ठाणे जिल्ह्यातील राजकीय परिघात नवी मुंबईचे स्थान नेहमीच वेगळे राहिले आहे. अतिशय वेगाने नागरीकरण होत असलेल्या या जिल्ह्यातील इतर शहरांना बकालीकरणाचा वेढा पडत असताना सोयी, सुविधांच्या आघाडीवर नियोजित आणि राहण्यासाठी तुलनेने सुसह्य ठरलेले नवी मुंबई शहर राज्यात स्वत:चे वेगळेपण राखून राहिलेले आहे. या शहराची राजकीय सत्ता ही माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हाती चार दशकांहून अधिक काळ स्थिरावली आहे. पाच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय स्थित्यंतरानंतर मात्र नाईक यांच्या शहरातील एकहाती वर्चस्वाला पद्धतशीरपणे धक्के देण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाहीर कार्यक्रमात गणेश नाईकांना मान देतात, मात्र स्थानिक पातळीवरील राजकारणात नगरविकास विभागाकडून नाईकांना हवे तसे सहकार्य मिळत नाही असा त्यांच्या समर्थकांचा अनुभव आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असताना नवी मुंबईतील हा राजकीय संघर्ष उफाळून आलेला सध्या पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री-नाईक वाद कधीपासून?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आघाडी सरकार राज्यात सत्तेवर असताना गणेश नाईक ठाणे जिल्ह्याचे १० वर्ष पालकमंत्री राहिले होते. सध्याचा ठाणे आणि नवा पालघर अशा दोन्ही जिल्ह्यांचे राजकीय नेतृत्व या काळात त्यांच्याकडे होते. प्रशासनावर पकड, राज्य सरकारमध्ये दबदबा आणि स्थानिक राजकारणात संपूर्ण प्रभाव असा कारभार नाईकांनी या काळात केला. केंद्रात आणि राज्यात नरेंद्र मोदी आणि भाजपचा दबदबा वाढला तसे नाईकांचे जिल्ह्यातील प्रस्थ कमी झाले. याच काळात एकनाथ शिंदे राजकीय पटलावर मोठे होत गेले. आधी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री, त्यानंतर नगरविकास मंत्री आणि आता थेट मुख्यमंत्री हा शिंदे यांचा गेल्या दहा वर्षांतील राजकीय आलेख चकित करणारा ठरला. या काळात नाईक आणि शिंदे यांच्यातील राजकीय दरी कमी झाल्याची उदाहरणे नाहीत. किंबहुना ही दरी वाढतच गेल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. नवी मुंबईतील वाढत्या राजकीय संघर्षाला या दोन नेत्यांमधील छुप्या वादाची किनार त्यामुळे स्पष्टपणे दिसून येते.

Raju Patil Sandeep Mali
राजकिय वातावरण गढूळ करणाऱ्या शिंदे पिता-पुत्राचे राजकारण संपविण्याची वेळ आली आहे; मनसे आमदार राजू पाटील यांची संतप्त प्रतिक्रिया
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Eknath shinde, shiv sena role, Airoli, belapur assembly election
ऐरोलीतील बंडखोरांना शिंदे गटाचे अभय? बेलापुरात कारवाई, ऐरोलीत आस्ते कदम
lokjagar article about issues in maharashtra assembly election
लोकजागर : भीती आणि आमिष!
airoli vidhan sabha marathi news
ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?
eknath shinde comment ladki bahin yojana daryapur vidhan sabha
मुख्‍यमंत्री म्हणतात, मी शंभरवेळा तुरूंगात जाण्‍यास तयार…कारण…
maharashtra assembly election 2024 religious polarization experiment in solapur city central assembly elections
लक्षवेधी लढत : धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी होणार?

हेही वाचा >>>भारताला ९४ वर्षांमध्ये विज्ञानाचं एकही नोबेल पदक का मिळू शकलं नाही?

नाईकांच्या वर्चस्वाला शिंदेसेनेकडून सुरुंग?

गणेश नाईक यांच्यामुळे नवी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता प्रस्थापित झाली. परंतु येथील स्थानिक राजकारणावर नाईक कोणत्याही पक्षात असले तरी त्यांचा प्रभाव असतो, हा आजवरचा इतिहास आहे. देशात नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी अवघ्या वर्षभरात नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. हा काळ मोदी यांच्या वाढत्या प्रभावाचा होता. असे असतानाही नाईक यांनी तेव्हा राष्ट्रवादीच्या चिन्हावर आपले उमेदवार निवडून आणले आणि महापालिकेत सत्ताही आणली. राज्यात भाजपची सत्ता असतानाही नवी मुंबईत नाईक यांचा प्रभाव कमी झाला नव्हता. मागील पाच वर्षांत मात्र हे गणित बदलू लागले आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. वेगवेगळ्या कारणांमुळे मागील पाच वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. या काळात एकनाथ शिंदे आधी नगरविकास आणि आता थेट मुख्यमंत्री झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांनी नवी मुंबई महापालिकेवर संपूर्ण ताबा घेतल्याचे पाहायला मिळते. नवी मुंबईचा कारभार ठाण्याहून चालतो अशी टीका नाईक समर्थक जाहीरपणे करताना दिसतात. नवी मुंबईतील नाईक विरोधकही या काळात गब्बर झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्र्यांमुळे या विरोधकांचा ‘आवाज’ वाढल्याने जो उठतो तो गणेश नाईकांना आव्हान देतो असे चित्र नवी मुंबईत नित्याचे झाले आहे.

नाईकांची अस्वस्थता भाजपसाठी चिंतेची?

नवी मुंबईत भाजपची सत्ता दिसत असली तरी त्यामध्ये गणेश नाईकांच्या प्रभावाचा वाटा बराच मोठा आहे. भाजपमधील स्थानिक प्रभावी नेत्यांपैकी ९० टक्के पदाधिकारी, नेते, माजी नगरसेवक नाईकांचे कडवे समर्थक आहेत. ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही विधानसभा क्षेत्रांत पक्षाचे ४५ पेक्षा अधिक माजी नगरसेवक हे नाईक यांच्या गोटातील मानले जातात. शहरातील सर्व धर्मीय तसेच जाती, पंथाच्या नागरिकांमध्ये गणेश नाईक यांचा स्वत:चा असा प्रभाव राहिला आहे. शहरातील विधानसभेच्या दोन जागांवर दावा सांगत असताना नाईक कुटुंबियांनी एक प्रकारे भाजपला आपल्या जुन्या आश्वासनांची आठवण करून दिल्याचे सांगितले जाते. भाजपमध्ये प्रवेश करत असताना नाईक यांनी बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा क्षेत्रांवर दावा सांगितला होता. २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीत बेलापूर मतदारसंघ मंदा म्हात्रे यांना देऊन भाजपने नाईकांना पहिला धक्का दिला. त्यानंतर राज्यात सत्ता येऊनही नाईक यांची मंत्रीपदी वर्णी लागली नाही. नाईकांसारखा ठाणे जिल्ह्यात दबदबा राखून असलेला आणि आगरी समाजातील प्रभावी नेता भाजपने बाजूला ठेवला अशी त्यांच्या समर्थकांची तक्रार आहे. कपिल पाटील, रविंद्र चव्हाण मंत्री होऊ शकतात मग नाईक का नाहीत, ही खंतही त्यांचे समर्थक बोलून दाखवितात. नाईक समर्थकांमधील ही वाढती अस्वस्थता भाजपसाठी त्यामुळे डोकेदुखी ठरू शकते अशी चर्चा आहे.

हेही वाचा >>>Massive Door In Antartica: अंटार्क्टिकामध्ये सापडलेल्या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?

गणेश नाईक बंड करतील का?

बेलापूर विधानसभा मतदारसंघ संदीप नाईक यांना सुटला नाही तर नाईक कुटुंबिय कोणती राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एके काळी शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असणारे नाईक भाजपमध्ये गेले ते संदीप नाईक यांच्या आग्रहामुळे. पुढे भाजपकडून नाईकांना फारसे काही मिळाले नाही. संदीप यांची पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली असली तरी सत्तेच्या पदांपासून नाईक कुटुंबियांना दूर ठेवले गेले. त्यात एकनाथ शिंदे यांचे समर्थक नाईक यांची कोंडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा परिस्थितीत बेलापूर मतदारसंघ मिळाला नाही तर नाईक बंडाचे निशाण फडकवतील का, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यांच्या समर्थकांच्या एक मोठा गट नाईकांनी संघर्ष करावा या मताचा आहे. असे असले तरी भाजपशी काडीमोड घेणे योग्य ठरेल का याची चाचपणी सध्या नाईक यांच्या निकटवर्तीयांच्या वर्तुळात सुरू असल्याची चर्चा आहे.