– लोकसत्ता टीम

सर्दी, खोकला यांवरील, औषध दुकानांमध्ये सहजी उपलब्ध असणारी अनेक औषधे आता गायब होण्याची शक्यता आहे. या औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फोकोडीन या ड्रगच्या वापरावर शासनाने निर्बंध आणले आहेत. याबाबतची औषधे रुग्णांना देण्यात येऊ नयेत. तसेच रुग्णांनीही त्याचा वापर आपणहून करू नये अशा सूचना ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडियाने दिल्या आहेत. फोकोडीन नेमके काय आहे? त्यावर बंदी का? अशा मुद्द्यांचा आढावा

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
nashik crime news
नाशिक: धोकादायक पद्धतीने मालमोटार चालवून समाजमाध्यमांत प्रसिद्धीचा सोस अंगाशी
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?

फोकोडीनवर बंदी का?

जागतिक आरोग्य संघटनेने मार्चमध्ये फोकोडीनच्या वापराबाबत सावधानतेचा इशारा दिला होता. औषधाचे दीर्घकालीन गंभीर दुष्परिणाम होत असल्यामुळे हा घटक असलेली औषधे वापरू नयेत, असा इशारा दिला होता. फोकोडीनच्या वापराबाबतचा वाद हा खरे तर गेल्या जवळपास बारा वर्षांपासूनचा आहे. अनेक संशोधन नियतकालिकांमध्ये या ड्रग्जच्या दुष्परिणामांबाबत इशारा देण्यात आला आहे. युरोपीय देशांत गेल्या वर्षीपासूनच या ड्रग्जवरील बंदीचे वारे वाहात होते. ऑस्ट्रेलिया, युरोपीय देश, मलेशिया येथे यापूर्वीच फोकोडीन असलेल्या औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानंतर साधारण दोन आठवड्यांपूर्वी डॉक्टरांना फोकोडीनयुक्त औषधांचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

फोकोडीन काय आहे?

फोकोडीन हे ओपीऑइड गटातील ड्रग आहे. या गटातील ड्रग्ज खोकला, तीव्र कोरडा खोकला, वेदनाशमन आणि काही वेळा ताण कमी करणाऱ्या औषधांमध्ये वापरली जातात. फोकोडीनप्रमाणेच कोडीन, मेथाडॉन, हेरॉईन, ऑक्सिकोटीन, हायड्रोमॉर्फेन या ओपीऑइड ड्रग्ज आहेत. यातील काही पदार्थ हे अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यानुसार प्रतिबंधित आहेत. नशेसाठी यातील काही पदार्थांचा वापर केला जातो. फोकोडीनचा वापर प्रामुख्याने खोकल्यावरील औषधांमध्ये करण्यात येतो. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक औषधांमध्ये फोकोडीन असल्याचे दिसते.

दुष्परिणाम नेमके काय?

गुंगी येणे, उबग येणे, अन्नाची वासना कमी होणे, मळमळणे असे दुष्परिणाम प्राथमिक स्वरूपात दिसतात. मात्र, अनेक संशोधनांनंतर फोकोडीनची तीव्र स्वरूपाची, जीवघेणे ॲलर्जी (ॲनाफेलीक रिॲक्शन) येत असल्याचा समोर आले. त्याची दखल घेऊन आरोग्य संघटनेने वापराबाबत इशारा दिला आहे. या ड्रग्जचे अंश हे अगदी वर्षभर शरीरात राहतात. त्यामुळे त्याच्या वापराचा दीर्घकालीन परिणाम होतो. शस्त्रक्रियेसाठी रुग्णाला भूल दिली जाते. त्याचे स्नायू शिथिल होण्यासाठी औषधे दिली जातात. अशा वेळी फोकोडीनचे दुष्परिणाम प्रामुख्याने दिसून आले आहेत. त्यामुळे या ड्रग्जच्या वापराचा धोका हा एरवीपेक्षा चौदापट अधिक असल्याचे काही शोधनिबंधांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

बंदीचा परिणाम काय होणार?

खोकल्यावरील औषधे ही रुग्ण अनेकदा स्वत: खरेदी करतात. डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज सर्वच औषधांच्या खरेदीसाठी नसते. अनेकी नामांकित औषध कंपन्यांच्या खोकल्यावरील औषधामध्ये फोकोडीनचा उपयोग करण्यात आला आहे. फोकोडीनच्या वापरावरील निर्बंधांमुळे ही औषधे बाजारात सहजी उपलब्ध होणार नाहीत. काही औषधांचे उत्पादनही बंद करावे लागू शकेल. यापूर्वी गेल्याच महिन्यात शासनाने कोडीन, पॅरासिटामोलसह इतरही काही ड्रग्ज आणि काही ड्रग्जचा एकत्रित वापर करण्यावर निर्बंध घातले आहेत. सर्रास वापरले जाणारे फोकोडीन आणि इतर ड्रग्जच्या वापरावर यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध यामुळे अनेक औषधे बाजारातून हद्दपार होण्याचीही शक्यता आहे. कंपन्यांना स्वतंत्र स्वरूपात काही औषधे नव्याने आणावी लागतील. या सगळ्याचा परिणाम औषध कंपन्यांच्या अर्थकारणावरही होणार आहे. यापूर्वी २०१६ मध्येही काही ड्रग्जवर बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी औषध कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

हेही वाचा : विश्लेषण : भारताच्या औषध उत्पादकांवर बारकाईने लक्ष का?

अमली पदार्थांच्या बाजाराशी काय संबंध?

कोडिनयुक्त खोकल्याच्या औषधांचा वापर नशेसाठी मोठ्या प्रमाणात होत होता. त्यामुळे त्यावर बंदी आणण्यात आली. त्यामुळे नंतर कोडिनचे संयुग असलेल्या फोकोडिनयुक्त औषधांचा वापर सुरू झाला. या औषधांमुळे नशा येते आणि हलकेपणाची भावना जाणवते. त्यामुळे अनेक जण त्यांचा वापर करतात. ही औषधे तत्काळ परिणाम दाखवतात. अमली पदार्थांप्रमाणे ते उत्तेजित करतात आणि नंतर शरीर सुस्त करतात. औषधाच्या दुकानात ती सहज, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय उपलब्ध होतात. व्यसन, नशेसाठी वापर हादेखील फोकोडीनयुक्त औषधांचा एक दुष्परिणाम असला तरी त्यावरील बंदीचे कारण ते नाही. तीव्र, जीवघेणी ॲलर्जी यामुळे या फोकोडीनयुक्त औषधांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.