, इथे सागरी जीवन भरभराटीला आलेलं होतं. कालांतराने पाण्याने कॅल्शियम कार्बोनेट विरघळलं आणि या दगडात खोल फटी व गुहा तयार झाल्या. हिवाळी झोपेसाठी जागा शोधणाऱ्या रेड-सीडेड गार्टर सापासाठी ही जागा अगदी परिपूर्ण आहे. ही जागा इतकी थंड आहे की या ठिकाणी सापाच्या शरीराची चयापचय क्रिया मंदावते शिवाय सापांच्या आरामासाठी पुरेशी ओलसर आणि सुरक्षित आहे.

शेकडोंच्या संख्येने नर साप येतात

पहिल्या नजरेत नर्सिस सर्प गुहा म्हणजे कोरड्या गवतांनी आच्छादलेल्या मैदानात पडलेल्या काही भुयारी खड्ड्यांसारख्या दिसतात. पण वसंत ऋतू आल्यावर इथे हालचालींचा महापूर येतो. हजारो नर साप चुनखडीच्या गुहेतून बाहेर येतात आणि खडकांवर, एकमेकांना गुंडाळत प्रेम व्यक्त करायला सुरुवात करतात आणि मग मादी साप प्रवेश करतात (त्या संख्येने कमी असतात). हे पर्व रेड-सीडेड गार्टर सापांचं सामाजिक पर्व असतं. दर वर्षी काही आठवड्यांच्या काळात ७५,००० ते १,५०,००० साप लैंगिक संबंधासाठी एकत्र येतात.

मेटिंग बॉल

नर्सिसमधील सर्वात विस्मयकारक गोष्ट म्हणजे मेटिंग बॉलवेळी एक मादी किमान शंभर नर सापांच्या वेटोळ्याखाली दडलेली असते. प्रत्येक नर आपली शेपटी मादीच्या शेपटीशी जुळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण ही स्पर्धा सामान्य नाही. Journal of Comparative Psychology मध्ये जून १९८५ साली प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार मादीपेक्षा इतर नर सापांची उपस्थिती नरांना अधिक उत्साहित करते. या प्रेमाच्या गोंधळात फेरोमोन मुख्य भूमिका बजावतात.

Chemical Senses या नियतकालिकात एप्रिल २००६ साली प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार मादी साप एक विशिष्ट रसायन सोडतात, जे नर साप त्यांच्या तोंडातील वोमेरोनासल ऑर्गनद्वारे ओळखतात आणि त्याद्वारे ते मादीकडे आकर्षित होतात. एकदा संपर्क झाल्यावर, नर आपला हनुवटी मादीच्या पाठीवर घासतात, शरीर आकुंचन करून शेपटी जुळवण्याचा प्रयत्न करतात. एखादा नर यशस्वी झाला, की तो आपला हेमिपेनिस मादीच्या क्लोएकामध्ये अडकवतो आणि शुक्राणूंबरोबर एक जेलसदृश मेटिंग प्लग सोडतो, जो काही वेळासाठी इतर नरांचा मार्ग अडवतो.

जगातील सर्वात मोठा सर्प मेळा

नर्सिसमध्ये दरवर्षी हजारो साप मृत्युमुखी पडत होते. संवर्धनकर्त्यांनी या सापांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले. आज जरी नर्सिस सर्प गुहांमध्ये जगातील सर्वात मोठा सापांचा मेळावा होत असला तरी हा वारसा संवर्धनासाठीच्या सततच्या प्रयत्नांशिवाय टिकू शकला नसता. अनेक वर्षं मॅनिटोबाच्या ग्रामीण महामार्ग १७ वर वसंत आणि शरद ऋतूमध्ये एक भयावह चित्र दिसायचं. उन्हाळी दलदलीतून हिवाळी गुहेकडे स्थलांतर करत असताना हजारो रेड-सीडेड गार्टर साप रस्त्यावरून जाताना चाकांखाली चिरडले जायचे.

१९९० च्या उत्तरार्धात दरवर्षी सुमारे ३०,००० साप मृत्यूमुखी पडत असत. याशिवाय १९९९ सालचा हिवाळा कठीण ठरला होता. अचानक आलेल्या थंडीने हजारो साप त्यांच्या गुहांपर्यंत पोहोचण्याआधीच गोठून गेले. त्यामुळे त्यांच्या संख्येत बरीच मोठी घट झाली. या दुहेरी आघातामुळे मॅनिटोबा सरकारला या जैवविविधतेचं महत्त्व कळू लागलं. संवर्धकांनी सापांना महामार्गाखाली नेण्यासाठी ६ इंच रुंद बोगद्यांचं जाळं तयार केलं. त्यासाठी बर्फ अडवणारे कुंपण उभारले. संशोधकांनी या बोगद्यांच्या भिंतींवर कृत्रिम फेरोमोन लावले. आज, दशकांनंतरच्या या प्रयत्नांती आणि रासायनिक चातुर्याच्या जोरावर नर्सिस सर्प गुहा पुन्हा फुलताना दिसत आहेत. आता दरवर्षी वसंत ऋतूमध्ये लाल पट्टे असलेल्या सापांचा लोंढा पुन्हा उसळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why over 75000 snakes swarm narcisse every year svs