३ सप्टेंबर रोजी गाझियाबाद येथील एका उद्यानात पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका १० वर्षीय मुलावर हल्ला केला होता. संबंधित कुत्र्याने मालकाच्या हातातून स्वत:ची सुटका करून घेत, या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात संबंधित मुलगा गंभीर जखमी झाला होता. गेल्या महिन्यात गाझियाबादमधील लोणी येथे सहा वर्षांच्या चिमुरडीला आणि गुडगावमध्ये एका महिलेला पिटबुल जातीच्या कुत्र्याने चावा घेतला होता. तर जुलै महिन्यात लखनऊमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने एका वृद्ध महिलेवर हल्ला करत तिला जखमी केलं होतं. पिटबुल जातीचा कुत्रा माणसांवर हल्ला का करतो? यामागची नेमकी कारणं कोणती आहेत, याचं विवेचन करणारा लेख…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिटबुल कोणत्या प्रकारचा कुत्रा आहे?
प्राणी हक्काचं संरक्षण करणाऱ्या PETA संस्थेने या वर्षी जुलैमध्ये मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. संबंधित पत्रात त्यांनी पिटबुल हे धोकादायक जातीचं कुत्रं असल्याचं म्हटलं होतं. त्याच्या आक्रमक स्वभावामुळे लोकांनी पिटबुलसारखे कुत्रे पाळायला सुरुवात केल्याचंही पत्रात म्हटलं होतं. मूळात पिटबुल जातीच्या कुत्र्याच्या उत्पत्ती ‘बुल अँड बेअर बायटींग’ या खेळ प्रकारातून झाली आहे. ‘बुल अँड बेअर बायटींग’ हा एक मनोरंजनाचा खेळ असून यामध्ये कुत्र्याला बंदिस्त बैल किंवा अस्वलावर हल्ला करण्यास प्रवृत्त केलं जातं. ‘बुल अॅंड बेअर बायटींग’ हा इंग्लंडमधील एक खेळाचा प्रकार होता, १८३५ साली यावर बंदी घालण्यात आली आहे.

भटक्या आणि जखमी कुत्र्यांची काळजी घेणार्‍या ‘फ्रेंडिकोज’ या स्वयंसेवी संस्थेसोबत काम करणार्‍या तंद्राली कुली यांनी ‘इंडियन एक्स्प्रेसला’ सांगितलं की, ‘पिटबुल’ हा शब्द सामान्यतः कुत्र्यांच्या चार वेगवेगळ्या जातींसाठी वापरला जातो. यामध्ये अमेरिकन पिटबुल टेरियर, स्टॅफोर्डशायर टेरियर, बुल टेरियर , आणि अमेरिकन बुली अशा कुत्र्यांचा समावेश होतो.

पिटबुल कुत्र्याची पैदास कशी झाली
खरं तर, पिटबुल कुत्र्याची पैदास बुलडॉग आणि टेरियर्सपासून करण्यात आली आहे. त्यामुळे पिटबुल कुत्र्याकडे बुलडॉग आणि टेरियरप्रमाणे ताकद आहे. या कुत्र्याची पैदास मुळात बैलांशी लढण्यासाठी करण्यात आली होती, असंही कुली यांनी सांगितलं.

हेही वाचा- विश्लेषण : महाराष्ट्रातील हत्ती गुजरातला धाडल्याचे प्रकरण का ठरतेय वादग्रस्त?

पाळीव प्राण्यांचे अभ्यासक एरॉन डिसिल्वा यांनी सांगितलं की, हरियाणाच्या काही भागांमध्ये होणाऱ्या कुत्र्यांच्या लढाईत पिटबुल्सचा वापर केला जातो. पिटबुल कुत्रा शक्तीशाली असल्याचं लोकांना वाटतं. त्यामुळे आता या कुत्र्याचं भारतात स्थानिक पातळीवर प्रजनन घडवून आणलं जात आहे. पण भारतात पिटबुल्सची होणारी पैदास फारशी चांगली नसल्याचं मत डिसिल्वा यांनी व्यक्त केलं आहे.

पिटबुल जातीचा कुत्रा धोकादायक कशामुळे आहे?
प्रत्येक कुत्र्याची जात वेगळी असते. यातील काही कुत्र्यांच्या जाती इतर प्राण्यांसोबत किंवा माणसांसोबत मैत्रीपूर्ण आणि अधिक नम्र असतात. काही कुत्र्यांना लोकांच्या सभोवताली राहायला आवडतं. तर काही कुत्रे लहान घरांमध्ये राहणं पसंत करतात. पिटबुल जातीच्या कुत्र्याचाही एक वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव आहे.

डिसिल्वा यांच्या मते अलीकडच्या काळात लोकांना पिटबुल कुत्रा पाळण्याचं वेड लागलं आहे. घरात पिटबुलसारखा कुत्रा पाळणं कुत्र्यांच्या मालकांना प्रतिष्ठेचं वाटू लागलं आहे. हा कुत्रा ताकदवान आणि तंदुरुस्त असल्याने लोक या कुत्र्याला विकत घेतात. मात्र, या कुत्र्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं जातं. अशा कुत्र्यांना बहुतेक लोक बांधून ठेवतात. पण पिटबुल हे उच्च उर्जा असलेलं कुत्रं आहे. पण मालकांच्या अज्ञानामुळे पिटबुल कुत्र्याची देखभाल योग्यप्रकारे होत नाही. या कुत्र्यांना विशिष्ट प्रमाणात व्यायामाची आवश्यकता असते. पण त्यांना बांधून ठेवल्याने त्यांना व्यायाम मिळत नाही. परिणामी हे कुत्रे घातक किंवा आक्रमक होण्याची शक्यता असते. शिवाय अशा कुत्र्यांना योग्य प्रकारच्या प्रशिक्षणाचीही आवश्यकता असते. कु

कुत्र्यांच्या मालकावरील कायदेशीर जबाबदारी
गाझियाबाद आणि गुडगावमधील घटनांमध्ये संबंधित कुत्र्यांच्या मालकांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २८९ सह इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षेचा उल्लेख आहे. कुत्र्याच्या मालकांनी आपल्या पाळीव कुत्र्याची ताकद लक्षात ठेवली पाहिजे. जर कुत्र्यामुळे नागरिकांना धोका निर्माण होत असेल, तर त्या कुत्र्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मालकाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास याला कायद्याच्यादृष्टीने कुत्र्याचा मालक जबाबदार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why pitbull dogs are dangerous know reasons behind aggression rmm