संदीप कदम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. गेल्या वर्षीही बाबरने एकदिवसीय क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली होती. बाबरने वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार सलग दुसऱ्यांदा मिळवला आहे. बाबरच्या कामगिरीचा घेतलेला आढावा.
बाबरची कामगिरी कशी राहिली आहे?
बाबरने २०२२ या वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ८ शतके आणि १७ अर्धशतके झळकावली. त्याने ९ सामन्यांत ६७९ धावा केल्या. गेल्या वर्षी पाकिस्तानने एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकमेव सामना गमावला. त्यांनी न्यूझीलंडकडून हार पत्करली. पाकिस्तानने बाबरच्या नेतृत्वाखाली तीन एकदिवसीय मालिका जिंकल्या. गेल्या वर्षी क्रिकेटच्या सर्व प्रकारांत मिळून २००० धावा पूर्ण करणारा बाबर हा एकमेव क्रिकेटपटू होता. बाबरने ५४.१२ च्या सरासरीने २५९८ धावा केल्या होत्या. बाबरला २०२१ मध्येही सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला होता.
बाबरने विराट व धोनीची कशी बरोबरी केली?
सलग दोन सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचे पुरस्कार मिळवल्याने बाबर भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (२००८ व २००९), विराट कोहली (२०१७ व २०१८) आणि एबी डिव्हिलियर्स (२०१४ व २०१६) या दिग्गज खेळाडूंच्या पंगतीत जाऊन बसला आहे. या वेळी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराच्या शर्यतीत कोणताही भारतीय खेळाडू नव्हता. बाबरशिवाय इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स, न्यूझीलंडचा कसोटी कर्णधार टीम साऊदी आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांच्यामध्ये चुरस होती.
बाबरची ट्वेन्टी-२० आणि कसोटीतील कामगिरी कशी होती?
बाबरने ट्वेन्टी-२० व कसोटी क्रिकेटमध्येही चमक दाखवली. गेल्या वर्षी बाबरने पाकिस्तानसाठी एकूण २६ ट्वेन्टी-२० सामने खेळले ज्यामध्ये त्याने ३१.९५ च्या सरासरीने ७३५ धावा केल्या. यादरम्यान त्याला शतक झळकावण्यात यश आले. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी बाबरने आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवली. त्याने ९ कसोटी सामन्यांत ६९.६४च्या सरासरीने ११८४ धावा केल्या. त्याने चार शतकेही केली. या कामगिरीनंतरही बाबरला अनेक समीक्षकांच्या टीकेचा सामना करावा लागतो आहे. त्याच्या धावा करण्याच्या गतीवरही (स्ट्राइक रेट) बरीच टीका होते. तसेच तो गेल्या काही सामन्यांत धावांसाठी झगडताना दिसला आहे. मात्र, लवकरच सूर गवसेल, असा विश्वास बाबरने व्यक्त केला.
बाबरच्या नेतृत्वावर प्रश्न का उपस्थित केले जात आहेत?
फलंदाज म्हणून बाबर आझमने आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधले असले, तरी त्याच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या वर्षी इंग्लंडने पाकिस्तानला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करताना कसोटी मालिकेत यश संपादन केले, तर न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ही बरोबरीत संपली होती. एकदिवसीय मालिकेत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. संघाच्या या निराशाजनक कामगिरीनंतर त्याच्या नेतृत्वावर टीका होत आहे.
वर्षातील सर्वोत्तम खेळाडूला देण्यात येणारा हा पुरस्कार महत्त्वाचा का?
२००४पासून सुरू झालेल्या ‘आयसीसी’चा सर्वांत प्रतिष्ठेचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज क्रिकेटपटू सर गारफिल्ड सोबर्स यांच्या नावे दिला जातो. क्रिकेट जगतातील सर्वकालीन सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक सोबर्स यांनी १९५४ मध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी विंडीजसाठी ९३ कसोटी सामन्यांत ८०३२ धावा केल्या. त्यांनी यादरम्यान २६ शतके आणि ३० अर्धशतके झळकावली. तसेच त्यांनी २३५ गडी बाद केले. त्यामुळे त्यांच्या नावे दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे.
‘आयसीसी’चे पुरस्कार कशाच्या आधारावर दिले जातात?
‘आयसीसी’ दरवर्षी वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंना सन्मानित करते. यामध्ये पुरुष व महिला क्रिकेटच्या नऊ वेगवेगळ्या पुरस्कारांचा समावेश असतो. सर्व विभागांत चार खेळाडूंना नामांकित केले जाते. ‘आयसीसी’च्या संकेतस्थळावर चार नावांतून सर्वोत्तम खेळाडू निवडण्यासाठी मतदान होते. यासह ‘आयसीसी’च्या पुरस्कार समितीत नावाजलेले लेखक, जगभरातील ‘ब्रॉडकास्टर्स’ आणि दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश असतो. अखेरीस चाहत्यांकडून करण्यात आलेले मतदान आणि पुरस्कार समितीचे मत यावरून वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूचे पुरस्कार देण्यात येतात.