संसदेच्या नव्या इमारतीचे आज (२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमादरम्यान ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ‘सेंगोल’ राजदंडाचीही लोकसभा अध्यक्षांच्या आसनाशेजारी स्थापना करण्यात आली आहे. मात्र या उद्घाटन कार्यक्रमावर काँग्रेससह २० प्रमुख विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. संसदेची नवी इमारत ही सर्व सोयीसुविधांनी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारला संसदेची नवी इमारत का उभारावी लागली? जुन्या इमारतीत काय अडचणी येत होत्या? यासह नव्या इमारतीत काय सुविधा असणार आहेत? यावर टाकलेला हा प्रकाश…
भारताला नव्या संसद भवनाची गरज का भासली?
सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाची उभारणी करण्यात आली आहे. संसदेच्या नव्या इमारतीसंदर्भात अधिक माहिती सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाच्या साइटवर देण्यात आलेली आहे. या माहितीनुसार संसदेची जुनी इमारत भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १९२७ साली उभारण्यात आली होती. या इमारतीला जवळपास १०० वर्षे झाली असून ती हेरिटेज ग्रेड-१ क्रमांकाची इमारत आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संसदेच्या कामकाजाचा विस्तार होत गेला. कामाचा विस्तार लक्षात घेऊन कालानुरूप संसदेच्या इमारतीअंतर्गत वेगवेगळे बदल करण्यात आले. याच कारणामुळे ही इमारत अपुरी पडू लागली. या प्रमाणाबाहेर या इमारतीचा वापर होऊ लागला.
हेही वाचा >> नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने चलनात येणार १०० रुपयांचे नाणे; जाणून घ्या आतापर्यंतच्या विशेष नाण्यांची कहाणी!
संसदेच्या जुन्या इमारतीमध्ये काय अडचणी येत होत्या?
खासदारांना बसण्यासाठी अपुरी व्यवस्था :
संसदेच्या जुन्या इमारतीत शासकीय तसेच संसदीय कामासाठी अनेक अडचणी येत होत्या. संसदेच्या जुन्या इमारतीत दोन्ही संसदेच्या संयुक्त अधिवेशनादरम्यान सदस्यांना एकत्र बसण्यास अडचणी येत होत्या. लोकसभेची सदस्यसंख्या सध्या ५४६ आहे. २०२६ सालापर्यंत ही सदस्यसंख्या वाढण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींना बसण्यासाठी सध्या अपुरी आसने आहेत. जेव्हा वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहाचे एकत्रित अधिवेशन भरवले जाते, तेव्हा आसनांची कमतरता भासते. सभागृहात मर्यादित जागा असल्यामुळे सुरक्षेची समस्याही निर्माण होते, असे ‘सेंट्रल व्हिस्टा’ प्रकल्पाच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले आहे.
जुन्या इमारतीत अपुऱ्या सोयीसुविधा
अपुऱ्या पायाभूत सविधा : संसदेच्या जुन्या इमारतीत अनेक ठिकाणी पाणीगळती होते. त्यामुळे स्वच्छतागृहातील पाणी, एअर कंडिशन, अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे या सर्व सोयीसुविधांवर त्याचा परिणाम होतो. पाणीगळती होत असल्यामुळे या इमारतीच्या सौंदर्यावरही परिणाम होतो, अशी माहिती संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
हेही वाचा >> विश्लेषण: टिपूची तलवार आणि त्याचा वादग्रस्त इतिहास !
जुन्या इमारतीत कर्मचाऱ्यांसाठी अपुरी जागा
सध्याच्या संसद भवनात संदेशवहनासाठी जुनी यंत्रणा आहे. यासह जेव्हा ही इमारत उभारण्यात आली होती, तेव्हा ती भूकंपप्रवण क्षेत्राच्या दुसऱ्या झोनमध्ये यायची. आता मात्र ही इमारत चौथ्या भूकंपप्रवण क्षेत्रात येते. मागील अनेक वर्षांपासून संसद कार्यालयाच्या कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यामुळे येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. याच कारणामुळे संसदेच्या जुन्या इमारतीत कर्मचाऱ्यांसाठी जागा अपुरी पडत आहे. अनेक ठिकाणी एका खोलीच्या दोन खोल्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना काम करताना अडचण निर्माण होते.
नव्या इमारतीची वैशिष्ट्ये काय आहेत?
संसदेची नवी इमारत ही जुन्या इमारतीच्या परिसरातच आहे. या नव्या इमारतीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने ही इमारत उभारण्यात आल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जातो. मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत ६५ हजार स्क्वेअर मीटर परिसरात वसलेली आहे. त्रिकोणी आकाराची ही इमारत असून इमारतीतील जास्तीत जास्त जागेचा उपयोग करण्यात आलेला आहे. या नव्या इमारतीत भव्य लोकसभेचे सभागृह आहे. या सभागृहात एकूण ८८८ आसने आहेत. तर राज्यसभेमध्ये एकूण ३८४ आसने आहेत. संसदेच्या संयुक्त अधिवेशनासाठी लोकसभेमध्ये साधारण १२७२ जण बसू शकतात.
हेही वाचा >> इम्प्लांट्सच्या मदतीने आता अर्धांगवायू झालेली व्यक्ती चालू शकणार; जाणून घ्या सविस्तर…
मोठी कार्यालये, मोकळी जागा…
संसदेचे लोकसभा सभागृह देशाचा राष्ट्रीय पक्ष मोराच्या थीमवर उभारण्यात आलेले आहे. तर राज्यसभेची रचना ही राष्ट्रीय फूल कमळाच्या थीमवर आधारित आहे. भारतीय लोकशाही आणि नागरिकांना केंद्रस्थानी ठेवूनच या सभागृहांची निर्मिती करण्यात आलेली आहे, असा दावा ‘सेंट्रल व्हिस्टा’च्या वेबसाइटवर करण्यात आलेला आहे. संसदेच्या नव्या इमारतीतील कार्यालये भव्य, भरपूर मोकळी जागा असलेली आणि सर्व अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली आहेत. विशेष म्हणजे ही इमारत उभारताना पर्यावरणाचा विचार करण्यात आलेला आहे. इमारतीच्या प्रांगणात एक मोठे वडाचे झाड असणार आहे.
दिव्यांग व्यक्तीला संसदेत सहज फिरता येणार
या इमारतीच्या माध्यमातून भारतीय कला, संस्कृती तसेच भारतातील विविधता प्रतिबिंबित होईल, असा विचार केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे. दिव्यांग व्यक्तीलादेखील अगदी सहजपणे फिरता येईल, अशी या नव्या इमारतीची रचना करण्यात आलेली आहे.