पाकिस्तानी रुपया हे जगातील सर्वांत वाईट कामगिरी करणारे चलन ठरले आहे. डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या इतिहासातील सुमार कामगिरी करत पाकिस्तानी चलन सुमारे २८५ रुपये प्रतिडॉलर या पातळीवर पोहोचले आहे. तत्कालीन इम्रान खान सरकारसह विद्यमान सरकारलादेखील डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण रोखता आलेली नाही.
पाकिस्तानी रुपयाची आतापर्यंतची कामगिरी कशी?
पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारच्या तीन वर्षे आणि चार महिने या कालावधीत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया ३०.५ टक्क्यांनी घसरला. तर विद्यमान वर्ष २०२३ मध्ये त्यात २०.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. ‘द न्यूज इंटरनॅशनल’च्या मते, पाकिस्तानी रुपयाचे मूल्य ऑगस्ट २०१८ मध्ये डॉलरच्या तुलनेत १२३ रुपयांवरून डिसेंबर २०२१ मध्ये प्रतिडॉलर १७७ पर्यंत घसरले. गेल्या ४० महिन्यांच्या कालावधीत ते ३०.५ टक्क्यांनी कोसळले आहे. यामुळे देशाच्या इतिहासातील चलनाचे सर्वाधिक अवमूल्यन झाले आहे. याआधी वर्ष १९७१-७२मध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपया ४.६० रुपयांवरून ११.१० रुपये प्रतिडॉलरवर पोहोचला होता. त्यावेळी सुमारे ५८ टक्के अवमूल्यन झाले होते.
हेही वाचा : हेन्री किसिंजर जेव्हा तिरस्कार व्यक्त करताना इंदिरा गांधींना b**ch म्हणाले!
पाकिस्तानी रुपयात घसरण का?
विद्यमान वर्षातील जानेवारी महिन्यात परदेशी चलन कंपन्यांनी डॉलरची पाकिस्तानी रुपयाच्या तुलनेत होणारी मूल्य वाढ मर्यादित राखण्यासाठी घालण्यात आलेली विशिष्ट मर्यादा काढून घेण्यात आली. पाकिस्तानची परकीय गंगाजळी घसरल्याने, एक्सचेंज कंपनीज असोसिएशन ऑफ पाकिस्तानने डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्याचे प्रयत्न केले. तसेच सरकारनेदेखील इंटरबँक दर स्थिर राखला होता. जेणेकरून बाजारातील अराजकतेच्या आणि अस्थिरतेच्या स्थितीवर नियंत्रण ठेवता येईल. डॉलरच्या तुलनेत वाढीवर कॅप अर्थात मर्यादा घालण्याचा उद्देश काळा बाजार, चलन बाजार आणि खुल्या बाजारात डॉलरच्या किमतील तफावत संपवण्याचा होता. डॉलरच्या किमतीवर लावलेली मर्यादा नकारात्मक ठरली. परिणामी डॉलरचे मूल्य पाकिस्तानी रुपयांच्या तुलनेत कमी होण्याऐवजी आणखी वाढले, असे मत पाकिस्तानचे तत्कालीन फॉरेक्स असोसिएशनचे अध्यक्ष मलिक बोस्तान यांनी व्यक्त केले.
रुपयाच्या कामगिरीवर परिणाम करणारे घटक कोणते?
पाकिस्तानमधील उच्चांकी पातळीवर पोहोचलेली महागाई आणि व्यापार तूट हे मुख्यतः पाकिस्तानी रुपया रसातळाला नेण्यास कारणीभूत आहेत. कर्जाच्या वाढत्या डोंगरामुळे पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीमध्ये मोठी घट झाली आहे. शिवाय चलनवाढीचा दर हा ३१ टक्क्यांच्या पातळीवर पोहोचल्याने आशियातील तो सर्वाधिक ठरला. यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवाळखोरीच्या मार्गावर आहे. यामुळे परदेशी गुंतवणूकदेखील घटल्याने दुहेरी फटका बसला.
‘आयएमएफ’कडून किती मदत?
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अर्थात ‘आयएमएफ’ने मदत देऊ केली आहे. या महिन्यात ७० कोटी डॉलर देण्यास सहमती दर्शविली. आयएमएफने मदत करण्यास तयारी दर्शविली असली तरी पाकिस्तानला आयातीवर घातलेले निर्बंध मागे घेण्यासह विविध अटीशर्तींचे पालन करण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेतील परकीय चलन साठा नीचांकी पातळीवर आल्याने बाह्यदेयकांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने आयातीवर बंदी घातली होती.
पाकिस्तानी सरकारने महागाई, कर्जाचा बोजा आणि धीम्या गतीने वाढणारा विकास दर अशा समस्यांशी सामना करण्यासाठी आयएमएफकडे मदतीसाठी हात पसरला होता. सध्या कर्जाच्या बोज्याखाली सापडलेल्या पाकिस्तानला पूर्वीच्या कर्जाचे हप्ते फेडणेही कठीण झाले आहे. मात्र पाकिस्तानी अर्थव्यवस्थेसमोर २०२४ पर्यंत आर्थिक आव्हाने कायम राहतील. डॉलरच्या तुटवड्यामुळे समांतर चलन बाजार पुन्हा उदयास येण्याची भीती सरकारला आहे.
हेही वाचा : UNLF या मैतेई बंडखोर गटाने केंद्र सरकारशी शांतता करार करण्याचे कारण काय?
समांतर चलन बाजार उभा राहणार?
समांतर बाजारपेठांनी डॉलरला अधिक मूल्य दिल्यास अधिकृत दर वापरण्यास लोकांना पटवून देणे दीर्घकाळात कठीण जाईल, अशी भीती लंडनमधील अर्थशास्त्रज्ञ जॉन अॅशबर्न यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, की सरकार काही काळ समांतर बाजारावर नियंत्रण राखू शकतात. मात्र दीर्घकाळात ते शक्य नाही. यामुळे आगामी काळात पाकिस्तानी रुपयाचे अधिक अवमूल्यन होण्याची शक्यता असून २०२४ पर्यंत तो ३५० रुपये प्रतिडॉलरची पातळी गाठण्याची शक्यता आहे. त्यात पाकिस्तानमध्ये पुढील वर्षात राष्ट्रीय निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय फायद्यासाठी अर्थव्यवस्थेच्या स्थैर्यासाठी कटू निर्णय घेतले जाण्याची शक्यता कमी आहे.
परकीय गंगाजळीची सध्याची स्थिती कशी?
सध्या पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेकडे ७.१८ अब्ज डॉलरची परकीय गंगाजळी शिल्लक असून ही आतापर्यंतची नीचांकी आहे. मुख्यत्वे चालू असलेल्या कर्जाची परतफेड आणि बाह्य वित्तपुरवठा वातावरणातील आव्हानांमुळे तिजोरी रिकामी झाली आहे. जुलैमध्ये आयएमएफकडून ३ अब्ज डॉलरच्या मदतीसह सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीकडून आर्थिक सहाय्य मिळूनही ही घट झाली आहे.