पाकिस्तानच्या ग्वादरमधील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे २० जानेवारीला उद्घाटन झाले. हे देशातील सर्वांत मोठे आणि सर्वांत महागडे विमानतळ आहे. विमानतळ बांधण्यासाठी चीनने तब्बल २४० दशलक्ष डॉलर्स (सुमारे २,९८१ कोटी रुपये) निधी पुरवला. अशांत अशा बलुचिस्तान प्रांतातील न्यू ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या महिन्यात उघडले, परंतु विमानतळावर अद्याप कोणतेही विमान उतरलेले नाही. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्प (CPEC) अंतर्गत बांधण्यात आलेल्या विमानतळाबद्दल ग्वादरमधील लोक उत्साहित नाहीत. नेमके हे प्रकरण काय? कोटींचा खर्च करून बांधण्यात आलेले विमानतळ रहस्य का ठरत आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ग्वादर विमानतळ

ग्वादर विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आले. त्यासाठी चीनने निधी पुरवला आहे. विमानतळाचा विस्तार जवळपास ४३० एकर जमिनीत झालेला आहे आणि एका वर्षात चार लाख प्रवासी हाताळण्याची त्याची क्षमता आहे. ग्वादरमध्ये पाकिस्तानचे हे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. ‘सीपीईसी’अंतर्गत पाकिस्तानमधील एकूण प्रस्तावित ६२ अब्ज डॉलर गुंतवणुकीपैकी आतापर्यंत ३० अब्ज डॉलर चीनने गुंतवले आहेत. दक्षिण आशियाई देशासाठी हा विमानतळ एक मैलाचा दगड असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

त्याची वार्षिक प्रवासी क्षमता चार लाख आहे, जी १.६ दशलक्षांपर्यंत वाढवता येऊ शकते, असे ‘डॉन’ने आपल्या वृत्तात नमूद केले आहे. ग्वादर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे चीन संचालित ग्वादर बंदरापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. चीन आणि पाकिस्तान नवीन विमानतळ आणि खोल समुद्रातील बंदर हे व्यापार आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला चालना देणारे केंद्र म्हणून पाहतात.

हे विमानतळ चीनच्या मदतीने बांधण्यात आले. त्यासाठी चीनने निधी पुरवला आहे. (छायाचित्र-एपी)

पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ आणि त्यांचे चिनी समकक्ष ली कियांग यांनी गेल्या महिन्यात एका समारंभात नवीन विमानतळाचे उद्घाटन केले. उद्घाटनाच्या वेळी शरीफ म्हणाले की, विमानतळ ग्वादरला मध्य आणि पूर्व आशिया, पश्चिम आशिया आणि आखाती देशांमधील महत्त्वाचा दुवा ठरवेल. एका निवेदनात त्यांनी या विमानतळाला पाकिस्तान आणि चीन यांच्यातील चिरस्थायी मैत्रीचे प्रतीक म्हटले आणि अत्याधुनिक विमानतळाचे स्वागत केले. पंतप्रधान शरीफ यांनी म्हटले, “या यशामुळे आम्ही चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सीपीईसीच्या माध्यमातून पाकिस्तान आणि प्रदेशाच्या विकासासाठी केलेली वचनबद्धता पूर्ण करण्याच्या जवळ आणले आहे,” असे पीटीआयच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

नवीन ग्वादर विमानतळावर प्रवासी का नाहीत?

ग्वादर हे दक्षिण-पश्चिम बलुचिस्तान प्रांतात आहे. या प्रदेशात अनेक सुरक्षेसंबंधित आव्हाने निर्माण होण्याची शक्यता असते. बलुच बंडखोरी ५० वर्षांपूर्वी सुरू झाली आणि ती आजही सुरू आहे. बलुचिस्तान संसाधनांनी समृद्ध आहे आणि स्थानिकांचा विश्वास आहे की, त्यांच्यावर त्यांचे नियंत्रण नाही. पाकिस्तानी सैन्य आणि चिनी कामगार स्थानिकांच्या खर्चावर राज्याचे शोषण करत असल्याचा दावा नागरिक करतात. स्थानिकांनी ‘असोसिएटेड प्रेस’ (एपी) ला सांगितले की , जो कोणी शोषण किंवा दडपशाहीचे मुद्दे मांडतो, त्याला ताब्यात घेतले जाऊ शकते आणि सशस्त्र गटांशी संबंध असल्याचा संशय असल्यासही त्याला अटक केली जाते.

इस्लामाबादस्थित पत्रकार आणि संशोधक अदनान आमीर यांनी ऑस्ट्रेलियन थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूटने प्रकाशित केलेल्या एका लेखात लिहिले आहे की, ग्वादर हे बलुचिस्तानचे एक मोठे संसाधन मानले जाते आणि चीनला नियंत्रणाची पातळी दिल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे, परिणामी या भागातील चिनी हितसंबंधांवर हल्ले वाढले आहेत. अहवालात म्हटले आहे की, या हल्ल्यांमुळे ग्वादरमधील कोणत्याही नवीन व्यावसायिक प्रकल्पांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे. किनारपट्टीच्या शहराला दुष्काळाचा सामना करावा लागत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. स्थानिकांना पुरेशा नोकऱ्याही नाहीत. ‘एपी’च्या वृत्तानुसार, सरकारचा दावा आहे की, ‘सीपीईसी’ने सुमारे २००० स्थानिक नोकऱ्या निर्माण केल्या आहेत.

ग्वादरची ९०,००० लोकसंख्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत उदासीन आहे. “हा विमानतळ पाकिस्तान किंवा ग्वादरसाठी नाही,” असे पाकिस्तान-चीन संबंधांमध्ये तज्ज्ञ असलेले आंतरराष्ट्रीय संबंधतज्ज्ञ अझीम खालिद यांनी ‘एपी’ला सांगितले. “हे चीनसाठी आहे, त्यामुळे त्यांना ग्वादर आणि बलुचिस्तानमध्ये त्यांच्या नागरिकांना सुरक्षित प्रवेश मिळणार आहे,” असे ते म्हणाले.

जातीय बलूच अल्पसंख्याक सरकारकडून भेदभाव केल्याचा आरोप करतात आणि दावा करतात की, त्यांना देशाच्या इतर भागांमध्ये संधी नाकारल्या जातात. मात्र, पाकिस्तान सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. बलुचिस्तान अवामी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अब्दुल गफूर होथ यांनी दावा केला आहे की, ग्वादरमधील कोणालाही विमानतळावर काम करण्यासाठी भरती करण्यात आले नाही. “इतर नोकऱ्या विसरून जा, पण अगदी चौकीदार म्हणूनही नाही. सीपीईसीसाठी बांधलेल्या या बंदरावर किती बलुच लोक आहेत?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सुरक्षेच्या धोक्यांमुळे ग्वादर धोकादायक असल्याची धारणा निर्माण होत असल्याने, ग्वादरच्या देशांतर्गत विमानतळावर कराचीला जाणारा एकच व्यावसायिक मार्ग आहे. तसेच, बलुचिस्तानची प्रांतीय राजधानी क्वेट्टा येथे थेट उड्डाणे नाहीत.

ग्वादरला विजेचा स्थिर असा स्त्रोत नाही. ग्वादरमध्ये येणारी वीज शेजारील इराण किंवा सौर पॅनेलमधून येते. “चीनद्वारे बांधण्यात येणारा ३००-मेगावॅटचा वीज प्रकल्प अद्याप सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. ग्वादरला देशाच्या इतर भागाशी जोडणारे विश्वसनीय रस्ते आणि रेल्वे मार्ग अद्याप नसल्यासारखेच आहेत. या सर्व गोष्टींमुळे ग्वादर शहर व्यावसायिक केंद्र म्हणून अपयशी ठरत आहे,” असे आमिर यांनी ‘लोवी इन्स्टिट्यूट’च्या अहवालात लिहिले.