कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चक्क विमानतळावर जाऊन त्यांचे स्वागत केले आहे. अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार असून पंतप्रधान मोदींशीदेखील चर्चा करणार आहेत. पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली विमानतळावर शेख तमीम बिन हमाद अल-थानी यांचे वैयक्तिकरित्या स्वागत करून प्रस्थापित नियम मोडले आहेत. ही कतारच्या अमिरांची दुसरी भारत भेट आहे. मार्च २०१५ मध्ये त्यांची पहिली भेट होती. आज (१८ फेब्रुवारी) दोन्ही नेत्यांमध्ये राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे, त्यामुळे ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. भारत-कतार संबंध महत्त्वाचे का आहेत? या भेटीचे महत्त्व काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

सोमवारी (१७ फेब्रुवारी) कतारचे अमीर नवी दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आले आहेत. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले आणि त्यांचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील उपस्थित होते. ‘एक्स’वर आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधानांनी लिहिले, “माझे बंधु कतारचे अमीर एच. एच. शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचे स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेलो होतो. त्यांचा भारतातील मुक्काम फलदायी होवो आणि उद्याच्या आमच्या भेटीची मला प्रतीक्षा आहे.” कतारच्या अमिरांचे आगमन होताच, कलाकारांनी त्यांचे स्वागत केले. त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींसह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हेदेखील विमानतळावर उपस्थित होते. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या भेटीला “स्पेशल जेस्चर फॉर स्पेशल फ्रेंड” असे म्हटले आहे.

सोमवारी (१७ फेब्रुवारी) कतारचे अमीर नवी दिल्लीत दाखल झाले. पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आले आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कतार अमिरांचा दोन दिवसीय दौरा

सोमवार (१७ फेब्रुवारी) पासून सुरू झालेल्या अल-थानी यांच्या भारत दौऱ्यात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा आणि तंत्रज्ञानावर भर असेल. सर्वप्रथम त्यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली. “कतारचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांना त्यांच्या राज्य भेटीसाठी नवी दिल्लीत आमंत्रित करून फार चांगले वाटले. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरची त्यांची चर्चा आमच्यातील घनिष्ठ मैत्रीचे बंध अधिक घट्ट करेल,” असा विश्वास जयशंकर यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. मंगळवारी, कतारच्या अमिरांचे राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत केले जाईल, त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये मोदींबरोबर त्यांची भेट होईल. दोन्ही नेत्यांमधील चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा समावेश असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मंगळवारी दुपारी सामंजस्य कराराची (एमओयू) देवाणघेवाण होणार आहे, त्यानंतर कतारचे अमीर राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील, असेही सांगण्यात आले आहे.

कतारमधील अमिरांच्या भारत भेटीचे महत्त्व

अल-थानी यांची भारत भेट कतार-भारत संबंधांसाठी खूप महत्त्वाची आहे. दोन्ही देशांतील संबंध अनेक दशकांपासून तुलनेने स्थिर राहिले आहेत, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात दोन्ही देशांतील संबंध सुधारले आहेत, हे भारताच्या विस्तारित पश्चिम आशियाई शेजाऱ्यांशी संलग्नता वाढवण्याच्या आणि त्यांच्या ऊर्जा सुरक्षा आवश्यकता सुरक्षित करण्याच्या धोरणाशी सुसंगत आहे. आज दोन्ही देशांमधील व्यापार अंदाजे २० अब्ज डॉलर्स इतका आहे. कतारच्या भारतातील प्रमुख निर्यातींमध्ये लिक्विफाइड नॅचरल गॅस (एलएनजी) आणि लिक्विफाइड पाइप्ड गॅस (एलपीजी), रसायने, पेट्रोकेमिकल्स, प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम यांचा समावेश आहे.

कतार हा भारताचा एलएनजीचा सर्वात मोठा पुरवठादार आहे. भारताच्या सर्व एलएनजी आयातींपैकी ४८ टक्क्यांहून अधिक आयात कतारमधून केली जाते. त्याचप्रमाणे, कतार भारतातील ‘एलपीजी’चादेखील सर्वात मोठा पुरवठादार आहे. भारताच्या एकूण एलपीजी आयातीपैकी २९ टक्के आयात कतारमधून होते. दुसरीकडे, कतारला भारताच्या प्रमुख निर्यातीत तृणधान्ये, तांबे वस्तू, लोखंड आणि पोलाद वस्तू, भाज्या, फळे, मसाले, प्रक्रिया केलेली अन्न उत्पादने, इलेक्ट्रिकल आणि इतर यंत्रसामग्री, प्लास्टिक उत्पादने, बांधकाम साहित्य, कापड आणि वस्त्रे, रसायने, मौल्यवान दगड आणि रबर यांचा समावेश आहे. परंतु, भारत आणि कतार हे दोन्ही देश त्यांच्या ट्रेड बास्केटचा विस्तार करण्यास आणि अक्षय ऊर्जा, फिनटेक, स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यास उत्सुक आहेत.

अल-थानी यांची भारत भेट कतार-भारत संबंधांसाठी खूप महत्त्वाची आहे. (छायाचित्र-एस.जयशंकर/एक्स)

व्यापार हा भारत-कतार संबंधांचा एकमेव पैलू नाही. दोन्ही देशांमध्ये मजबूत संरक्षण संबंध आहेत. भारत कतारसह अनेक भागीदार देशांना त्यांच्या संरक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणाची संधी प्रदान करतो. कतारमधील द्विवार्षिक दोहा आंतरराष्ट्रीय सागरी संरक्षण प्रदर्शन आणि परिषद (DIMDEX) मध्येही भारत नियमितपणे सहभागी होतो. द्विपक्षीय सहकार्य आणि संवादाचा भाग म्हणून भारतीय नौदल आणि तटरक्षक जहाजे नियमितपणे कतारला भेट देतात. भारत-कतार संबंधांना एक सांस्कृतिक पैलूदेखील आहे. कतारमध्ये भारतीयांचा सर्वात मोठा प्रवासी समुदाय आहे. अंदाजे ८.४ लाख भारतीय कतारमध्ये राहतात, जे व्यवसाय, अभियांत्रिकी, शिक्षण, वित्त, बँकिंग, मोठ्या संख्येने ब्लू कॉलर नोकऱ्यांमध्ये गुंतले आहेत. याव्यतिरिक्त, सुमारे १५,००० भारतीय कंपन्या लहान उद्योगांपासून मोठ्या कॉर्पोरेशनपर्यंत कतारमध्ये कार्यरत आहेत, ज्यांची एकत्रित गुंतवणूक ४५० दशलक्ष डॉलर्स आहे.

परंतु, काही कारणास्तव दोन देशांमध्ये तणावही निर्माण झाला होता. ऑगस्ट २०२२ मध्ये दोहामध्ये आठ माजी नौदलाच्या कर्मचाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आणि सुरुवातीला त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दिल्लीच्या हस्तक्षेपानंतर, २८ डिसेंबर २०२३ रोजी फाशीच्या शिक्षेचा निर्णय मागे घेण्यात आला आणि त्यापैकी सात जणांना गेल्या फेब्रुवारीमध्ये भारतात सोडण्यात आले. कतारला पश्चिम आशियाच्या सुरक्षेतही अधिक महत्त्व आहे. कतारने इस्रायल आणि पॅलेस्टाईन दहशतवादी गट हमास यांच्यात मध्यस्थ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

तसेच कतार तालिबान आणि इतर जागतिक शक्तींमधील बैठकांचे यजमानपद भूषवतो. अलीकडच्या काळात तालिबान राजवटीला औपचारिक मान्यता दिली नसली तरी भारत प्रादेशिक आणि आर्थिक बाबी विचारात घेऊन तालिबानशी संवाद साधत आहे. किंग्ज कॉलेज लंडनमधील किंग्ज इंडिया इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्राध्यापक आणि ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन थिंक टँकचे उपाध्यक्ष (अभ्यास आणि परराष्ट्र धोरण) हर्ष व्ही. पंत यांनी सांगितले, “भारत तालिबानशी संपर्क साधण्याच्या दिशेने प्रगती करत आहे. त्यात कतार तालिबानचे विचार भारतापर्यंत पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.”

Story img Loader