आजपासून पॅरिसमध्ये २०२४ च्या ऑलिम्पिक गेम्सची सुरुवात होत आहे. या खेळांकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ हे आजवरचे सर्वांत पर्यावरणपूरक खेळाचे आयोजन असेल, असा दावा करण्यात आला आहे. ऑलिम्पिकच्या आयोजनामधून सामान्यत: कार्बनचे जितके उत्सर्जन होते, ते निम्म्यावर आणण्याचा आयोजन समितीचा निर्धार आहे. टोकियो २०२०, रिओ २०१६ व लंडन २०१२ या सर्व ऑलिम्पिक आयोजनाच्या प्रत्येक वेळी साधारणत: ३.५ दशलक्ष टन इतक्या कार्बनचे उत्सर्जन झाले होते. हे उत्सर्जन आता निम्म्यावर म्हणजेच साधारण १.७५ टन्सवर आणण्याचे आयोजन समितीचे ध्येय आहे.
हवामान बदल आणि ऑलिम्पिक
सध्या हवामानामध्ये होणाऱ्या बदलांमुळे हे जग आपत्कालीन परिस्थितीत आहे. हरितगृह वायूंच्या (GHG) मानवी उत्सर्जनामुळे हवामान बदलाची समस्या उदभवताना दिसत आहे. ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांच्या आयोजनामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे अशा प्रकारच्या आयोजनांमध्ये पर्यावरणाची काळजी घेतली जाणार नसेल, तर ते व्यर्थ आहे. हाच विचार करून ऑलिम्पिकमध्ये कमीत कमी कार्बनचे उत्सर्जन होऊन पर्यावरणपूरक आयोजनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा : जीवघेण्या संसर्गास कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूचा अमेरिका-कॅनडात उद्रेक; काय आहे लिस्टेरिओसिस?
त्याशिवाय जागतिक पातळीवर आयोजिल्या जाणाऱ्या अशा क्रीडा स्पर्धांमध्ये पर्यावरण वाचवण्याचा संदेश दिला गेल्यास हवामान बदलाशी लढण्यास अधिक बळ प्राप्त होऊ शकते. टोरंटो विद्यापीठातील स्पोर्ट्स इकोलॉजीच्या सहायक प्राध्यापक मॅडेलीन ओर यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले, “ऑलिम्पिक खेळ आणि फिफा विश्वचषक यांसारख्या मेगा-इव्हेंटसाठी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गुंतवणुकीची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांनी जनहिताचा विचार करून या खेळांचे आयोजन केले पाहिजे.” पुढे त्या म्हणाल्या, “अशा मोठ्या आयोजनामध्ये त्यांचे मोठे कार्बन फूटप्रिंट अधिकाधिक कमी केले पाहिजेत. एकीकडे जग हवामानाच्या समस्यांना तोंड देत असताना दुसऱ्या बाजूला अशा मोठ्या आयोजनांमधून पर्यावरणाचे महत्त्व सिद्ध करणे महत्त्वाचे आहे.”
पॅरिस २०२४ ऑलिम्पिक पर्यावरणपूरक करण्यासाठीचे प्रयत्न
पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये अधिकाधिक अक्षय ऊर्जास्रोतांचा वापर करण्यात येत आहे. त्यामध्ये भूऔष्णिक व सौरऊर्जेचाही समावेश आहे. त्याबरोबरच हवामानास अनुकूल अशा अनेक कृती राबविण्यात येत आहेत.
खानपान
पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये वनस्पती-आधारित, स्थानिक व शाश्वत अन्नपदार्थांचा प्रचार करण्यात येणार आहे. कारण- अन्न आणि कृषी संघटनेचे म्हणणे आहे की, एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनाचा विचार केल्यास मांस आणि दुग्धजन्य पदार्थांमुळे १८ टक्के उत्सर्जन होते. हे ऑलिम्पिक पार पडल्यानंतर खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी वापरण्यात आलेल्या सगळ्या पायाभूत सुविधांचाही पुनर्वापर केला जाणार आहे.
दळणवळण
या ऑलिम्पिकच्या बहुतेक स्थळांवर पोहोचण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा सहज उपलब्ध आहे. पॅरिसमध्ये पर्यटकांसाठी दळणवळणासाठी विशेष सेवाही दिली जाणार आहे. पॅरिसमध्ये एक हजार किमीच्या सायकल मार्गिकादेखील विकसित केल्या गेल्या आहेत. खेळांदरम्यान शहरात वावरण्यासाठी म्हणून तीन हजार सायकल्स भाड्याने वापरण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
बांधकाम आणि उभारणी
२०१२ मधील लंडन ऑलिम्पिकसाठी आठ नवीन ठिकाणे तयार करण्यात आली होती; तर २०२० मधील टोकियो ऑलिम्पिकसाठी ११ नवीन ठिकाणे निर्माण करण्यात आली होती. पॅरिसमध्ये मात्र यंदाच्या आयोजनासाठी आधीपासूनच उपलब्ध असलेल्या इमारती किंवा तात्पुरत्या पायाभूत सुविधांमध्येच ९५ टक्के कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. पॅरिसमध्ये फक्त सेंट डेनिसमध्ये एक्वाटिक्स सेंटर नव्याने बांधण्यात येणार आहे. हे एक्वाटिक्स सेंटरदेखील सौरऊर्जेवर चालणारे आहे. बांधकाम उद्योग हादेखील हरितगृह वायू उत्सर्जित करणारा एक प्रमुख घटक आहे. त्याचा एकूण जागतिक हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये ३७ टक्के वाटा आहे.
हेही वाचा : ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच स्टेडियमबाहेर नदीत उद्घाटन सोहळा… पॅरिस स्पर्धा का ठरणार खास?
निवास व्यवस्था
पॅरिसमध्ये सध्या उच्च तापमान आहे. त्यामुळे आयोजकांना खेळाडूंच्या सोईसाठी अडीच हजार तात्पुरते कूलिंग युनिट्स बसवावी लागले आहेत. खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था अगदीच साध्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्यांना झोपण्यासाठी देण्यात येणाऱ्या गाद्या या मासेमारीच्या जाळ्यांचा पुनर्वापर करून बनवलेल्या असणार आहेत. खेळांदरम्यान आवश्यक असलेले फर्निचरदेखील विकत घेतले जाणार नाही; तर ते भाड्याचे असणार आहे. ऑलिम्पिकनंतर हे फर्निचर पुन्हा इतर कारणांसाठी वापरण्यात येईल. ऑलिम्पिक व्हिलेजमधील २,८०० नवीन अपार्टमेंट्स या कार्यक्रमानंतर घरांमध्ये रूपांतरित केल्या जातील.
… तरीही १०० टक्के पर्यावरणपूरक नसेल
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १५ हजार खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यांच्या सोई-सुविधांसाठी ४५ हजार स्वयंसेवक तैनात असतील. माध्यम क्षेत्रातील २६ हजार कर्मचारी या आयोजनाचे वार्तांकन करतील. ऑलिम्पिकमधील खेळ पाहण्यासाठी पॅरिसला १० दशलक्षांहून अधिक पर्यटक येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा अर्थ विमान प्रवासही मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की, पॅरिस ऑलिम्पिकमुळे भरपूर मोठ्या प्रमाणावर हरितगृह वायूचे उत्सर्जन होणार आहे.